
Vidhansabha Live Update: राज्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच पुरात मृत्यू पावलेल्याच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये मदत राज्य सरकार देणार आहे.
त्याचबरोबर ज्याच्या घरात पुराचं पाणी शिरलं त्यांना तातडीने १० हजार रुपये देण्यात येतील. तर ज्यांच्या दुकानात पाणी शिरलं अशा पुरग्रस्तांना ५० हजार रुपये मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.
जमीन खरडून गेली असेल तर पंचनामे करावेत, बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करून द्यावं असे आदेश अजित पवारांनी प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील पूर्व विदर्भात अतिवृष्टि झाली आहे. अनेक भागात पूरस्थिति निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले.
शेतकऱ्यांना तातडीनं राज्य सरकारनं सरसकट मदत करावी, अशी मागणी कामकाजाला सुरुवात होताच विरोधीपक्षानं केली होती. विरोधकांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर निवेदन काढण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच आजचं कामकाज संपण्याच्या आधी नुकसानीबद्दल निवेदन काढू. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, अशी ग्वाही पवार यांनी दिली होती.
विदर्भात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पेरणी केलेली पिकं खरडून गेली आहेत. घरात पाणी शिरलं आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जनावर वाहून गेली आहेत.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू झाला आहे. कामकाजाच्या सुरुवातीला डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील पूरस्थितीचं गांभीर्य सभागृहासमोर मांडलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.