Monsoon Season : निसर्गासोबत गावातही चैतन्य पसरवणारा मृग आरंभ

Monsoon Season Update : आकाश पूर्ण निळं निळं झालंय. त्या खालून ढगाची पुंजकी पळत सुटली आहेत. माळाला छाया-प्रकाशाचे विलोभनीय लपंडाव सुरू झालेत. नवीन ऋतूची सुरुवात झाली आहे.
Monsoon Season
Monsoon SeasonAgrowon

जयंत खाडे

Monsoon Update : मृगाची सुरुवात झालेली. दोन महिने या माळाला ठाण मांडून राहिलोय. सुट्टी पडली त्याच दिवशी आलोय. गेली दोन महिने माळ चांगलाच तापून निघालाय. पहिल्यांदा त्याला नांगरला नंतर त्यात चांगली वीस-बावीस दिवस मेंढरं जागा बदलून बदलून बसली.

दोन-तीन वळवांत सगळी ढेकळं विरघळलेली आणि आता माळ लोण्यासारखा मऊ झालाय. बोटसुद्धा खसकन आत जायला लागले आहे. परत मेहनती सुरू झाल्यात. सड, काटे, विस्कटलेल्या खतातील न कुजणाऱ्या वस्तू वेचून काढल्यात.

तालीवरील गवत उन्हाने वाळून गेलंय. उरलेलं थोडं थोडं जित्रापांनी पार चाटून खाल्लंय. बाभळीचे पडलेले काटे तात्यांनी एकेक वेचून पेटवून दिलेत. झिपऱ्या वाढवल्या पोराचे जावळ काढावं तशा ताली झाल्या आहेत.

वळवाच्या पावसात झाडावरचे आंबे निम्याने झडले होते. उरलेले आंबे पंधरा दिवसांपूर्वीच उतरले आणि मोठ्या हऱ्यात पिकवत ठेवले होते. सगळ्या पोरांनी आंबे खाऊन फेकलेल्या कोयांनी अंगण भरून गेलंय. विहिरीची पण स्वच्छता झाली आहे. पाटात एक महिना थेंबभरसद्धा पाणी नाही.

त्यातला दगड, गाळ खोऱ्याने ओढून बाजूला लावला आहे. विहिरीच्या कठड्यात पाय घट्ट रोवून उभारलेल्या महाकाय पिंपळाची पाने वाऱ्याने विलक्षण लयीत झुंबरासारखी डुलायला लागलीत आणि त्यावर लुब्ध होऊन एक धनचिडीची जोडी खालच्या फांदीवर खेळताना दिसली. काल रात्री मी विहिरीवर झोपलो होतो, पहाटे वरतीकडून सुटलेल्या वाऱ्याने जाग आली.

वारा वरून पहाडी सूर कानावर सोडून जात होता. तालीवर जाऊन पाहिले तर खळ्यावर चक्क भीमाण्णा गाताना दिसला. सगळा माळ त्या स्वर्गीय सुरात न्हात होता. हे विभ्रम दूर होईपर्यंत मला अपूर्व सुख मिळाले होते.

Monsoon Season
Orange Cultivation : तंत्रज्ञान अंगीकारून मृग बहर नियोजन करा

खालच्या तुकड्यात सरी सोडली आहे. एखाद्याने पट्टी घेऊन रेषा आखाव्यात तशी सरी उजरून घेतली आहे. भोंड्यावर पाय ठेवला, की भुसभुशीत माती सरसर खाली येते. पडक्या विहिरीवरील करंज्याच्या झाडावर एकही करंजी दिसत नाही. झाडावरील ओल्या वाळल्या सगळ्या करंज्या पोरांनी दोन महिने झाडून काढल्या आहेत.

पडक्या विहिरीतल्या चगाळ्यात सुद्धा करंजी सापडणार नाही इतकी चाळण केली आहे. झाडावरची पक्ष्यांची घरटी मात्र पडणार नाहीत, याची काळजी पोरांनी घेतली आहे. एक दोन पडलेली घरटी निगुतीने फांदीला टांगलेली. झाडावर अजून मोठे मुंगळे फिरताना दिसले. करंज्या झाडताना हेच मुंगळे डसायचे.

