समीर गायकवाडBest Street Tea Experience: चहा ‘ताजमहाल’मधला असो की ‘टेटली टी’ असो त्याची चव आमच्या गणूच्या ‘अमृततुल्य’पुढे फिकीच! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नांवरचा ‘रामबाण’ उपाय..चहा म्हणजे आपल्या जनतेचा हळवा कोपराच जणू. हा चहा पिण्यासाठी लोकांची पावलं आपसूक गणूच्या टपरीकडे वळत. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणाऱ्या गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच. त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचं लख्ख पितळी भांडं मुकाटपणे दिवसभर तापत असे..शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी, चहाच्या ऑर्डरनुसार एका ओगराळ्याने त्या पातेल्यात आधणासाठी ओतत असे. झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातली चहा पावडर, साखर चमचाने काढून डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेई आणि फक्कन पातेल्यात टाकत असे. बऱ्याच वेळा त्या पातेल्यात चहा पावडरीची पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमे की काही क्षणासाठी दार्जिलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं..AI Weather Forecast: अचूक अंदाज ‘एआय’चा!.त्याच्या चहा पावडरचे ब्लेंड कुठले हे त्यानं कधी सांगितलं नाही. त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात चहा पावडर खरेदी करताना देखील कुणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे तो नेमका कोणता चहा वापरतो हा एका ‘चहा पार्टीचा’ विषय असे. त्याने टाकलेली चहा पावडर काही वेळ आधणलेल्या पाण्यावर तरंगत राही, मग त्यातून एकेक रेष सुटून पाण्यात विरघळावी तसे काळपट चॉकलेटी धागे निसटत जात. चहाच्या कणांच्या रेषा रेषा अलगद बाजूला होऊ लागत असत आणि पाण्यात आपलं सत्त्व अर्पण करत असत. धुराची वलयं हवेत तरंगावी तशी ही वलयं पाण्यात दिसत. आपला रंगाचा, वासाचा, चवीचा अहंकार त्या कणांनी हलकेच सोडून द्यावा आणि पाण्याने तो मोठ्या अप्पलपोटेपणाने आपल्यात साठवावा असं हे चहाकाम चाले. असो..त्याच्या चहा-साखरेची घुसळण होताच, हळूहळू ते मिश्रण तापायला सुरुवात होई. एकीकडे पितळी पातेल्यात गुडगुड आवाज करत चहाला उकळी येई; दरम्यान त्याचवेळी त्याच्या तोंडाची टकळी चालू असे. चहाला उकळी येत असताना जर्मनच्या एका लांब पट्टीने पातेल्याच्या कडेला चिटकून राहिलेल्या चहा पावडरीचा त्या उकळत्या मिश्रणात कडेलोट करून टाके. .त्याच्या लोभस कृतीचा मोह पडून मीही घरी जर्मनची पट्टी आणून पाहिली होती आणि चहा पावडरीशी खेळ केला होता, माझा सारा चहाच पातेल्यासकट पालथा झाला होता. चहा घुसळण्याच्या या पट्टीचं नेमकं कार्य काय हे विचारण्याचं धारिष्ट्य मी एकदोन वेळा दाखवलं होतं; पण एखाद्या मुरलेल्या न्यायाधीशाने एखादी चिल्लर ‘जनहित याचिका’ निकालात काढावी तशी त्याने माझी उत्सुकता ‘पट्टीवर’ मारली होती..त्याच्या जवळ चहाची तलफ आली म्हणून आपण गेलेलो असलो, की त्या दरम्यान हमखास आपल्या ओळखीचा कुणी ना कुणी सोम्यागोम्या आपल्याला हटकून शोधत तिथं आलेला असे. त्याला देखील तिथल्या तरल चहामय वातावरणात ‘फुकट’च्या चहाची उत्कट तलफ न आल्यास त्यात नवल ते काय? मग गणूला ‘आणखी दोन कप टाक रे’ असं फर्मान निघे. तो हसत हसत बोले - ‘बाप्पू, मला आधीच माहितीय... मी चार कप जास्तीच टाकलेय!’