Baramati News: ‘‘परत या दादा, परत या...’’ ‘‘अजित पवार अमर रहे...’’‘‘ एकच वादा अजितदादा...’’ अशा गदगदलेल्या वातावरणात दिल्या जाणाऱ्या घोषणा... खळ न पडता सतत ओघळणारे अश्रू... हताश चेहऱ्यांवर दाटलेली कमालीची अस्वस्थता...सुन्न झालेली आणि आपल्या लाडक्या दादाच्या आठवणीत भिजलेली मने अशा कातर अवस्थेतील लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी (ता. २९) शोकाकुल वातावरणात येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. .पवार यांच्या अकाली निधनाने सगळी बारामती थबकली होती. आता पुढे काय... हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी होता. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी केवळ बारामती व पुणे जिल्हाच नाही, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतूनही त्यांचे चाहते पहाटेपासूनच उपस्थित होते..Ajit Pawar Funeral: 'अजितदादा अमर रहे'; लाखोंच्या उपस्थितीत अजितदादांना अखेरचा निरोप.आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्याप्रसंगी आपण समक्ष उपस्थित असावे, ज्या बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, त्यांना अखेरचा निरोप द्यावा, या एकाच भावनेतून लाखोंचा जनसमुदाय विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात एकत्रित झालेला गुरुवारी पाहायला मिळाला. जनतेचे पवार यांच्यावर किती प्रेम होते, याची झलक जशी निवडणुकांच्या प्रचारसभांतून दिसत असे, तशीच प्रचिती त्यांना अखेरचा निरोप देतानाही जाणवली. पवार यांचे पार्थिव जेव्हा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आणण्यात आले, त्या वेळी दादांच्या असंख्य लाडक्या बहिणींना अश्रू आवरेनासे झाले. अनेक भगिनी हमसून हमसून रडल्या..अविश्वासाचे भाव‘‘दादा...परत या... परत या...’’ या घोषणा होताना अनेकांच्या चेहऱ्यांवर पवार यांचे अकाली जाणे आम्हाला न पचणारे आणि अविश्वसनीय आहे, असेच भाव होते. विद्या प्रतिष्ठानचे दहा एकरांचे मैदान अंत्यसंस्कारासाठी अपुरे पडले, इतकी प्रचंड गर्दी चाहत्यांनी केली होती. केवळ पवार कुटुंबीय किंवा बारामतीकरच नव्हे, तर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह उपस्थित अनेक मान्यवरही अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने निःशब्द झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीयांचे दुःख कल्पनातीत होते. पार्थ व जय यांना आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना अश्रू आवरले नाहीत..Ajit Pawar Funeral: राज्यात दुखवटा; आज अंत्यसंस्कार.आता पुढे काय?पवार यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित प्रत्येक बारामतीकराच्या तोंडी आता पुढे काय होणार, हा एकच प्रश्न होता. बारामतीकरांचे पालकत्व स्वीकारलेले वडीलबंधूसमान अजित पवार निघून गेल्याने निर्माण झालेली पोकळी आता कशी भरून निघणार, या विचाराने निर्माण झालेली बेचैनी अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. काहीही अडचणी निर्माण झाल्यास हक्काने जाण्याची एकमेव जागा बारामतीकरांपुढे होती, ती म्हणजे अजित पवार... तेच निघून गेल्याने आता काय करायचे, अशी चर्चा बारामतीकरांमध्ये होती..विकासप्रक्रियेचे काय होणार?अजित पवार यांनी गेल्या काही वर्षांत बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जिवाचे रान केले होते. रस्ते, शहर सुशोभीकरण, पाणी योजना, घरकुल योजना, पथदिवे, पदपथ, इमारती यांसह सर्वच क्षेत्रांत त्यांनी निधी खेचून आणत येथील विकासाच्या प्रक्रियेला कमालीचा वेग दिला होता. आता बारामतीच्या विकासाचे पालकत्व कोण स्वीकारणार, अजित पवार यांची जागा कोण भरून काढणार, याचीच जागोजागी चर्चा चालू होती..Ajit Pawar Pass Away: मान्यवरांची श्रद्धांजली!.आमचा आधारच गेला...अजितदादांचा वचक व दरारा असा होता, की आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होत नसे. आज दादाच निघून गेल्यामुळे आमचा आधारच गेला आहे... आता आम्ही कोणाकडे जायचे, असा आर्त सवाल अंत्यविधीला उपस्थित काही महिलांशी संवाद साधल्यावर त्यांनी उपस्थित केला. दादांच्या दराऱ्यामुळे बारामतीत महिला अत्यंत सुरक्षित होत्या, असेही त्यांनी या वेळी सांगितले.....यांची होती प्रमुख उपस्थितीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटे, छत्रपती शाहू महाराज, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, नीरज चंद्रशेखर, कृष्णाजी देवरालू, सी. एम. रमेश, रक्षा खडसे, माधुरी मिसाळ.नीलम गोऱ्हे, आदिती तटकरे, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, हर्षवर्धन सपकाळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, जयदीप कवाडे, डॉ. अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे पाटील, नरहरी झिरवाळ, राहुल कुल, धैर्यशिल मोहिते, मकरंद पाटील, हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, शिवेंद्रराजे भोसले, अशोक उईके, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, राजेंद्र गवई, ओमराजे निंबाळकर, शंभुराज देसाई, दत्तात्रय भरणे, अमित कल्याणी, खासदार श्रीकांत शिंदे, निवेदिता माने, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलिस महासंचालक सदानंद दाते, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी या वेळी उपस्थित होते..जनसामान्यांची रीघआपल्या लाडक्या नेत्याला अखेरचे जवळून पाहता यावे, यासाठी अंत्यसंस्काराची वेळ अकराची असतानाही अनेक बारामतीकर सकाळी आठ वाजल्यापासूनच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल झाले होते. दोन ते तीन तास उन्हात बसून लोक अंत्यसंस्कार विधींमध्ये सहभागी झाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पार्थ व जय पवार यांनी उपस्थितांना अभिवादन केले. त्यानंतर मैदानावरील गर्दी कमी करा, असे आवाहन पोलिस करत होते, मात्र बारामतीकरांचा तेथून पायच निघत नव्हता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.