अगदी तोडून काढले तरी त्यांची नांगी निघायची नाही. आता यांना पक्षी टोचून खातील. समोरच्या रानात भारद्वाज दिसला. रमत गमत मोकळ्या रानातील किडे टोचून खात असावा. मोठा शुभशकून झाला म्हणून हात जोडले.

पांदीच्या झाडाखाली दाजी आप्पा बसलेले. आज मात्र त्यांनी अंगावर पूर्ण कपडे घातलेत. डोक्यावर पटका मुंडाशासारखा गुंडाळला असून कानसुद्धा पार झाकून टाकलाय. उन्हाळ्यात आप्पा केवळ धोतर लावून उघड्या अंगाने पाठीवर हात जाईल तिथपर्यंत चोळत बसायचे. उन्हाच्या तडाख्याने त्या वृद्ध शरीराची लाही लाही होत होती.

आता आंबे निघालेत तशी राखण्याची गरज नाही पण अप्पा पोखरणीवरून चालत आलेले आहेत. लांबून त्यांना दादा आवाज देतो. ते उत्तर हाताने देतात आणि दादा सारटी सोडलेल्या रानातून चालत चालत त्यांच्या जवळ जातो. त्यांना ऐकू जाईल इतक्या अंतरावरूनच बोलायला सुरुवात करतो.

‘‘काय, घरात गप बसवत नाय का? आता मिरगं सुरू झालंय, गार वारं सुटायला लागलंय.’’

‘‘आगा, नुसतं वारं हाय, ते बेनं आसं सवन येतंय व्हय?’’

‘‘न येऊन कुठं जातंय, येणारच की, पुढं-मागं होणार पण येणारच की.’’

अप्पांशी बोलणं चालू होतं. त्यात मग पुन्हा पुन्हा ऐकलेल्या पावसाच्या गोष्टी. या वर्षी असं झालं अन् त्या वर्षी तसं झालं. एकदा ऐन पेरणीत फजिती झाली तर एकदा मळणीत त्यानं धुडगूस घातला. हे कितीही वेळा ऐकलं तरी त्याचा कंटाळा येत नाही. इतक्यात पांदीतून पावशा पक्षी शीळ घालायला सुरुवात करतो. अप्पा खुशीत थरथरती मान डोलावत बोलतात,

‘‘पेरतं व्हा, पेरतं व्हा’’

अरेच्चा, हे सांगतो का पावशा? मला आज समजलं की. मी उठून पांदीकडे आवाजाच्या दिशेने पळत सुटलो. आवाज येत होता पण पावशा दिसेना. वर पाहून पाहून मान अवघडली. मग पांदीत खाली उतरून रस्त्याने वर चालत आलो. तिथे गार वारा जोरात वाहत आहे.

पांदीच्या तोंडावर आपुगडे वस्तीवरील वेडी म्हातारी बसलेली. आता तिची भीती वाटत नाही. तिच्याकडे मी टक लावून पाहतो. तिचा चेहरा निस्तेज, डोळे कोरडे, डोक्यावरील सगळे केस गेलेले आहेत. तोंड नेहमी बंद, जेवताना तरी उघडते का नाही कुणास ठाऊक? पांदीच्या वरच्या अंगाला सावळा शेळ्या आणि कोकरं हिंडवत आलेला.

तसा तो त्याच्या वस्तीच्या मागच्या डोंगरावर असतो, आज इकडे आलेला. हातातील जर्मनची थाटली काटकीने वाजवत भसाड्या आवाजात गाणं म्हणतोय. ठेका मात्र गड्यानं जोरात धरलाय.

‘पोरी जरासं लावशील का ...’

गाणं म्हणताना तालात मान हलवतोय का मला बोलवतोय हेच कळेना. पण मी लक्ष न देता वर चालायला लागलो तर वरतीकडं तोंड करून आणखी जोरात गायला लागला. मला गंमत वाटली मग मी मुद्दाम त्याचाकडे न पाहता पुढे निघालो.

आकाश पूर्ण निळं निळं झालंय. त्या खालून ढगाची पुंजकी पळत सुटली आहेत. अगदी दुपारीसुद्धा थेट वर पाहता येते. माळाला छाया-प्रकाशाचे विलोभनीय लपंडाव सुरू झालेत. नवीन ऋतूची सुरुवात झाली आहे.

