Cotton Cultivation : सघन कापूस लागवडीचा तयार होणार ‘अकोला पॅटर्न’

Akola Pattern : कापसाची उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या सघन कापूस लागवडीचा ‘अकोला’ पॅटर्न तयार होत आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Akola News : कापसाची उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणाऱ्या सघन कापूस लागवडीचा ‘अकोला’ पॅटर्न तयार होत आहे. येत्या हंगामात जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर या पद्धतीने कापूस लागवड करून उत्पादकता वाढीसाठी ठोस प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश देत नियोजन करण्याचे व आवश्‍यक निधी देण्याचे आश्‍वासनही दिले आहे.

अकोला जिल्ह्यात सघन पद्धतीने कापूस लागवडीचा प्रयोग मागील सात ते आठ वर्षांपासून दिलीप ठाकरे यांनी सुरू केला. ते दर वर्षी ५० एकरांपर्यंत कोरडवाहू क्षेत्रात ही लागवड करीत असतात. त्यांची एकरी उत्पादकता १५ क्विंटल किंवा त्यापेक्षा जास्त मिळत आलेली आहे. या सघन पद्धतीने कापूस लागवडीला मागील हंगामापासून शासनाकडून प्रोत्साहनही दिले जात आहे. मागील वर्षात प्रकल्पातून ५३८ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा सुमारे १५२८ हेक्टरवर ही सघन लागवड पोहोचली आहे. आता या प्रकल्पात पुढचे पाऊल पडते आहे.

Cotton Cultivation
Cotton Disease : कपाशी रोपांची मर रोखण्यासाठी उपाय

१२ जुलैला केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्या अध्यक्षतेत मुंबईत टेक्स्‍टाइल ॲडव्हायजरी ग्रुप (टीएजी) ची बैठक झाली होती. शेतकरी प्रतिनिधी म्हणून या वेळी मालवाडा (जि. अकोला) येथील प्रयोगशील कापूस उत्पादक शेतकरी दिलीप ठाकरे उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आराखडा तयार करण्यात आला. श्री. ठाकरे यांनी बैठकीत सघन पद्धतीने लागवडीचा अनुभव मांडला. मंत्र्यांनी या विषयावर काम वाढवण्याची सूचना केली. त्यामुळे सघन कापूस लागवडीचे हे ‘अकोला मॉडेल’ देशभर राबवले जाईल.

याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसंचालक प्राजक्ता वर्मा यांनी भेट दिली. या वेळी सीसीआयचे सीएमडी ललितकुमार गुप्ता, ए. एल. वाघमारे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, मिलिंद जंजाळ, सीआयसीआरचे डॉ. रामकृष्ण, डॉ. शैलेश गावंडे, ‘पंदेकृवि’चे कापूस शास्त्रज्ञ डॉ. सुरेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उमेश ठाकरे, विषयतज्ज्ञ कुलदीप देशमुख, विलास वाशीमकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर प्राजक्ता वर्मा व इतर अधिकाऱ्यांनी थेट बांधावर जात सघन कापूस लागवडीची पाहणीसुद्धा केली. या वेळी दिलीप ठाकरे व अधिकाऱ्यांना संपूर्ण तांत्रिक माहिती, फायदे सांगितले.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : नगर जिल्ह्यात कापसाची दीड लाख हेक्टर लागवड

अकोला पॅटर्न देशभर जाणार

सन २०२५च्या हंगामात सघन पद्धतीने जिल्ह्यात हजारो हेक्टरवर कापूस लागवडीचे उद्दिष्ट नियोजित करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरला तर त्याचा संपूर्ण देशभरात कापूस उत्पादक भागात विस्तारही केला जाणार आहे.

अशी असते सघन लागवड...

एकरी बियाणे वापर- साडे पाच ते सहा पाकीट

अंतर- दोन ओळीतील अंतर तीन फूट

दोन झाडातील अंतर अर्धा फूट

झाडांची एकरी सरासरी संख्या- २५०००

बियाणे निवड- १४० ते १५० दिवसांत येणारे बुटके वाण

सघन लागवड पद्धतीने देशातील कापसाचे उत्पन्न दुप्पट होऊन आपण इतर प्रगत देशांच्या उत्पादकतेत जवळपास पोहचू शकतो. त्यासाठी या पद्धतीचा प्रचार-प्रसार व प्रसिद्धी होणे गरजेची आहे.
दिलीप ठाकरे, सघन कापूस उत्पादक, मालवाडा, ता. बाळापूर, जि. अकोला

सघन लागवडीचे फायदे

रासायनिक खताचा वापर कमी होतो. कारण प्रतिझाड १५ ते २० बोंड अपेक्षित राहतात.

झाडांची उगवण कमी झाली तरी खाडे भरण्याची गरज पडत नाही

४० ते ५० दिवसांत कापूस पीक संपूर्ण शेत व्यापून घेतो त्यामुळे निंदणे किंवा आंतरमशागतीचा खर्च कमी येतो

कमी कालावधीच्या वाणांचा वापर होत असल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी या क्षेत्रातून कापूस निघून येतो

सिंचनाची सोय असणाऱ्यांना दुबार पीक घेता येते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com