Cashew Farming: काजू बी गोळा करून प्रतवारीवर भर

Cashew Cultivation: दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावात शेतकरी अमित सावंत यांनी २५ एकर जमीन कसून उत्कृष्ट काजू उत्पादन घेतले आहे. त्यांनी सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापनाच्या समतोल पद्धतीचा अवलंब करून दर्जेदार काजू उत्पादनावर भर दिला आहे.
Cashew Farming
Cashew FarmingAgrowon
Published on
Updated on

Cashew Production:

शेतकरी नियोजन । पीक : काजू

शेतकरी : अमित दत्ताराम सावंत

गाव : कुंब्रल, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : २५ एकर

काजू लागवड : वीस एकर

कुंब्रल (ता. दोडामार्ग) येथे अमित दत्ताराम सावंत यांची २५ एकर जमीन आहे. यातील सुमारे वीस एकर क्षेत्रामध्ये त्यांनी काजूच्या २ हजार कलमांची लागवड केली आहे. त्यात वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या जातीच्या कलमे आहेत. सध्या काजू हंगाम सुरू झाला असून काजू बी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Cashew Farming
Cashew Pest Infestation: किडीच्या प्रादुर्भावाने काजू बागायतदार हैराण

बागेतील कामकाज

काजू कलमांना रासायनिक, सेंद्रिय अशा दुहेरी पद्धतीने खत व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. जूनमध्ये पाऊस कमी असताना प्रति कलम रासायनिक खते, शेणखत अशी खताची मात्रा दिली जाते. कलमांचा आकार मोठा असल्याने कलमाभोवती चर खोदून त्यात खत दिले जाते.

जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त असते. या महिन्यात काजू बागेत कोणतीही कामे करणे शक्य होत नाही. ऑगस्टमध्ये देखील काहीशी तीच स्थिती असते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपासून बागेतील कामकाजास सुरुवात केली जाते. पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढलेला असतो. त्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणी केली जाते. तणनाशक फवारणी करताना कलमांच्या फांद्यांवर तणनाशक उडणार नाही याची काळजी घेतली जाते. तणनाशक फवारणीनंतर आठवड्याने उर्वरित तण ग्रासकटरने कापण्यात येते.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात हलका पाऊस असतो. या काळात कलमांना सेंद्रिय खताची दुसरी मात्रा दिली जाते. सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला पालवी येण्यास सुरुवात होते. या कालावधीत पाऊस आणि ढगाळ हवामान स्थितीमुळे कलमांवर टी मॉस्किटो बग आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भावासाठी प्रत्येक कलमाचे नियमित निरिक्षण करून रासायनिक फवारणी घेतली जाते. पालवी टिकविण्यासाठी शिफारशीत घटकांच्या फवारणीवर भर दिला जातो.

Cashew Farming
Cashew Nut MSP : हमीभाव नसल्याने काजू शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहोर येण्यास सुरुवात होते. पूर्ण मोहर आल्यानंतर पुन्हा बागेची पाहणी केली जाते. त्यानंतर रासायनिक कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली जाते. ही फवारणी विशेषतः मोहोर टिकविण्यासाठी केली जाते. यावर्षी धुक्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या.

मागील महिनाभरातील कामे

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये माळरानावरील गवत सुकण्यास सुरुवात झाली. बाग माळरानावर असून या भागात मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. त्यामुळे गवत सुकताच संपूर्ण बागेभोवती आगरेषा काढून घेतली. तसेच बागेच्या कुंपणालगतचा तसेच बागेतील पालापाचोळा गोळा करून बाग आणि परिसर स्वच्छ करून घेतला.

जानेवारी महिन्यात फळधारणा झाल्यानंतर बागेचे सतत निरीक्षण केले. या कालावधीत कलमांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तिसरी रासायनिक फवारणी केली. कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर लक्षणे ओळखून त्वरित रासायनिक फवारणी घेतली जाते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होत असल्याचे अमित सावंत सांगतात.

आगामी नियोजन

दरवर्षीच्या तुलनेत यंदा काजू हंगाम लांबला आहे. मागील १० ते १५ दिवसांपासून हंगाम सुरू झाला आहे. सध्या जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम सुरु आहे. संपूर्ण बागेतील काजू बी गोळा करून झाल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन हलके उन्ह दिले जाईल. त्यानंतर प्रतवारी करून साठवणूक केली जाईल.

पुढील ८ ते १० दिवसांनी आणखी चांगला बहर येईल अशी अपेक्षा आहे. हा हंगाम साधारणपणे एप्रिल अखेरीपर्यंत सुरु राहील. त्यानंतर मे महिन्यात कलमाखाली पडलेला संपूर्ण पालापाचोळा गोळा करून तो कलमांच्या मुळावर रचला जाईल. त्याचा कलमास चांगला फायदा होत असल्याचे अमित सावंत सांगतात.

- अमित सावंत ९६५७४१७७४८

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com