पण काय ठाऊक एक मोठी उदासी सगळ्या मनावर पसरलेली आहे. पण मग लक्षात येते आता शाळा सुरू होणार, गाव सुटणार. एक मोठा जड धोंडा छातीवर असल्यासारखे वाटते. हे टाळता येणार नाही याची पूर्ण जाणीव पण आहे.

वस्तीवरील खोप शेकरून घेतली आहे. पुढचा मांडव पण काढला आहे. जनावरांची पावसाळ्यातील सोयसुद्धा झाली आहे. आता माळाची वस्ती बंद झालेली आहे. दोन्ही बैलं अजून छपराबाहेरच बांधलेली. रानाच्या मेहनतीमध्ये त्यांचा पिट्टा पडलेला. बाकीची जनावरं आत बांधलेली. पाय मोडकी गाय अजून उभीच राहिलेली, दिवस मोजत.

सगळ्या मुक्या जित्रापाला नवीन ऋतूची जाणीव झालेली. दिवसभर खिदळत संगतीला असणाऱ्या पोरांचा गोतावळा अचानक गायब झालेला. वाटणीला आलेल्या मुक्या जिवांना सुट्टीत ‘माझं माझं’ म्हणत वैरण-पाणी करणाऱ्या, उन्हानं हैराण झाल्यावर पाटात धुणाऱ्या, गळ्यात मिठी मारणाऱ्या, अंगाखांद्याला झोंबणाऱ्या, बाभळीच्या पिवळ्या फुलांचे आणि खुळखुळणाऱ्या शेंगांचे हार घालून पैजेवर नटविणाऱ्या पोरांचा जोसरा काढल्यासारखी सगळी जित्रापं शांत बसलेली.

Monsoon Season
Orange Cultivation : तंत्रज्ञान अंगीकारून मृग बहर नियोजन करा

सगळ्या घरात पेरणीची तयारी सुरू आहे. भुईमुगाच्या शेंगा फोडून फोडून प्रत्येकाच्या अंगठ्याला फोड आलेत. घरात सगळ्या फोलपाटं झाली आहेत. लहान पोरं त्या फोलपाटात दिवसभर खेळत राहतात. माळ्यावरून हऱ्यात, डब्यात राखेत मिसळून ठेवलेले तूर, मूग, उडीद चाळून एकेका पिशवीत भरायचं सुरू आहे.

पोरांची पण धादल सुरू आहे. जून तेराला शाळा सुरू होणार. प्रत्येक जण पुढच्या वर्गातल्या पोराला गाठून जुनी पुस्तकं जमवायच्या नादात आहे. जुन्या वहीतली कोरी पाने काढून त्याची वही शिवत आहेत. शिवलेल्या वह्या, पुठ्ठा घातलेली पुस्तकं घट्ट बसवीत म्हणून अंथरुणाखाली ठेवत आहेत.

रात्री मधल्या घरात आणि सोप्यातल्या सामाईक दिव्याच्या अपुऱ्या प्रकाशात पोरं ही कामे करीत आहेत. बापू म्हणतोय

‘‘आता पाचवीला गणिताला कुलकर्णी हाय, बुकलून काढतोय पोरांस्नी, न्हाय काय आलं तर.’’

ते ऐकून सकुचा चेहरा जणू आताच तिला मास्तरांचा मार बसल्यासारखा झाला. आक्का मराठी शाळेतून पाचवीला जाणाऱ्यांना स्पेलिंग पाठ करण्याचा सल्ला देते. नाही स्पेलिंग पाठ झाले तर परत मराठी शाळेत पाठवतात हे दाखला देऊन सांगते. शाळेच्या साहित्याची निगुतीने व्यवस्था करणारी पोरं पुस्तक उघडून सुद्धा पाहत नाहीत. ‘अनामविरा’ ही कविता मात्र पाठ झालीय. मला पण ही कविता खूप खूप आवडते. सतत या कवितेच्या ओळी ओठांवर येतात.