.त्याने असा म्हणायचा अवकाश, की काय चाललंय मंडळी! जरा आमाला पण बोलवत जावा की! असं म्हणत म्हणत आणखी दोघंतिघं ‘घुसगेम’ करत असत. आता गणूचं ‘लक्ष्य’ आमच्यावरून हटलेलं असे. त्याच्या पुढ्यात येऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या ‘पार्टी’ची तो आस्थेवाईकपणे चौकशी सुरू करे. त्याचे प्रश्न ठरलेले असत. पण त्यात मायेचा ओलावा असे, धंद्याची लाचारी त्यात नसे. एखाद्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाचे क्षेमकुशल जाणून घ्यावं तसं त्याचं हे संभाषण चाललेलं असे..‘ताई गावावरून आली का? कसं चाललंय तिचं? अण्णा लई दिस झालं भायेर दिसलं न्हाईत, समदं ठीक हाये ना? काका-काकू काय म्हणत्येत? त्यांनी माज्या हातचा च्या पिऊन माइंदळ वखत झालाय, लक्कनची शाळा कशी चालू आहे? मंदी दिसभर घरात काय करती? किती दिसाची रजा काढलीय? तब्येत वाईच वंगाळ झाल्यागत वाटतीय, खानावळवाल्याला आपल्या गावाकडचं माळवं घेऊन जावा, मग बघा त्येच्याच तोंडाला पाणी सुटंल! आपल्या मंडोदरीची वेत झाली का? काय झालं वासरू का रेडी?....’.या संभाषणातील त्या कथित ताईने गणूच्या लहानपणी एखादी शेवकांडी हाती दिलेली असे, तिची माया अजूनही याच्या काळजात तशीच टिकून असे. तर अण्णा म्हणजे त्याच्या वडिलांचे मैत्र, ज्यांनी त्यांना कधी काळी खूप मदत केली होती. काकू म्हणजे वरच्या गल्लीतली पाठीला बाक आलेली खाष्ट म्हतारी, जी सगळ्या गावाच्या पोटपाण्याची चिंता करी. लक्कन ऊर्फ लखन हा त्याचा शाळेतला बालमित्र, तर मंदी ऊर्फ मंदा म्हणजे कधी काळी जिच्यासाठी त्याच्या जिवाला पिसं लागत. मंडोदरी म्हणजे अण्णाची जुनी म्हैस जिचं निरसं दुध टपरीवर पोहोच होत असे. पुनश्च असो..Rural Story: हरवलेला दुपारचा प्रहर.एव्हाना त्याने चहात आणखी चार कप पाणी ओतलेले असे. चहाला जोरात उकळ्या फुटलेल्या असत. म्हादबाने दिलेल्या निरशा दुधाचे पातेलं तो हातात घेऊन हलवत राहायचा. त्याचं पातेलं हलवणं एका हाताने सुरू असे. दुसऱ्या हाताने गाळणी चहात बुडवून उकळ्यांना खाली ढकलण्याचं काम सुरू असे. चहाच्या तलफेने, तिथल्या घमघमाटाने समोरचा माणूस एव्हाना हैराण होऊन गेलेला असे. ‘आरं दे की लेका, कपभर चहासाठी दिसभर थांबवतो का काय?’.असं म्हणायचा अवकाश की कधी काळच्या पांढऱ्या रंगातल्या नि आताच्या विटकरी रंगात विरून गेलेल्या एका ओलेत्या फडक्याने तो ते पातेलं स्टोव्हवरून खाली उतरवी. पालथे घालून ठेवलेले छोटे काचेचे ग्लास सरळ करून ठेवी. पातेल्यातला चहा शेजारी ठेवलेल्या किटलीत ओतला जाई. या किटलीचं तोंड एका चॉकलेटी कपड्यानं किंचित गच्च बांधून ठेवलेलं असे. हळूहळू पातेल्यातला चहा किटलीच्या पोटात जाऊन विसावा घेई..देवापुढे उदबत्ती लावताना चेहऱ्यावर जे तन्मयतेचे भाव असतात, तेच भाव गणूच्या चेहऱ्यावर किटलीतला चहा ग्लासात ओतताना असत. नाही म्हणायला त्याच्या दुकानात देवांच्या एकदोन तसबिरी आणि दर्शनी भागात शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती. या सर्वांना तजेलदार फुलांचा हार घातलेला असे. एका कोपऱ्यात काळं पडलेलं कॅलेंडर दीनवाण्या तोंडाने लटकत असे. आत काटकोनात ठेवलेली दोन बाकडी, एक पाय तुटलेला लाकडी स्टूल आणि लाल रंगाचा विटून तपकिरी रंगाचा झालेला मळकट प्लॅस्टिकचा स्टूल हे त्याचे फर्निचर!.