Animal Feed Management : पशू-आहारावरील खर्च कमी करण्याचे उपाय

Feed Management : कच्चा माल, खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
Animal Feed Management
Animal Feed ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. पराग घोगळे

Animal Care : कच्चा माल, खाद्य आणि चाऱ्याच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी केलेल्या उपाययोजनांमुळे पशुआहारावरील खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. आहारावरील खर्च कमी करण्याबरोबरच येणाऱ्या काळातही शक्य तितके दूध उत्पादन टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.

ज्यावेळी विविध प्रकारचा चारा व पशुखाद्यातील कच्चा माल यांचा वर्षभरात काही महिने दर कमी असतो. पिकाच्या कापणी प्रमाणे हे महिने बदलतात यावेळी उत्पादन जास्त असल्याने चारा किंवा कृषी उपपदार्थ कमी किमतीत उपलब्ध असतात, याचवेळी त्यांचा साठा करून ठेवल्यास पुढचे ६ ते ९ महिने गायी-म्हशींसाठी पशुआहाराची तरतूद कमी किमतीत करता येते. पुढे जाऊन या आहारघटकांची टंचाई निर्माण झाल्यास दर वाढत जातात, त्यामुळे अशा आहार घटकांचे साठा करणे क्रमप्राप्त ठरते.


उदाहरणार्थ ः मुंबई येथील डेअरी फार्ममध्ये म्हशींना भाताचा पेंढा खाऊ घातला जातो. पावसाळ्यानंतर हा भाताचा पेंढा २०० ते ३०० किलो गठ्ठे स्वरूपात साठवला जातो, त्याला कमी जागा लागते. अशाच प्रकारे गव्हाचा गव्हांडा, ज्वारी व बाजरीचा कडबा इत्यादी कोरडा चारा खरेदी करून सहकारी तत्त्वावर दूध उत्पादक, सोसायटी ई. संस्थांनी एकत्र येऊन जितके जास्त पशुखाद्य, चारा, पुरके इत्यादीची खरेदी केल्यास जितका जास्त कच्चा माल एकत्र विकत घेतला जाईल, तितकी त्याची किंमत कमी करून घेता येईल. वाहतुकीचा खर्च कमी होईल.

Animal Feed Management
Animal Feed : पशू आहारातील पोषक तत्त्वांचे महत्त्व

कच्या घटकांची खरेदी ः
१) पशुखाद्य, चारा, कच्चा माल खरेदी करताना तो केवळ चांगला दिसतो म्हणून नव्हे, तर त्यातील पोषक घटक तपासून घेतले पाहिजेत. यासाठी पुरवठादाराकडे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील प्रमाणपत्राची मागणी करावी. त्यामुळे दिलेल्या किमतीत योग्य माल मिळाला याची खात्री करता येईल.
२) खरेदी केल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची व इतर खाद्य चारा इत्यादीच्या किमतींची दुसऱ्या पुरवठादारांकडून माहिती करून घ्यावी. योग्य त्या किमतीत कच्चा माल खरेदी करावा. तसेच त्याचे योग्य वजनही असल्याची खात्री करून घ्यावी.

३) कच्चा माल खरेदी करताना त्यातील आद्रता (पाण्याचे प्रमाण) कमी असेल तर तो माल जास्त काळ टिकेल. जास्त आद्रता असलेला कच्चा माल बुरशी लागून लवकर खराब होऊ शकतो, त्याचा दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून कच्चा माल साठवणूक करताना योग्य काळजी घ्यावी. कच्या माल, मूरघासाच्या बॅग उंदीर व घुशींपासून सुरक्षित ठेवाव्यात.
४) मोबाईलच्या माध्यमातून विविध प्रकारचा कच्चा माल, त्याचे दर याची माहिती घ्यावी. केवळ काही मोजका कच्चा माल जसे की, सरकी पेंड, मका भरडा, गहू भुसा, इत्यादीवर अवलंबून राहू नये. तज्ञांचा सल्ला घेऊन नवीन प्रकारचे खाद्य किंवा कच्चा माल जसे की सरकी डीओसी, मोहरी डीओसी, सोयाबीन डीओसी, शेंगदाणा डीओसी इत्यादी. आपल्या गाई म्हशींच्या खाद्यात किती प्रमाणात वापरता येईल आणि खाद्याची किंमत कशी कमी करता येईल याची माहिती घ्यावी.

५) तेलयुक्त पेंडी लवकर खराब होण्याची शक्यता असते तसेच त्यात अफलाटॉक्सीन हे बुरशीयुक्त विषारी तत्त्व वाढण्याची शक्यता असते. त्याचे विपरीत परिणाम शरीरावर व प्रजनन संस्थेवर होऊ शकतात.
६) गाई, म्हशीच्या खाद्यात बदल करताना अतिशय हळुवारपणे करावेत. नवीन घटक खायला द्यावेत. टीएमआर पद्धतीने म्हणजे सर्व खाद्य घटक व चारा इत्यादी एकत्र एकजीव करून खाऊ घातल्यास नवीन घटक खाऊ घालण्याची सवय लवकर लावता येईल.

मूरघासाचे महत्त्व:
१) हिरवा चारा जनावरांना नेहमी व एकसारखा वर्षभर मिळण्यासाठी मूरघास करून वापरला जाऊ शकतो. यामध्ये मका हा प्रामुख्याने
वापरला जातो. ८० ते ८५ दिवस वाढ झालेला, कणसासहित कुट्टी केलेल्या मक्याचे चांगले मूरघास बनविता येऊ शकते.

