
एक होती चिमणी आणि एक होता चिमणा. त्याचं नाव सुर्यपक्षी. नावच मोठं. इवलीशी चिमणी आणि थोडासा जाड चिमणा. फक्त चोंच तेवढी लांब. बारिकशी चिमणीच म्हणतो आपण. ६ सप्टेबर २०२३ ला त्यांनी रुद्रा हटच्या दरवाजालगतच्या एका छोट्याशा फांदीवर घरटं बांधायला सुरू केलं. आम्ही ओळखलं चिमणीला बाळांना जन्म द्यायचाय. त्यांनी निवडलेली जागा चुकीची वाटत होती. मांजर त्या घरट्यापर्यंत झेप घेऊ शकत होतं.आम्ही जाळीचा दरवाजा पूर्ण उघडला की,तो त्या घरट्याला स्पर्श करायचा. आम्ही काळजी घेऊ लागलो. घरटं चिमणी एकटीच बांधत होती. चिमणा दूरून त्यावर लक्ष ठेऊन असायचा. आम्ही या घरबांधणीचा आनंद घेत होतो. गबरू, अन्वीही दररोज येऊन बघत. साधारण १८ सप्टेबरला घरटं पूर्ण झालं.
या घरट्यात चिमणी येऊन थांबू लागली. आम्ही अंदाज बांधला. तिची अंडी देण्याची तयारी सुरू असावी. २२सप्टेबरला सवितानं घरट्यात डोकावून बघितलं. तीन अंडी. दोन काळपट एक निळसर. तिनं फोटोही काढले. मी ही बघितले. मित्रांना सांगीतलं. आता आम्ही पिलांची वाट बघू लागलो. घरट्यात अंडी आल्यापासून आम्ही मांजरीचं रुद्रा हटकडंच फिरकणं बंद केलं. तिचा आवाज आला तरी आम्ही हाकलून लावायचो. आमचं घरट्याकडं पूर्ण लक्ष होतं. ६ ऑक्टोबरला घरट्यात एकच पिलू दिसलं. त्याचाही फोटो काढला. पिलू एकटंच असल्याने आईकडून त्याचं व्यवस्थित संगोपन होत असावं. ते झपाट्याने वाढलं. तीन दिवसांपूर्वी सवितानं एक व्हिडिओ केलाय. पिंजऱ्याला पाठिमागून थोडंस ढकललं की, पिल्लू चोंच वासून आक्रमण करीत होतं.
त्याच्या लांबी, जाडीमुळे ते घरट्यात बसत नव्हतं. आज सकाळी सात वाजता मी त्याचे फोटो घेताना सविताला म्हटलं, एक-दोन दिवसांत हे पाखरू उडून जाणार बघ . तिचंही तेच मत होतं. मी नऊ वाजता गबरू,अन्वीला शाळेसाठी सोडून हटकडं आलो तर , हे पिल्लू पिंजऱ्याबाहेर येऊन फडफडत होतं.
जणू काही माझीच प्रतिक्षा होती त्याला.मी मोबाईल उघडून व्हिडीओ चालू केला नि क्षणात ते उडून बाजुच्या वेलींमध्ये पडलं.आजुबाजुला चिमणा-चिमणी चूकं चूकं असा आवाज करीत फिरत होतेच. मी विचार केला,आता हे उडाले म्हणजे उडाले! याची चिंता करण्याची गरज नाही. मी कामावर गेलो.सविताला सांगीतलं. पिल्लू उडालं!
दुपारी हटवर जेवायला आलो.दरवाजात सुर्यपक्ष्यांचा आवाज कानावर येत होता. तरीही फारसं लक्ष दिलं नाही. आंघोळ करून जेवण केलं. नवेलीकडं निघालो तर दरवाजात तोच आवाज जोरजोरात येत होता. थांबलो. सकाळी ज्या वेलीत पिल्लू पडलं होतं तिथं बघितलो. चकीत झालो. पिलू त्याच जागेवर होतं. याचा अर्थ त्याला उडता येत नव्हतं.त्याचं नशीब बलवत्तर म्हणून या काळात मांजरी आली नाही. डोडोचंही लक्ष गेलं नाही. चिमणा, चिमणी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. पण मांजर वा अन्य कोणापासून ते त्याचं रक्षण कसं करणार?
मी सविताला हाक मारून बोलावून ते पिल्लू दाखवलं. काळभोर पिलू सुर्यपक्ष्याचं वाटतच नव्हतं. पण चोंच सुर्यपक्ष्याचीच होती.या पिलाचं काय करायचं हा आमच्यापुढचा प्रश्न होतं. त्याला आहे त्या स्थितीत सोडणं धोकादायक होतं. त्याला नीट उडायला येईपर्यंत जीवाची भीती होती.काय करायचं? सविता म्हणाली,आपल्याकडं एक छान पिंजरा आहे. चार-पाच दिवसांसाठी त्याला आत ठेऊ. त्याला खायला घालू.तोपर्यंत त्याच्या पंखात बळ येईलच. पिंजऱ्याचा दरवाजा उघडून देऊ.
प्राप्त परिस्थितीत मला हे योग्य वाटलं. तिनं पिंजरा काढला. स्वच्छ धुतला. पिलू उडत नव्हतं पण पकडायला गेलं की,चोंच आ वासून भीती दाखवायला लागलं. तरीही सवितानं त्याला धरून पिंजऱ्यात टाकलं. पिंजरा घरट्याजवळच लटकावलाय. आत एक आडवी फांदी लावलीय. त्यावर बसून तो सारखा चक चक करतोय. आत चुरमूरे टाकलेत. अद्याप त्यानं खाल्लेले नाहीत. त्याची आई आजुबाजुला फिरतेय.
ती बाहेरून त्याला खाद्य टाकू शकते. मला वाटतयं गांडुळाचे पिले आणून टाकावेत. ते खाल्ले तर त्याला चांगली ताकद येईल. आज त्यानं झेप घेण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ तो स्वत:च्या चोचीने खात असावा..बघायचं. तो खाऊ लागला तर अडचण नाही. चार दिवसात त्याला पुरेसा सकस आहार देऊ. पण नाहीच खाल्लं तर नाईलाजाने त्याच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडावा लागेल.
आमच्या लक्षात आलं नसतं तर या पिल्लाचं नक्की काय झालं असतं,याचा अंदाज बांधणं कठीण आहे.ते कोणाचं तरी भक्ष्य ठरलं असतं...कदाचित पुन्हा उडलंही असतं. ते नेमकं किती दिवस पालकांसोबत राहातं,ते ही माहिती नाही. पण आपलं पिलू उडू शकतं हा आईचा अंदाज चुकला असावा. किंवा पिलानंच घाई केली असावी...सगळे अंदाजच केवळ! खरं तर हे पक्ष्यांचं जग आहे माणसांचं नाही...तरीही या जगात डोकावायची इच्छा होतेच!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.