
Akola News : अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपली गुणवत्तापूर्ण सेवा, आर्थिक शिस्त व ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्याच्या जोरावर आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. ‘नाबार्ड’च्या ४४ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने या बँकेला अमरावती विभागातील उत्कृष्ट जिल्हा बँक असा बहुमान प्रदान करण्यात आला.
पुणे येथील यशदा सभागृहात झालेल्या समारंभात हा पुरस्कार बँकेच्या वतीने सहायक व्यवस्थापक प्रसन्नकुमार बोन्था यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला भारत सरकारचे सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, ‘नाबार्ड’ मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक गोवर्धनसिंह रावत, ‘नाबार्ड’ पुणेच्या मुख्य महाप्रबंधक श्रीमती रश्मी दराड, तसेच सहकार आयुक्त दीपक तावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या पुरस्काराद्वारे अकोला-वाशीम बँकेच्या ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याला नाबार्डने मान्यता दिली आहे. सतत नवनवीन योजना, पारदर्शक व्यवहार, शेतकरी व महिला बचत गटांसाठी केलेले प्रयत्न, तसेच वेळेवर पीककर्ज वितरण, हे सर्व घटक बँकेच्या यशामागचे प्रमुख आधार आहेत.
बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी या गौरवाच्या निमित्ताने सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे आमच्या बँकेच्या कार्यपद्धतीला व सेवाभावाला मिळालेली अधिकृत दाद आहे. आमचे संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, अधिकारी-कर्मचारी, हितचिंतक, ग्राहक व शेतकरी यांच्या विश्वासामुळेच हे शक्य झाले.
हा गौरव भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायक ठरेल. बँकेच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पीककर्ज वितरण, कर्ज वसुली, ई-सेवा केंद्रांची अंमलबजावणी, डिजिटायझेशन, तसेच स्वयंसहायता गटांना दिलेल्या मदतीच्या योजनांनी बँकेचे क्षेत्रीय योगदान भक्कम केले आहे. बँकेने मागील काही वर्षांत आर्थिक बळकटी आणत नवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धतीचा अवलंब करून ग्रामीण भागात आर्थिक सक्षमतेचा दीप प्रज्वलित केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.