Research Center Baramati : बारामतीत उगवत आहे शेती तंत्रज्ञानाची नवी पहाट...

बारामतीमधील संशोधनकेंद्र हे प्रामुख्यानं जमिनीची सुपीकता वाढवणं, मातीची शास्त्रोक्त पद्धतीनं काळजी घेऊन उत्पादन वाढवणं, पीकपद्धतीचं नियोजन करणं, पिकाचे आरोग्य उत्तम राखणं, शेतमालाची गुणवत्ता वाढवणं, हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणं, खत व पाणी यांचं योग्य नियोजन करणं, तणनाशकाचा व कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर टाळणं अशा व अशा तऱ्हेच्या विविध विषयांवर संशोधनातून उपाययोजना करणार आहे.
Research Center Baramati
Research Center BaramatiAgrowon

प्रतापराव पवार

Development Of Baramati : आजच्या आधुनिक काळात परदेशातील शेतकरी हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत विविध प्रयोग यशस्वी करताना दिसतात, दुसरीकडे भारतासारख्या विकसनशील देशातील बहुतांश शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीनं शेती करत आहेत.

अशा प्रकारे केली जाणारी शेतीही शेतकऱ्यांसाठी कमी फायदेशीर व निसर्गावर अवलंबून असते. यामध्ये पिकांची निवड, योग्य नियोजन, हवामानात होणारे बदल, उत्पादकता, उत्पादनाचा दर्जा अशा कितीतरी गोष्टी शेतकऱ्यांसमोर रोज नवनवीन आव्हानं घेऊन येत आहेत.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात् कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून शेती व शेतीपूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांवर यशस्वीपणे मात करू शकतो. हाच विचार सातत्यानं समोर असल्यामुळेच बारामतीच्या ‘ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’बरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठ व मायक्रोसॉफ्ट या जागतिक अग्रगण्य संस्थांनी २०२२ मध्ये सामंजस्य-करार करण्यासाठी पुढाकार घेतला.

या संस्थांना बरोबर घेऊन राज्यातील, देशातील व पर्यायानं जगातील शेतकऱ्यांना फायदेशीर होईल असं तंत्रज्ञान निर्माण करण्याच्या उद्देशानं बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट पुढील काळात मार्गक्रमण करणार आहे.

‘प्रोजेक्ट फार्मवाइब्ज्’ हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा जगभरातील शेतीला व शेतीकेंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या संशोधनाचा एक महत्त्वाकांक्षी भाग आहे. या प्रोजेक्टमार्फत होणारं संशोधन हे मायक्रोसॉफ्ट जगभरातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देतं हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

Research Center Baramati
Baramati Agro Sugar Factory : बारामती ॲग्रो कारखान्यालाच ऊस देण्याचे आवाहन

आपल्या कक्षा उंचावण्यासाठी ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड हे तीन भागीदार येणाऱ्या काळात या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मार्फत होणारं नवनवीन संशोधन व तंत्रज्ञान हे फक्त शेतकऱ्यांसाठीच मर्यादित न ठेवता, डेटा-शास्त्रज्ञ, तरुण संशोधक, या क्षेत्राची आवड असणारे विद्यार्थी व उद्योजक यांनाही उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

मायक्रोसॉफ्टच्या ‘एझूर’ या प्लॅटफॉर्मवर चालणारं ‘फार्मवाइब्ज् ॲल्गरिदम’ हे जमिनीतील सेन्सर, आकाशातील ड्रोन व अवकाशातील उपग्रह (जो ‘बिल गेट्स फाउंडेशन’नं उपलब्ध करून दिलेला आहे) यांमार्फत माहिती गोळा करून तिचा उपयोग हा शेतीक्षेत्रात क्रांतिकारी बदल करण्यासाठी करत आहे. हे तंत्रज्ञान शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतं.

येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग बारामती व परिसरातील विविध प्रकारच्या जमिनीतून येणारी माहिती वापरून नवीन तंत्रज्ञान तयार करण्यासाठी होणार आहे. या प्रक्रियेत ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये ॲसिनिक फ्यूजन (ज्यामध्ये उपग्रहाच्या व ड्रोनच्या माध्यमातून मिळणारी माहिती जमिनीतून सेन्सरमार्फत येणाऱ्या डेटासोबत एकत्र करून पिकासंदर्भात व मातीसंदर्भात बहुमूल्य अशा गोष्टी समजावून घेतल्या जातात), स्पेस आय (ज्यामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उपग्रहामार्फत घेतली जाणारी शेतीची छायाचित्रं ही अधिक स्पष्ट केली जातात) डीप.

एमसी (हे तंत्रज्ञान सेन्सर व हवामान नियंत्रणकक्षाकडून येणारा डेटा वापरून तापमान व पावसाशी संबंधित अचूक भाकीत वर्तवण्यासाठी वापरलं जातं) अशा अनेक नावीन्यपूर्ण ॲल्गरिदमचा लाभ घेतला जाणार आहे.

बारामती येथील कृषी विज्ञानकेंद्रात घेतल्या जाणाऱ्या सिमला मिरची या पिकाचा मागील वर्षीचा डेटा वापरून एक नवीन ॲल्गरिदमची निर्मिती यशस्वी करून दाखवली आहे. याचा उपयोग पुढील काळात सिमला मिरचीच्या पिकावर येणाऱ्या विविध रोगांबाबत अचूक अंदाज बांधण्यासाठी, तसंच जमिनीची योग्य प्रकारे काळजी घेऊन उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे.

‘बिल गेट्स फाउंडेशन’च्या तज्ज्ञांनी बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. महिलासक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रांत ट्रस्ट करत

असलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये ट्रस्टमधील तज्ज्ञांची एक टीम काम पाहणार आहे. विशेष बाब म्हणजे, या टीमसोबत संस्थेत पोस्ट-ग्रॅज्युएट विभागात शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थ्यांचीदेखील इंटर्न म्हणून निवड करण्यात आली आहे.

हे विद्यार्थी पुढील काळात मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत खांद्याला खांदा लावून संशोधनात सहभागी होणार आहेत. या ट्रस्टसाठी अभिमानाची गोष्ट

म्हणजे, ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत घेतल्या जाणाऱ्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज’ या ऑनलाइन कोर्ससाठी जगभरातून विद्यार्थी प्रवेश घेणार असून, कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) १९६० च्या दशकापासून सुरू झालेला प्रवास हा संपूर्ण जगामधील अनेक प्रगत देशांतून आता भारतासारख्या विकसनशील देशात येऊन पोहोचला आहे.

जागतिक पातळीवर उद्योग व आरोग्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असताना आपल्या देशात शेती व शेतीपूरक व्यवसाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावाखाली आपण आणू शकल्यास नक्कीच येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी आशादायी असणार आहे.

यातून राज्यात व देशात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होऊ शकल्या तर हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं सर्वांत मोठं यश असणार आहे. हे सेंटर या प्रवासातला मैलाचा दगड ठरणार आहे यात तिळमात्र शंका नाही.

Research Center Baramati
Road Development Fund : सरकारने धुळ्यातील मंजूर रस्त्यांबाबतची स्थगिती उठविली

कृत्रिम बुद्धिमता (एआय), मशिन लर्निंग, डेटा सायन्स, आयओटी आणि सायबरसुरक्षेतील ‘कटिंग एज’ अभ्यासक्रमांसाठी ‘आयबीएम’चं आणि बारामतीचं ‘विद्या प्रतिष्ठान’ सरसावले आहे. त्यामुळे बारामतीत ‘एआय’ अॅप्लिकेशनशी निगडित परिपूर्ण परिसंस्थाच निर्माण होत असून, केवळ भारताच्या नव्हे तर, जगाच्या मानचित्रात बारामतीचं एक वेगळं स्थान निर्माण होत आहे.

सध्या जगभरात आयटी-क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा तुटवडा असून, जगाची ही गरज भारत पूर्ण करू शकतो. ‘आयबीएम’च्या माध्यमातून उद्योगान्मुख व किफायतशीर दरातील अभ्यासक्रम ‘विद्या प्रतिष्ठान’ घेऊन येत आहे.

