Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी ६५.४१ टक्के इतके मतदान झाले. २०१९ विधानसभा निवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते, या दोन्ही निवडणुकीचा विचार करता, यंदा वाढणारा हा पाऊण ते एक टक्का महायुती की महाविकास आघाडी, कोणाच्या पारड्यात प़डणार, याचा निकाल उद्या शनिवारी (ता.२३) लागणार असला, तरी याबाबतची उत्सुकता मात्र शिगेला पोचली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदारांपैकी २५ लाख १७ हजार ३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केलेल्यांमध्ये १३ लाख १७ हजार ३६४ पुरुष मतदार आणि ११ लाख ९९ हजार ९१२ महिला मतदारांचा समावेश आहे. मागच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६४.५९ टक्के मतदान झाले होते.
यंदा ६५.४१ टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही निवडणुकांतील मतदानात पाव ते एक टक्क्यांचा फरक आहे. पण यंदा हा वाढणारा टक्काच महायुती की महाविकास आघाडी, यापैकी कोण हे ठरवणार आहे.
जिल्ह्यात बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माळशिरस, सोलापूर उत्तर या मतदारसंघात थेट दुरंगी लढती झाल्या, करमाळा, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा, माढा, सांगोला, सोलापूर मध्य याठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती झाल्या. त्यामुळे याठिकाणी अधिक चुरस आहे. विशेषतः माढा, करमाळा आणि दक्षिण सोलापुरात अपक्ष उमेदवारांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत १० लाख २४ हजार १६३ महिलांनी मतदान केले होते, पण त्यानंतर जाहीर झालल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा परिणाम आता दिसून आला असून, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ११ लाख ९९ हजार ९१२ महिलांनी मतदान केले आहे.
या निवडणुकीत १ लाख ७५ हजार ७४९ महिलांचे मतदान जादा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महिलांचा सहभागही दुर्लक्षिण्यासारखा नाही, तोही या निकालावर परिणाम करणारा ठरणार आहे. विशेषतः माढा, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माळशिरससारख्या ग्रामीण भागामध्ये पुरुषांबरोबरच महिलांनी मतदान केले आहे. त्यामुळे ही वाढीव मते कोणाला मिळणार, हेही पाहावे लागेल. पण सध्या तरी निकाल कोणाच्या बाजूने, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.