Maharudra Mangnale : मातीत जगण्याची श्रीमंती सगळ्यात मोठी!

या पावसाने आमची पाणी देण्याची पळापळी सध्या तरी थांबवलीय.या एक-दोन दिवसात दिड-दोन इंच पाऊस झाला तर,सोयाबीन हाती लागण्याची खात्री होईल. ही आशा फलद्रूप व्हावी, अशी आशा करणं एवढंच माझ्या हाती आहे.
Maharudra Mangnale
Maharudra MangnaleAgrowon

तब्बल १८ दिवसांनंतर काल रात्रीपासून पावसाचे थेंब तुटताहेत. पाऊस म्हटल्यावर, आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येत ते अजिबात नाही. झड म्हणण्यासारखाही हा पाऊस नाही. आता अर्धा तास फिरून आलो तरी,अंगावरचे कपडे बदलावे लागले नाहीत. बुरबुर,भूरभूर,टीपटीप..हे शब्द वापरावेत असा हा पाऊस आहे. मधेच थोडावेळ झडीसारखा पाऊस येतो...कधीतरी थेंबांचा आवाज वाढतो..पण हा पाऊस वाटत नाही...तरीही हा पाऊस खरीप पिकांना जीवदान देणारा आहे.

पिकावर पडलेला प्रत्येक थेंब पानावाटे मुळापर्यंत जातो.त्यामुळे पिकाची पाण्याची तातडीची गरज भागली जातेय. आभाळ भरलेलं आहे. वातावरण पावसाचं आहे. त्यामुळं आणखी चांगला पाऊस होण्याची आशा अधिकच पल्लवीत झालीय...मी सकाळीच पावसात फिरून त्याचं स्वागत केलं...त्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांसाठी अमृतासमान आहे.

या पावसाने आमची पाणी देण्याची पळापळी सध्या तरी थांबवलीय.या एक-दोन दिवसात दिड-दोन इंच पाऊस झाला तर,सोयाबीन हाती लागण्याची खात्री होईल. ही आशा फलद्रूप व्हावी, अशी आशा करणं एवढंच माझ्या हाती आहे.

कालपासून तसा आरामच चालू आहे. माझ्या जिवलगांना वाटतयं की,मी जास्तच पळापळी करतोय.अनावश्यक शरीराला त्रास करून घेतोय. एखादा मजूर लावून हे काम करणं शक्य नाही का? त्यांची माझ्याविषयीची भावना योग्यच आहे.पण त्यांना वाटतयं तेवढं यात गंभीर काहीच नाही. मजूर मिळत नाही,हे वास्तव आहे. माझी जागा घेणारं कोणी नाही, हेही वास्तव आहे. मी काही दुष्काळ याच शेतीत पाहिलेत. त्याच्या झळा अनुभवल्यात.त्यामुळे अशा आणिबाणीच्या प्रसंगी शेतात राहून आराम करणे मला शक्य नाही.

खरं तर,गुडघ्याचं दुखणं सार्वजनिक करणं ही माझीच चूक आहे...पण कधी कधी अतिपारदर्शकता अडचणीची ठरते. मी ओघात सगळंच वास्तव लिहितो...मात्र आज माझा गुडघा पूर्णपणे नार्मल झालाय. तो नीट होणार याची खात्री होतीच.बाकी माझी प्रकृती ठणठणीत आहे.कच्चून खातोय,पचवतोय ,शारीरिक श्रम एन्जॉय करतोय.मला या कामांचा कसलाच त्रास नाही.

काल सकाळी बेंगलोरहून गुरू या मित्राचा फोन आला होता.केरळच्या शिवानंद आश्रमात त्यांच्याशी दोस्ती झालीय.ते माझ्याशी हिंदीत बोलतात. ते बोलले,मै आपकी हर फेसबुक पोष्ट इंग्लिश ट्रान्सलेट करके पढता हूँ... मेरे मनमे ये पढते वक्त हरबार ये सवाल आता है....ये काम करनेकी उर्जा आपको कहाँसे आती है! खरं तर मी या प्रश्नाचा कधी विचारच केला नव्हता...तरीही मी म्हटलं, नेचर से! त्यांच्याशी छान चर्चा झाली. बेंगलोरचं त्यांचं निमंत्रण वेटींगवर आहे..म्हटलं, अच्छी बारीश नही होती तबतक मै रुद्रा हट छोडूंगा नही!..लेकीन आपको मिलने जरूर आऊंगा.

रात्री माहिती खात्यातील निवृत्त अधिकारी राम पिंपरीकर सरांचाही प्रकृतीची चौकशी करणारा फोन आला होता. ते लातूरला जिल्हा माहिती अधिकारी असताना खूपच जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. ते आजतागायत कायम आहेत.फेसबुकमुळं ते अधिक दृढ झालेत.

Maharudra Mangnale
Maharudra Manganale: शेतकऱ्यांना तुझ्यासारखी पेन्शन असती तर....

माझं बालपण,शालेय काळ आणि बी.ए.पर्यंतचा बहुतांश वेळ या शेतात,याच मातीत गेलाय.या मातीशी माझं अतूट जिव्हाळ्याचं नातं आहे. या नात्याचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. त्यामुळचं लातूरसारख्या शहरात तीस वर्षे पत्रकारिता करूनही तिथं रमलो नाही. माझी माय आणि ही काळी माय,अशा दोन मायींसाठी इथं आलो. रुद्रा हटचं हे विश्व निर्माण केलं. हे मायीनं बघितलं,अनुभवलं. ती इथं जगली. आज माय या जगात शरीररूपाने नसली तरी,ती इथंच या मातीचा भाग बनून राहिलीय. ती दररोज मला भेटते.ती सोबतच असते माझ्या....माझ्या आनंदाने शेतात शारीरिक कष्ट करण्याला ही सगळी पार्श्वभूमी आहे. ही मातीच मला उर्जा देत असल्याने,इथल्या कष्टांचा माझ्या शरीरावर चांगलाच परिणाम होतो. ही मातीच चैतन्यदायी आहे.

सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा परिसर.रुद्रा हट सर्व प्रकारच्या घाणीपासून दूर आहे.आमच्या परिसरातला निसर्ग कोकणापेक्षा कमी नाही. उलट लागवड केल्यामुळे इथं कमी जागेत अधिक वैविध्यपूर्ण फळ,फुलं झाडं आहेत. हलकी जमीन असल्याने,इथं नारळाची झाडं येणार नाहीत. आली तरी त्याला नारळ लागणार नाहीत, असा दावा कृषी क्षेत्रातील एका विद्वानाने सुरूवातीलाच केला होता.

मी नेहमीप्रमाणे त्याकडं दूर्लक्ष केलं. तीन दुष्काळात टँकरने पाणी दिलं. सहा नारळाची झाडं पुरेसे पाणी न मिळाल्याने वाळली. तरीही नऊ नारळाची झाडं वाढली. त्याला भरपूर नारळ लागताहेत. ती फार मोठी न होताच पडतात. वरून बघितलं तर वाटतं... यात काय असणार? मात्र ते फोडलं की,आत पांढरंशुभ्र,गोड खोबर निघतयं. सध्या दररोज ओल नारळ खातोय. असं ताजं खोबर कुठं मिळेल मला? या मातीत कुठलंही फळ चांगलं येऊ शकतं. ही या मातीची किमया आहे.

या मातीत जगण्याची संधी मला मिळतेय, हे माझं सर्वात मोठं भाग्य. सगळ्यात मोठी श्रीमंती! याचं मोल इतरांना कळणं शक्य नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com