पुढील काळात विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान यामुळे मिळणार आहे, तसंच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्याचं काम या अभ्यासक्रमातून होईल. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रामुळे विद्यार्थ्यांना जगभरात कुठंही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

ज्ञान मिळवू या... ज्ञान सर्वांना देऊ या...ज्ञानाचा फायदा समाजाला देऊ या...या दृष्टिकोनातून बारामतीचे हे दोन्ही न्यास गेली पन्नास वर्षं काम करत आहेत. अनेक वर्ष एखाद्या व्यक्तीनं झटून काम केल्यामुळेच अशा प्रकारचं कार्य उभ राहत असतं.

त्यामुळे ‘आयबीएम’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ आकर्षित झाल्यास नवल वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला फूटपट्टी लावायची असल्यास एकाच क्षेत्रावरून ठरवू नये. त्याबाबतचे इतरही कंगोरे पाहून मत ठरवावं, हे सांगावं लागतं.

त्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना बहुअंगानं पाहिलं पाहिजे. तसा व्यापक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक आहे. एखादा कलाकार, राजकीय व्यक्ती त्याच्या क्षेत्रात उत्तम किंवा अत्युत्तम असेलही; परंतु त्याचा मानवीय चेहरा कसा आहे हेही पाहावं एवढीच विनंती...!

सेंटर ऑफ एक्सलन्स

बारामतीमधील ‘विद्या प्रतिष्ठान’च्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ग्रामीण भागात देशभरातील बहुधा पहिलंच असं डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑटोमेशनचें ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारलं जात आहे.

यामध्ये इंडस्ट्रिअल रोबोट्स, सीएनसी, व्हीएमसी मशिन्स, सेन्सर-आयओटी-पीएलसी लॅब, थ्रीडी प्रिंटर, व्हर्च्युअल रिॲलिटीयुक्त विविध सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स हे सर्व मिळून सुमारे चार हजार स्क्वेअर फूट एवढ्या जागेत आधुनिक कारखान्याच्या एका शॉप फ्लोअरचीच प्रतिकृती बनवली जात आहे.

यामध्ये फक्त अभ्यासक्रमातील ठरावीक निकषांची पूर्तता करण्यापेक्षा आजच्या विद्यार्थ्याला भविष्यातील इंडस्ट्रीवर आधारित कारखाना कसा असेल याचं मॉडेल अभ्यासता येणार आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं प्रोग्रॅमिंग स्किल, इलेक्ट्रॉनिक्सचं, इलेक्ट्रिकलचं कंट्रोलिंग तंत्रज्ञान आणि मेकॅनिकल इंजिअरिंगची उत्पादनशैली या सर्व आंतरविद्याशाखीय बाबी एकाच छताखाली मिळाल्या तरच सध्याच्या ऑटोमेशनक्षेत्राला न्याय मिळू शकतो आणि तोच प्रयोग यशस्वीरीत्या तज्ज्ञांच्या साह्यानं इथं साकारला जात आहे.

इतक्या आधुनिक दर्जाच्या यंत्रणेचा वापर करून पाठ्यक्रमाच्या कक्षेबाहेर जाऊन उद्योगांना हव्या असणाऱ्या गोष्टींचे शॉर्ट टर्म कोर्सेस देऊन ग्रामीण भागातील अधिकाधिक युवकांना रोजगारक्षम बनवणं, इंजिनिअरिंगच्या, डिप्लोमाच्या विविध विभागांच्या आणि आजूबाजूच्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणं, अद्ययावत मशिनरी, सिम्युलेशन सॉफ्टवेअर्सवर प्रत्यक्ष अनुभव देत कुशल युवकवर्ग तयार करणं, स्टार्टअपमधील क्रिएटिव्ह प्रॉडक्ट्स कमी खर्चात बनवून देणं, जवळच्या उद्योगांतील मनुष्यबळाला लागणारे ट्रेनिंग कोर्सेस देणं, आंतरविद्याशाखीय अभ्यासाला प्रोत्साहन देत त्यातील संशोधनासाठी हक्काचं व्यासपीठ होणं अशा अनेक परस्परपूरक गोष्टींची पूर्तता या जागतिक दर्जाच्या सेंटरमधून बारामतीत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com