Mahesh Jamale : अन् 'आयुष्याचा ताळेबंद' बांधण्यास शिकलो !

Article by Sudarshan Sutar : बार्शी-लातूर रस्त्यावरील कसबे तडवळा (ता.जि. धाराशिव) हे सुमारे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावाला भेट दिली होती.
Mahesh Jamale
Mahesh JamaleAgrowon

Agriculture Article : बार्शी-लातूर रस्त्यावरील कसबे तडवळा (ता.जि. धाराशिव) हे सुमारे पंधरा हजार लोकसंख्येचे गाव. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावाला भेट दिली होती, असा संस्मरणीय इतिहास माझ्या गावाला आहे. मुख्यतः खरिपात सोयाबीन आणि रब्बीत ज्वारी, हरभरा ही आमची पीक पद्धती.

त्याशिवाय तूर, ऊस आणि अन्य काही हंगामी पिकांची लागवड असते. आम्हाला पाण्याचा मोठा नैसर्गिक स्रोत नाही, विहीर आणि कूपनलिकेच्या पाण्यावरच आमची शेती. गावाच्या उत्तरेला माझी वडिलोपार्जित ३२ एकर शेती आहे. वडील सोमनाथ जमाले हे पदवीधर असून, पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने शेती करायचे.

मला तसा शिक्षणात फारसा रस नव्हता, १०-१५ वर्षांपूर्वी मी बारावीतून बाहेर पडलो आणि शेतीमध्येच रमलो. आज अर्धवट शिक्षणामुळे थोडा पश्‍चात्ताप होतोच, पण त्याच्याशिवाय माझी गाडी कुठे अडली नाही, हेही वास्तव आहे. मी शेती करत गेलो, शिकत गेलो आणि माझा अनुभव अधिक समृद्ध झाला.

शेती हीच माझी शाळा आणि त्यातले प्रयोग हेच माझे शिक्षण झाले. आज शेतीमधील विविध प्रयोगांनी मला राज्यभर नाव दिलं. वडील सोमनाथ, आई सौ. पद्मिनी, पत्नी सौ. पूजा आणि माधुरी, गोजिरी या मुली आणि मुलगा युवराज यांची मला खंबीर साथ आहे. त्यांच्या पाठबळावरच शेतीमधील आश्‍वासक प्रवास सुरू आहे.

Mahesh Jamale
Success Story : फळांची टिकवणक्षमता वाढवणारा युवकांचा ‘स्टार्ट अप’

टर्निंग पॅाइंट...

माझ्या शेती प्रयोगाची कहाणी काहीशी वेगळी आहे. अनेक चढ-उतार आले, वळणे आली, पण मी प्रवास करत राहिलो. २००९ मध्ये मी पहिल्यांदा संकरित भेंडी लागवडीचा प्रयोग केला. त्या वेळी पाऊण एकरात तब्बल ३२ हजारांचे उत्पन्न मिळाले. अवघ्या तीन महिन्यांत मिळालेल्या उत्पन्नाने उत्साह चांगलाच वाढला आणि शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भेंडी लागवडीचा हा प्रयोग माझ्यासाठी टर्निंग पॅाइंट ठरला. त्यानंतर मग ऊस, केळी यांसारख्या पिकाकडे वळलो.

कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन

शेतीमधील पीक बदलाच्या प्रयोगासह मी सेंद्रिय शेतीमधील प्रयोगांवर अधिक लक्ष केंद्रित केले. पण सूत्र काही सापडत नव्हते. २०१६ मध्ये तुळजापुरातील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात आलो. तिथे मला गांडूळ खत निर्मितीचे २१ दिवसांचे प्रशिक्षण मिळाले. विषय विशेषज्ञ (मृदाविज्ञान) डॉ. भगवान आरबाड, विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) प्रा. अपेक्षा कसबे यांनी योग्य मार्गदर्शन केले. शेतीला आवश्यक असणाऱ्या पूरक उद्योगाचीही माहिती घेत गेलो. आजही मी या केंद्राच्या संपर्कात आहे. येथूनच मला नवीन तंत्रज्ञानाची दिशा मिळाली.

Mahesh Jamale
Farming on Solar Energy : बेंबळे गावकऱ्यांनी फुलविली सौरऊर्जेवर शेती

सेंद्रिय कर्ब सव्वा टक्क्यावर...

माझ्याकडे गायी, म्हशी आणि शेळ्या आहेत, गांडूळ खतही मी तयार करतो. त्यामुळे बाहेरून कोणतीही रासायनिक खते, कीडनाशक न आणता, सेंद्रिय खते आणि जैविक कीटकनाशके शेतातच तयार करून वापर वाढवला. सेंद्रिय खताच्या पुरेपूर वापरातून जमिनीची सुपीकता चांगली वाढली आहे. सेंद्रिय कर्ब सव्वा टक्क्यापर्यंत वाढला आहे, जो पूर्वी ०.५ टक्क्याच्याही खाली होता. केवळ सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले. सध्या मला उसाचे एकरी ७० ते ८० टन, केळी २५-३५ टन, सोयाबीन ९-१० क्विंटल, रब्बी ज्वारी १०-१२ क्विंटल आणि हरभरा ४-५ क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.

यवतमाळचे प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांचे सरी वरंबा पद्धतीचे प्रयोग, शिवाय कमी पाण्यावरील शेती नियोजन, सेंद्रिय पद्धतीच्या शेती पिकांची माहिती वाचनात आली. त्यांचे मी अनुकरण केले. त्याचाही मोठा फायदा दिसतो आहे. आज नव्याने सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या गावातील १० तरुण शेतकऱ्यांचा शिवछत्रपती सेंद्रिय शेतकरी गट स्थापन केला आहे. मी स्वतः गटाचा अध्यक्ष आहे. सेंद्रिय उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करतो. त्यासाठी स्वतंत्रपणे ग्राहकांचे काही गट तयार केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com