२) मूरघास बनवताना चारा बेल बॅग किंवा बंकर स्वरूपात हवाबंद अवस्थेत कमीतकमी ३५ दिवस राहिला तर त्याचा चांगला मुरघास होतो अन्यथा त्याला बुरशी लागून तो खराब होऊ शकतो. चांगला मुरघास बनविण्यासाठी त्यात लॅक्टोबॅसीलस, बॅसिलस व इतर जिवाणूंचे कल्चर वापरता येते, जेणेकरून किण्वनप्रक्रिया वेगाने होते. मुरघास हवाबंद स्थितीत ठेवल्यास वर्षभर वापरता येते.

लसूणघास :
१) पशू आहारामध्ये जास्त खर्च हा प्रथिनांवर होतो. १ किलो हिरव्या मक्यामध्ये कोरड्या तत्त्वावर केवळ ६० ते ७० ग्रॅम प्रथिने मिळतात आणि १ किलो लसूण घास खाऊ घातल्यास कोरड्या तत्त्वावर २०० ग्रॅम प्रथिने जनावरांना मिळतात. तेवढी प्रथिने पशू खाद्यामधून कमी करता येतात, उदा. ५ किलो ओल्या लसूण गवतामागे १ किलो पशू खाद्य कमी करता येऊ शकते.

आहारात पाचक व पूरक घटकांचा वापर :
१) गाई,म्हशींना त्यांच्या वजनाप्रमाणे आणि दूध उत्पादनाप्रमाणे नेमके व मोजून पशुखाद्य, चारा दिल्यास होणारा अतिरिक्त खर्च टाळता येईल. दुभत्या गाई, वासरे ,कालवडी, गाभण गाय, बैल यांना मोजून खाद्य व चारा द्यावा म्हणजे अनावश्यक खर्च कमी करता येईल. पशू आहाराची नासाडी टाळता येईल.
२) उपलब्ध असलेल्या चारा , खाद्य घटकांचे पचन अधिक वाढविण्यासाठी सूक्ष्म पोषक तत्त्वांचा वापर करावा. यामध्ये प्रामुख्याने ऊर्जेसाठी बायपास फॅट तसेच प्रजननासाठी कॅल्शिअम व इतर नैसर्गिक खनिजे, योग्य पचनासाठी रुमेन बफर व लाइव्ह यीस्ट, अॅसिडीटी रेगुलेटर, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन तसेच दूध वाढीसाठी व पान्हा सुटण्यासाठी आयुर्वेदिक औषधींचे अर्क यांचा समावेश होतो. पशुवैद्यक तज्ञांच्या सल्यानुसार पुरकांचे मिश्रण पशू आहारात दिल्यास दुभत्या गाई,म्हशी वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास, प्रकृती अंक उत्तम राहण्यास, दिलेल्या चारा व खाद्याचे योग्य पचन होण्यास तसेच दूध व फॅट वाढण्यास मदत होते.

चारा टंचाईच्या काळातील आव्हाने ः
- दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात सातत्य ठेवणे.
- जनावरांचे शरीरस्वास्थ्य टिकवून ठेवणे.
- परवडणाऱ्या किमतीत चारा, खाद्याची उपलब्धता करणे.
- उपलब्ध चारा व खाद्य मोजून देणे, नासाडी टाळणे.
- दुभती व गाभण जनावरे,वासरे, बैलांना वजनाप्रमाणे खुराक देणे.
-
वजनाप्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन ः
सरसकट सर्व जनावरांना गव्हाण भरून एकसारखा चारा देण्यापेक्षा जनावरांच्या वजनाप्रमाणे खाद्य व चाऱ्याचे नियोजन केल्यास खर्चात बचत होऊ शकते.
प्रथम जनावराचे वजन करावे. त्यासाठी खालील सूत्राचा वापर करावा.
{जनावराच्या छातीचा घेर (इंच)}२ x लांबी (इंच) = जनावराचे वजन (किलो)
६६०
उदाहरणार्थ ः {६६ x ६६ } x ७० / ६६० = ४६२ किलो वजन
जनावराच्या छातीचा घेर म्हणजे पुढील दोन्ही पायामागून मोजलेला छातीचा घेर इंचामध्ये त्याचा वर्ग, गुणिले जनावराची लांबी म्हणजे पुढील पायाच्या खुब्यापासून ते शेपटा पर्यंतचे अंतर इंचामध्ये भागिले ६६० बरोबर जनावराचे अंदाजे वजन किलोमध्ये आपल्याला मिळते.

वजनानुसार गाई, म्हशींना खाद्य व चारा देण्याचे प्रमाण :
जनावराचे वजन(किलो)---एकूण शुष्क पदार्थ (वजनाच्या ३ टक्के)---पशुखाद्य ( किलो)---कोरडा चारा ( किलो) हिरवा चारा ( किलो) --- एकूण खाद्य आणि चारा
४०० ---१२ किलो---५.५ ---४ ---१८ ---२७.५
४५० ---१३.५ किलो---६ ---४.५ ---२० ---३०.५
५०० ---१५ किलो---६.५ ---५ ---२२ ---३३.५
५५० ---१६.५ किलो---७ ---५.५ ---२५ ---३७.५

टीप:
१) शुष्क पदार्थ म्हणजे चारा, खाद्य इत्यादी मधून पाणी वजा केले असता उरणारा कोरडा पदार्थ (शुष्क पदार्थ म्हणजे कोरडा चारा नाही)
२) पशुखाद्य ,कोरडा व हिरवा चारा यांचे प्रमाण आद्रतेसह गृहीत धरले आहे. त्यांची एकूण बेरीज दिलेली आहे
३) वरील प्रमाण हे २४ तासांचे असून दोन वेळेस विभागून जनावरांना देण्यात यावे.
४) हिरवा चारा उपलब्ध नसल्यास कोरडा चारा वाढवून द्यावा.

संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
( लेखक पशू आहार तज्ज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com