Pune News : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे हवेली तालुक्याचे महसुली विभाजन करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर येथे आणखी एक अप्पर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कामांसाठी होत असलेली ससेहोलपट थांबणार आहे.
हवेली तालुक्याचे विभाजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २०१५ पासून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी वारंवार चर्चा करूनदेखील मान्यता मिळत नव्हती. त्यानंतर नागरिकांकडूनही त्याबाबत मागणी करण्यात येत होती. अखेर शासनाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे.
हवेली तालुक्यात कामाचा व्याप वाढत असल्याने प्रलंबित कामांची संख्या मोठी आहे. कामे वेळेत आणि वेगाने होण्यासाठी पूर्व आणि पश्चिम हवेली असे दोन तालुके निर्माण करायचे अथवा हवेली तालुक्यात दोन अपर तहसीलदार नेमायचे असा प्रस्ताव २०१५ मध्ये शासनाकडे पाठविला होता. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता.
दरम्यान हवेली तहसीलचे विभाजन दोन ते तीन महिन्यात येणार असल्याची घोषणा डिसेंबर २०२२ मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. अखेर ११ महिन्यांनी महसूलमंत्र्यांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब झाले.
पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात हवेली तालुक्याचा विस्तार आहे. तालुक्यातील काही गावांचा समावेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये होतो. चारही बाजूंनी तालुक्याचा विस्तार वेगाने होत आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे २८ लाखांहून अधिक आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणात असल्याने उद्योग, व्यवसाय वेगाने वाढत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्यात महसूल विभागावर कामाचा व्याप वाढत आहे.
असे असणार कार्यक्षेत्र :
कार्यालयाचे नाव --- महसूल मंडले -- गावांची संख्या
तहसीलदार हवेली -- खडकवासला, कोथरूड, हडपसर, खेड शिवापूर, कळस - ८६
अपर तहसीलदार लोणी काळभोर -- वाघोली, उरुळी कांचन, थेऊर - ४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.