
Jalgaon News : चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Chalisgaon Agriculture Produce Market Committee) कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.
पत्रकात म्हटलेले आहे, की २०२२ -२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
यासाठी सोमवारी ३ ते २० एप्रिलपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन पणन संचालक यांनी केलेले असून, त्यानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना २०२२ -२०२३ चा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.
तरी शेतकऱ्यांनी अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विक्री केलेल्या कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात/बारा उतारा, बँक पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.
अर्ज कांदा विक्री केलेल्या बाजार समितीतून घ्यावा. संबंधित बाजार समितीच्या कार्यालयात मुदतीत अर्ज करावा. त्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही पत्रकात नमूद केलेले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.