Solapur News : पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनाचा कृती आराखडा तयार करावा. तसेच मॉन्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील मॉन्सून कालावधीमध्ये संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, महावितरणचे कार्यकारी अभियंता बी. ए. भोळे तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
गुरव म्हणाले, की मॉन्सूनपूर्व कालावधीत सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. पंढरपूर तालुक्यातील ४७ गावे नदी काठी असून, नदी काठावरील गावे पूरपरिस्थितीने बाधित होतात व पुराच्या पाण्यामुळे काही गावांचा संपर्क तुटतो या गावांमध्ये संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्धतेबाबत नियोजन करावे.
आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून ठेवावा. महावितरणने वीज पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ पूर्ववत करावा. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पावसाळ्यात स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्राथमिक पाहणी करून अहवाल तयार करावा. पाटबंधारे विभागाने धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची व नदीपात्रातील पाणी पातळीची माहिती वेळोवेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित गावांना कळविण्यात यावी.
तसेच पावसाळ्यात ओलाव्यामुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने लसीकरण करून घ्यावे. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांची आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी. तसेच सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्याच ठिकाणी उपस्थित राहावे, अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी या वेळी केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.