गणूच्या टपरीत चहा पिणारी माणसंच बसत असं काही नव्हतं. चकाट्या पिटणारी माणसंदेखील तिथं बसून जगाच्या पाठीवरच्या तमाम विषयाच्या कंड्या पिकवत असत. गणू जेव्हा चहाचे ग्लास हातात देई तेव्हा त्याच्या समोरच्या काचेच्या बरण्यात ठेवलेली गोल-चौकोनी- चपटी बिस्किटे, पाण्याची बाटली यावर साऱ्यांची नजर जाई. चारेक बिस्किटे चहाबरोबर कधी फस्त होऊन जात काही कळत नसे. गणूच्या बडबड्या स्वभावामुळे तो दिवसभर एकाच जागी असूनही त्याला सगळ्या गावाची खबरबात असे. पण तो कधी या कानाची चुगली त्या कानाला करत नसे. दुपारी वर्दळ कमी झाली की तिथंच बसून चार घास खाऊन घ्यायचा. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे सात-आठ वाजेपर्यंत उभं राहून त्याचे पाय कसे दुखत नसत या प्रश्नाचं उत्तर कुणालाच गवसलं नव्हतं..गणूच्या टपरीपाशी उभं राहून अनेकांनी जमिनीचे सौदे निश्चित केले. काहींनी भांडणं मिटवली. काहींची ‘स्थळं’ तिथं जमली. तर एखादी माहेरवाशीण सासरी जाताना त्याला सांगून गेली, ‘गणू, माझ्या आबांकडं लक्ष दे बाबा. त्यांना आता सुधरत न्हाई न मायचं वय झालंय.’ कुणी तरी तालुक्याच्या गावात शिकायला असणाऱ्या मुलाचा जेवणाचा डबा तिथं आणून ठेवलेला असे. कुणाचं तरी खताचं चुंगडं येऊन पडलेलं असे. कुणी तरी सोयऱ्याधायऱ्यांना देण्यासाठी तिथं पत्रिका आणून ठेवलेल्या असत. कुणाच्या तरी बस्त्याला जाताना तिथं जमायचा सांगावा कुणी तरी दिलेला असे. कधी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी तिथं गावातली म्होरके लोकं गोळा झालेली असत तर कधी पुढारी लोकं ‘आपली माणसं’ घेऊन आलेली असत. तर कधी कधी कुणाची मयत झाली तर त्याची आठवण काढता काढता डोळ्यातल्या पाण्याबरोबरच इथला चहा खारट होऊन जाई कारण त्यात गणूचेही अश्रूभाव सामील असत..गणू आठ वर्षांचा असताना त्याचे वडील चहाच्या टपरीकडे येताना एसटीखाली आले आणि त्यातच त्यांचे श्वास थांबले. गणूने शाळा सोडली. आईचे डोळे पुसले. कुटुंबाचं सारं ओझं आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतलं. त्याच्या भावकीने आधी त्याची टिंगल उडवली, पण त्याने नेटाने आपली टपरी सुरू ठेवली. त्याची शाळा अर्ध्यातच सुटली पण त्याने लहान भावाला मात्र शाळेच्या ओढीत गुंतवून ठेवलं. सगळ्या गावाला त्याच्या टपरीचं नि त्याचं इतकं अप्रूप होतं, की गावात सगळे धंदे-व्यवसाय दोनाचे दहा झाले पण लोकांनी दुसरी चहाची टपरी होऊ दिली नाही. लोकांचं त्याच्यावर प्रेम होतं आणि आहे. त्याचंही गावातल्या तमाम लोकांवर अपार प्रेम आहे म्हणूनच त्याच्या चहात या अमृताहून गोड अशा प्रेमाची चव उतरली असावी..गणूच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी जर कुणी आपल्या तथाकथित अफाट भौतिक सुखांची गणूच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना केली, तर गणूचं पारडं जड भरायचं. याचं रहस्य त्याच्या अवीट गोडीच्या स्नेहार्द्र चहाच्या व्यवसायात नव्हतं, तर त्याच्या वाणीतील अमृतात होतं, त्याच्या हृदयातील अमृताहूनी गोड अशा मधाळ ममतेत होतं, त्याच्या अद्वितीय संवेदनशीलतेत होतं आणि त्याच्या मनाच्या अतुलनीय श्रीमंतीत होतं. मानवी चैतन्यशीलतेतील हा ‘अमृततुल्य’ मर्मबंध खऱ्या अर्थानं अभूतपूर्व आहे. आजकाल चहा सर्वत्र मिळतो मात्र गणूसारखी माणसं दुर्मीळ झालीत!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.