Agriculture AI : ‘एआय’च्या विस्तारासाठी पुढाकार घ्या

Sharad Pawar : उसाची उत्पादकतावाढ हा सातत्याने चर्चेला येणारा विषय आहे, मी स्वतः साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वार्षिक कार्यक्रमात यावर नेहमी बोलतो. पण पुढे काहीच होत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Baramati News : कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) तंत्रज्ञानाचा ऊसशेतीत प्रभावी वापर करत बारामती ‘केव्हीके’त हा प्रयोग यशस्वी केला, पण हे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रात व्यापकस्तरावर पोहोचण्यासाठी राष्ट्रीय साखर कारखाना संघ, राज्य साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ‘विस्मा’ यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेऊन एखादा मोठा कार्यक्रम हाती घेतल्यास येत्या ३-४ वर्षांत महाराष्ट्रात ऊस उत्पादनात क्रांती होईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि बारामती येथील ॲग्रिकल्चलर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पवार बोलत होते. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार या वेळी व्यासपाठीवर होते.

Sharad Pawar
AI Sugarcane Farming : उसाचे एकरी १०४ ते १५० टनापर्यंत उत्पादन

श्री. शरद पवार म्हणाले, ‘‘उसाची उत्पादकतावाढ हा सातत्याने चर्चेला येणारा विषय आहे, मी स्वतः साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वार्षिक कार्यक्रमात यावर नेहमी बोलतो. पण पुढे काहीच होत नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आज याबाबत माझी काहीशी नाराजी असली, तरी आनंदही होतो आहे की, साखर उद्योगामध्ये जागतिक पातळीवरचे तंत्रज्ञान कसे आणता येईल, याचा विचार आपण केला.

उसामध्ये ‘एआय’चा वापर केला, त्यातून एकरी ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ मिळाली. या तंत्राचा वापर आज अनेक शेतकरी करीत आहेत. रोजच्या रोज ते अपडेट राहत आहेत. आता हळूहळू केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला यांसारख्या सगळ्या क्षेत्रात हे तंत्रज्ञान पोहचवता येईल, पण एकट्याने नव्हे, तर सर्वांनी मिळून, यात सहभाग घेत काम केले पाहिजे. माझी खात्री आहे की, त्यातून आपण नक्कीच बदल घडवू.’’

‘विस्मा’चे अध्यक्ष ठोंबरे म्हणाले, ‘‘साखर कारखान्यांची क्षमता वाढलेली आहे, नवीन कारखाने वाढत आहेत. ऊसक्षेत्र वाढते आहे, पण उत्पादकता काही केल्या वाढत नाही. १५० दिवस चालणारा हंगाम, यंदा ७० ते ८० दिवसांतच संपला.

राज्यातील १७७ कारखाने केवळ दीड-दोन महिन्यांत बंद झाले आहेत. ऊसविकासावर कारखानदारांनी कधीच गांभीर्य दाखवले नाही. पण ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाने आम्हाला आशेचा किरण दिसतो आहे. कारखानदारांनी एक कार्यक्रम हाती घेतल्यास चार-पाच वर्षांत हळूहळू उत्पादकता वाढ मिळेल. त्यासाठी साखर संघ, ‘विस्मा’सह कारखानदार यांच्या प्रतिनिधींचा टास्कफोर्स नेमावा.’’

Sharad Pawar
Agriculture AI : ‘एआय’मुळे होणार ऊस उत्पादनात क्रांती

‘जागतिक पातळीवर दखल’

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही यावर काम करीत आहोत. शरद पवारांच्या दूरदृष्टीने हा प्रकल्प इथे साकारला. केव्हीकेच्या सर्व टीमने अहोरात्र अथक परिश्रम घेतले, त्यामुळेच हे यश मिळाले. केंद्र आणि राज्य सरकार या तंत्रज्ञानाबाबत सकारात्मक आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच याची नोंद घेतली.

शिवाय मायक्रोसॅाफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासह जागतिक स्तरावरील उद्योजक इलॅान मस्क यांनीही या संशोधनाची दखल घेतली. या तंत्रज्ञानाच्या वापरातून केवळ ऊसच नव्हे तर अन्य पिकांतही काम करावे लागेल. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी आम्ही खुले केले आहेत. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा.’’ खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी ‘एआय’ प्रकल्पाबाबत भूमिका मांडली. कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

-तांत्रिक सत्रात कारखानदारांना मार्गदर्शन

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासोबतच दिवसभराच्या या कार्यशाळेत तांत्रिक सत्रात पार्थसारथी मुखर्जी, सागर सिल्लोड, गजानन पाटील, अमर पाटील, टी. पी. वर्तक, डॅा. लियाम रामन, संतोष गोंधळेकर, विनित वैद्यनाथन यांसारख्या तज्ज्ञांनी कारखानादारांसाठी राख विलगीकरण, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, स्फुरदयुक्त सेंद्रिय खतनिर्मिती, पाचटापासून बायोचार, वीजनिर्मिती करणारे छोटे यंत्र, इंधनबचत व जलशीतकरण, स्पेन्टवॅाशवर प्रक्रिया करणारे तंत्रज्ञान, कौटुंबिक बायोगॅस संयंत्र, गांडुळखत प्रकल्प, इथेनॅाल, अल्कोहोल तयार करण्याची नावीन्यपूर्ण पद्धती आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

‘शुगरकेन डेव्हलपमेंट फंडातून मदत मिळावी’

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी साखर उद्योगाशी संबंधित संस्थांनी पुढाकार घ्यावाच, पण कारखानदारांनीही स्वतःची काही मदत, तसेच शेतकऱ्यांकडूनही मदत घेता येईल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारही आर्थिक मदत करेल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी सरकारला शुगरकेन डेव्हलपमेंट फंडातूनही मदत देता येईल, असेही शरद पवार यांनी सुचवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com