Loan Waiver Protest: कर्जमाफीसाठी प्रहारचे राज्यभरात चक्काजाम आंदोलन; सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

Farmers Agitation: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी रस्ता अडविण्यात आला. त्यामुळे वाहतूककोंडीही पाहायला मिळाली.
Chakka Jam For Farmers
Chakka Jam For FarmersAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती...

१) प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्यभर चक्का जाम आंदोलन – शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि २०% बोनस मागणीसाठी बच्चू कडू रस्त्यावर.

२) महानगर ते ग्रामीण भाग ठप्प – पुणे, नागपूर, अमरावती, संभाजीनगरसह सर्व जिल्ह्यांत रस्ते बंद, वाहतूक खोळंबली.

३) बच्चू कडूंचा आक्रमक इशारा – मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात घुसण्याचा इशारा.

४) सरकारवर आरोप – “शक्तीपीठासाठी निधी आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही.”

४) शेतकरी संघटनांचा पाठिंबा – आंदोलनाला मनसे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचा पाठिंबा.

Pune News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी रस्ता अडविण्यात आला. त्यामुळे वाहतूककोंडीही पाहायला मिळाली. केवळ ग्रामिण भागातच नाही तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर अशा शहरांमध्येही रास्तरोको करण्यात आला. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात आंदोलनाची तीव्रता अधिक होती. बच्चू कडू स्वतः अमरावती जिल्ह्यात आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आणि भाताला हमीभावावर २० टक्के बोनस देण्याचेही वचन दिले होते. मात्र, सत्ता स्थापन होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी सरकारने या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे. बच्चू कडू यांनी यापूर्वी उपोषण करून आणि विदर्भात पदयात्रा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. आता त्यांनी थेट रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.

Chakka Jam For Farmers
Farmer Protest: चक्‍का जाम आंदोलनातून शेतकऱ्यांची ताकद दिसेल

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे आंदोलन

छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात चक्का जाम झाला, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली. वाहतूक पोलिसांनी सेव्हन हिल्स ते सेशन कोर्ट सिग्नल आणि गोपाल टी ते सिलेखाना चौक या मार्गांवरील वाहतूक सकाळी १० वाजेपासून आंदोलन संपेपर्यंत बंद ठेवली. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन केले. या आंदोलनात माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनीही सहभाग घेतला.

जालना येथे जामवाडी आणि अंबड तालुक्यातील दुनगाव फाटा येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला, ज्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. अकोला येथील पुसद नाका परिसरातही रास्ता रोकोमुळे अकोला-नांदेड आणि अमरावती-पुसद महामार्गावर वाहतूक खोळंबली. अकोला जिल्ह्यातील देवरी फाटा येथे अकोट-शेगाव आणि अकोट-अकोला रस्ता सुमारे दोन तास बंद होता. शेतकरी संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

Chakka Jam For Farmers
Farmer Agitation : सोयाबीन दरासाठी औशात रोखला महामार्ग

अमरावतीत तीव्र आंदोलन, बच्चू कडूंचा सहभाग

अमरावतीच्या परतवाडा मार्गावर बच्चू कडू स्वतः रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले. अचलपूर-परतवाडा रोडवर टायर जाळण्यात आले, आणि आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अमरावती-अचलपूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, आणि मध्य प्रदेशात जाणारी वाहतूकही खोळंबली. प्रहारच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार आणि मनसेनेही पाठिंबा दिला आहे.

बुलढाणा आणि गोंदियातही आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा फाट्याजवळ प्रहारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि दिव्यांग-विधवांच्या प्रश्नांसाठी चक्का जाम केला. गोंदियातील तिरोडा-तुमसर राष्ट्रीय महामार्गावरही रास्ता रोको झाला, ज्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

नागपुरात आंदोलन आणि पोलिस कारवाई

नागपूर येथे ऑटोमोटिव्ह चौकात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्का जाम केला. आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

एका आंदोलनस्थळी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे आणि हमीभावाच्या २० टक्के बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता सरकार बोलायलाही तयार नाही. शक्तीपीठाला ८० हजार कोटी रुपये देण्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. यामागे सरकारचे कारस्थान आहे.” त्यांनी इशारा दिला की, “मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसह मंत्रालयात घुसू. सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, आम्ही मागे हटणार नाही.”

वारंवार विचारले जाणारे प्रश्न...

१) प्रहार जनशक्ती पक्षाने कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन केले?
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि भाताला हमीभावावर २०% बोनस देण्याची मागणी.

२) बच्चू कडू कुठे आंदोलनात सहभागी झाले?
अमरावती जिल्ह्यात परतवाडा मार्गावर ते थेट आंदोलनात उतरले.

३) या आंदोलनात कोणत्या शहरांमध्ये वाहतूक ठप्प झाली?
पुणे, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, जालना, अकोला, गोंदिया आणि बुलढाणा येथे वाहतूक अडली.

४) सरकारवर बच्चू कडूंचा आरोप काय होता?
शक्तीपीठासाठी ८० हजार कोटी रुपये उपलब्ध, पण शेतकऱ्यांसाठी निधी नाही.

५) आंदोलनाला कोणत्या पक्षांचा पाठिंबा होता?
मनसे, महाविकास आघाडी आणि विविध शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com