River Linking : एकदरे-वाघाड नदीजोड प्रकल्पास मान्यता शक्य

River Project : या प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार ७५३ कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविल्यावर राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.
River Project
River Project Agrowon

Nashik News : जिल्ह्यापेक्षा मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या दमणगंगा (एकदरे)- गोदावरी (वाघाड) या नदीजोड योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार ७५३ कोटी रुपये इतकी आहे. हा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविल्यावर राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

एकदरे-वाघाड नदीजोड प्रकल्पामुळे पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविले जाऊन मराठवाड्यातील १३ हजार हेक्टर सिंचन वाढण्यास मदत होणार आहे. पेठ तालुक्यातील दमणगंगा-एकदरे गंगापूर धरण हा नदीजोड प्रकल्प माजी खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने २०१८ मध्ये निधीही मंजूर केला होता.

River Project
River Linking Project : नदीजोड प्रकल्पातून नांदगावला वगळले

त्यानुसार या नदीजोड प्रकल्पासाठी तीन हजार ५५० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध असल्याचे निश्‍चित करण्यात आले. त्या दाखल्यानंतर या नदीजोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरणाकडे देण्यात आले होते. त्याचवेळी हा नदीजोड प्रकल्प एकदरे-गंगापूर असा करण्याऐवजी ‘एकदरे-वाघाड’ करण्यात आला.

यासाठी पेठ तालुक्यातील एकदरे येथे एक हजार १०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधले जाणार असून, ते पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे दिंडोरी तालुक्यातील झार्ली येथील प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल. तेथून ते वाघाड धरणात सोडले जाणार आहे. वाघाड धरणातून ते पाणी गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात सोडले जाईल.

या धरणातून १५० दशलक्ष घनफूट पाणी पेठ तालुक्यातील धरणालगतच्या परिसरात सिंचनासाठी राखीव ठेवण्यात येणार असून, उर्वरित तीन हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी वाघाड धरणातून गोदावरीच्या माध्यमातून जायकवाडी धरणात सोडले जाणार आहे. यामुळे मराठवाड्यात १३ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र वाढेल.

यंदा जानेवारीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यावर राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने ४ एप्रिल २०२४ ला तो राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सोपविला. गेल्या महिन्यात या प्रकल्पाचे राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. या समितीने त्यात काही बदल सुचविले असून, ते बदल केल्यावर पुन्हा एकदा सादरीकरण होऊन त्याला तांत्रिक मान्यता मिळून तो प्रकल्प राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे पाठविला जाईल. त्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देईल.

River Project
River Linking Project : ‘नदी जोड’मुळे खारपाणपट्ट्याला फायदा

प्रकल्पाची किंमत २,७५३ कोटी रुपये

एकदरा वाघाड नदीजोड प्रकल्प उभारण्याची किंमत एक हजार ९१० कोटी रुपये असून, उपसा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पाचा खर्च मिळून किंमत दोन हजार ३६३ कोटी रुपये होते. त्यात जीएसटी व इतर बाबींचा समावेश करून या प्रकल्पाची एकूण किंमत दोन हजार ७५३ कोटी रुपये होते.

पाच वर्षांत होणार प्रकल्प

या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर प्रकल्पाची त्यानंतर पाच वर्षांत उभारणी होऊ शकते, असे नियोजन आहे. हा पूर्ण प्रकल्प वनजमिनीवर उभारला जाणार असल्याने त्यासाठी खासगी जमिनीच्या भूसंपादनाची गरज नसल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल.

...असे उचलणार पाणी

दमणगंगा (एकदरे)-गोदावरी(वाघाड) नदीजोड प्रकल्पासाठी पश्चिम वाहिनी दमणगंगा नदीवर एक हजार १५० दशलक्ष घनफूट क्षमतेचे एकदरे धरण प्रस्तावित आहे. एकदरे धरणातील उपलब्ध होणारे तीन हजार ५५० दशलक्ष घनफूट पाणी तीन टप्प्यांत उपसा पद्धतीने उचलून त्यातील तीन हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी दिंडोरी तालुक्यातील झार्लीपाडा प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल. तेथून ते पाणी प्रवाही पद्धतीने वाघाड धरणात जाईल. त्यापुढे वाघाड धरणातून त्याचा विसर्ग करून मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात प्रवाही पद्धतीने सोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे मराठवाड्यात १३ हजार १६४ हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मिती होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com