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा,

मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

खरं तर मला गावातल्या शाळेत जायचे आहे. या शाळेच्या कोणत्याही वर्गातून बाहेर पाहिले की शेतं दिसतात. अगदी आमची पोखरवाटेची पट्टीसुद्धा दिसते. लोकं रानात टोकताना, पेरताना, मेहनत करताना दिसतात. पावसाची चळक येते आणि जाते. हिरवे कोंब फुटताना पाहिले की खूप मस्त वाटते. मन आनंदून जाते.

पहिल्यांदा टोकलेले उगवून येते. त्या वेळी रांगोळीचे हिरवे ठिपके दिल्यासारखे दिसते. मग हळुहळू पिके जोम धरतात. तण काढले की पुन्हा मस्त सरळ रेषा. दररोज नवीन बदल. मध्येच मग झडीचे दिवस सुरू होतात, सततधार पडायला लागते.

ताली, ओघळ, ओढे भरून वाहायला लागतात. रानाची घात गेल्याने सगळी कामं बंद होतात. उगीच तालीवरून माणसं अंगावर पोत्याची खोप धरून रानाकडे बघत राहतात.

सुट्टीदिवशी सगळी पोरं रानात पळतात. रानातले काम करा नाहीतर भटकत राहा नुसते. आमच्या खोरीच्या रानात जाताना तर तलाव लागतो. बरा पाऊस झाला की तलावात पाणी येतं. त्या गुडघाभर पाण्यातूनच रानात जायचे.

लागून संतोषगिरीचा डोंगर. डोंगरावर करवंदाच्या जाळ्याची करवंदं जूनच्या सुरुवातीला पिकतात. वरच्या बंधाऱ्यावरील जांभळाच्या झाडालाही त्याच वेळी जांभळं पिकतात. झाड नुसतं जांभळानं लखडून जातं. पोरं रानात गेली की जेवतच नाहीत; फक्त करवंद, जांभळं खाऊन पोट भरते.

एकदा रविवारी तोंडभर भंडारा लावलेला धयाबाच्या देवळातला पुजारी संतोषगिरीवर जाताना भेटला. त्याला सगळे देवा म्हणतात. मुलं, बायका तो रस्त्यांवरून जाताना दिसला की त्याच्या पाया पडतात. मग तो त्यांच्या तोंडाला भंडारा माखतो.

देवाने करवंद खाणाऱ्या पोरांना हाक दिली. पोरं त्याच्या पाया पडली. भंडारा तोंडाला लावताना तो म्हणाला, ‘‘ए, ही करवंद, जांभळं खाऊ नका लेकानो. ती पाखरांची भाकरी हाय. राहुदे त्यास्नी. पाखरं करवंदं खातील आणि शिटातून त्याचं बी डोंगरावर टाकतील. मग सगळीकडं करवंदाच्या जाळ्या उगवतील.’’

मी म्हणालो, ‘‘आमी पण बी टाकतोय हितंच.’’

तर गडागडा हसून तो म्हणाला, ‘‘तसं जमत नाही, पाखरांनीच टाकावं लागतंय.’’

हे लई भारी सांगितलं देवानं. पण पोरं कुठं ऐकत्यात. दिवसभर जाळ्यांची चाळण केली. रात्री स्वप्नात संतोषगिरीवर सगळीकडे उगवलेल्या करवंदाच्या जाळ्या आणि जांभळाची झाडे येतात आणि त्यात गडागडा हसताना देवा दिसतो.

मी पण जुनी पुस्तकं आदिककडून घेतली आहेत. आमच्या शहरातील शाळेतून बाहेर फक्त ग्राउंड दिसते. शहरात जिथे तिथे इमारती आणि डांबरी रस्ते. तिथे गावाकडची मजा येत नाही. आज खोलीत जाऊन आरशात तोंड पाहिले. ओठावर आंब्याचा चिक उठलाय. उन्हाने रापून मूळचा काळा चेहरा आणखी काळा पडलाय.

दोन दिवसांपूर्वीच बयत्याच्या न्हाव्याने केस कापून सगळा गोटा केलाय. हाता पायावर ओरखडे उठलेत. गुडघ्यावरील जखमेने आताच खपली धरलीय. अगदी ध्यान झालंय, तिथे मित्र ओळखतील तरी का? पण दरवर्षी प्रमाणे आता जावेच लागेल. आपल्या हातावरील रेषा तेच सांगत आहेत.

(लेखक जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com