Role of banks in agricultural development: राज्यातील कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा कणा आहे. दरवर्षी भारतीय कृषी क्षेत्रात सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले..ते ‘एआय फॉर ॲग्री -२०२६’ या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (ता. २३) आयोजित ‘कृषी एआय भविष्यामधील गुंतवणूक : गुंतवणूक, बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवकल्पना’ या विषयावरील परिसंवादामध्ये बोलत होते. या परिसंवादामध्ये ‘नाबार्ड’चे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही., ग्लोबल लीड – डिजिटल अॅग्री व अॅग्रीटेकचे संतोष वासुदेवन, अन्न व कृषी संघटनेचे प्रतिनिधी, ताकायुकी हागीवारा, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे संचालक मार्क डी सूझा-शील्ड्स यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर प्रायमस पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक एम. रामकृष्णन यांनी समन्वयक म्हणून तज्ज्ञांशी संवाद साधला..Agriculture Financing: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.प्रायमस पार्टनर्सचे व्यवस्थापकीय संचालक एम. रामकृष्णन यांनी सांगितले, की शेती आणि वित्त या दोन गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यांना वेगळे पाहणे अव्यवहार्य आहे. वित्तपुरवठा हा शेती व्यवसायाचा अविभाज्य भाग असून, भारतीय कृषी परिसंस्थेत दरवर्षी सुमारे ३१ लाख कोटी रुपयांचा पतपुरवठा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो..आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे संचालक मार्क डी सूझा-शील्ड्स म्हणाले, की एआय हे नावीन्यपूर्ण तंत्रही अन्य कोणत्याही नव्या उत्पादनांप्रमाणेच भांडवली व्यवस्थेतून विकसित होत आहे. ते सामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचेल, यावर भर दिला पाहिजे. भारतातील सुमारे ८० टक्के लघू व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत वेगाने वित्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो..अन्न व कृषी संघटनेचे प्रतिनिधी ताकायुकी हागीवारा म्हणाले, की भारतामध्ये भाषिक विविधता प्रचंड आहे. स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांच्या स्थानिक भाषेतच संवाद करण्यामध्ये एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. एआय प्रणालीने शेतकऱ्यांना सोपी, थोडक्यात आणि स्थानिक परिस्थितीशी सुसंगत शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे..‘नाबार्ड’चे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. म्हणाले, की ग्रामीण वित्तपुरवठ्यासाठी डिजिटायझेशन, विश्वास आणि विदा (डेटा) महत्त्वाची आहे. ग्रामीण वित्तसंस्था डिजिटाईज केल्याशिवाय वेळेवर, परवडणारा आणि विश्वासार्ह कर्जपुरवठा शक्य नाही. कर्जव्यवस्था ही विश्वासावर आधारित असून माहितीतील असमतोल कमी करण्यासाठी डिजिटायझेशन अत्यावश्यक आहे. एआयच्या मदतीने जोखीम विश्लेषण, विशेषतः हवामान जोखीम ओळखणे व किंमत ठरवणे शक्य होईल..कृषिविषयक डेटा सध्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेला असून तो खुल्या नेटवर्कच्या स्वरूपात उपलब्ध झाल्यास स्टार्टअप्सना ‘गो-टू-मार्केट’ आणि ‘प्रॉडक्ट-मार्केट फिट’ साध्य करणे सुलभ होणार आहे. डिजिटल कृषी, डेटा व्यवस्थापन आणि माहिती साह्य प्रणाली उभारण्यासाठी ६० हून अधिक देशांमध्ये जवळपास २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली..स्थानिक गरजांनुसार नवकल्पना विकसित करण्यासाठी ‘सँडबॉक्स’ पद्धतीचीही गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. महिला शेतकरी, भूमिहीन कामगार, पशुपालक आणि मत्स्य व्यावसायिक अधिकृत नोंदणीपासून दूर असण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना विशेषतः महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख देऊन डिजिटल व वित्तीय व्यवस्थेत सामावून घेण्याची आत्यंतिक गरज असल्याचे मत व्यक्त केले..Finance Commission: ग्रामपंचायतीसाठीचे ३४३ कोटी रुपये पडून.शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनली आहे. ‘दूरसंवेदन व भू-स्थानिक बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कृषी परिवर्तन’ या विषयावर झालेल्या चर्चेत देशातील आणि परदेशातील दिग्गज मान्यवरांनी विचार मांडले. मुंबई येथे आयोजित ‘एआय ४ अॅग्री २०२६ ’ या परिषदेच्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी (ता. २३) ते बोलत होते..कार्यक्रमाचे मुख्य वक्ते महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राचे संचालक डॉ. सौम्य बंद्योपाध्याय यांनी उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या डेटाचा वापर करून पिकांचा अचूक अंदाज कसा वर्तवता येतो, यावर प्रकाश टाकला.एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक येथील जिओइन्फॉर्मेटिक्स सेंटरचे संचालक डॉ. मंजुल कुमार हजारिका यांनी आशियायी स्तरावरील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या यशस्वी प्रयोगांची माहिती दिली..सोल्यूशन्स व ग्राहक यश, क्रॉपइनचे उपाध्यक्ष गौतम कराळगी यांनी डेटा-आधारित शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत होणाऱ्या वाढीचा आलेख मांडला.व्हॅल्यू चेन, डेटा ई-रजिस्ट्रीचे सह-संस्थापक व प्रमुख तरुण काटोच यांनी कृषी मूल्य साखळीत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट केली.कृषी व शाश्वतता, गुगल-डीपमाइंडचे संस्थापक व प्रमुख आलोक तळेकर यांनी जागतिक स्तरावर एआयच्या माध्यमातून शेती शाश्वत कशी करता येईल, यावर तांत्रिक विश्लेषण केले..वासार लॅब्सचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलेश कुमार यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या स्थानिक स्तरावरील उपयोगांबाबत माहिती दिली.सत्रात सहभागी झालेल्या इतर वक्त्यांनी तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक अंमलबजावणी कशा प्रकारे केली जात आहे, यावर भर दिला. कृषी विभागाचे संयुक्त संचालक गणेश घोरपडे यांनी आभार मानले.‘जनरेटिव्ह AI’ ठरणार गेम चेंजर.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेती आणि अन्न प्रणालीमध्ये आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाने यात पुढाकार घेतला असून, ‘जनरेटिव्ह AI’मुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती कशी पोहोचविता येईल, याचा आराखडा मुंबई येथे आयोजित ‘AI४Agr-२०२६’ या परिषदेत मांडण्यात आला. सोमवारी (ता. २३) झालेल्या ‘कृषीसाठी जनरेटिव्ह AI : प्रथम टप्प्यातील बुद्धिमत्ता उलगडणे’ या विषयावर चर्चासत्रात सखोल चर्चा करण्यात आली..या सत्राच्या समन्वयाचे काम एकस्टेप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू यांनी केले.आयआयटी, मुंबई येथील तंत्रज्ञान नवोपक्रम केंद्राचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. प्रसाद रामनाथन यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून जनरेटिव्ह AI च्या क्षमतांचे सादरीकरण केले. त्यांनी संशोधनातील गुंतागुंतीची विदा (डेटा) सुलभ भाषेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयआयटी, मुंबईमध्ये सुरू असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली..जागतिक बॅंकेच्या आशिया प्रादेशिक विभागाचे एआय विषयक संचालक महेश उत्तमचंदानी यांनी आशियाई देशांमधील कृषी अर्थव्यवस्थेत AI मुळे होणाऱ्या बदलांवर भाष्य केले. कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्रांती आणण्यासाठी जनरेटिव्ह AI हे एक प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले..राज्य शासनाच्या कृषी विभागाचे एआय, हवामान कृती व विशेष प्रकल्प सल्लागार परिमल सिंह यांनी सरकारी योजना आणि तंत्रज्ञानाचा संगम कसा साधला जात आहे, यावर प्रकाश टाकला. हवामान बदलाच्या संकटात शेतकऱ्यांना जनरेटिव्ह AI द्वारे ‘रिअल-टाइम’ सल्ला देऊन त्यांचे नुकसान टाळण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विशेष प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली..या सत्रात प्रामुख्याने ‘First-Mile’ म्हणजेच तंत्रज्ञान निर्मितीच्या पहिल्या टप्प्यापासून ते थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ही बुद्धिमत्ता कशी प्रवाहित करता येईल, यावर तज्ज्ञांचे एकमत झाले. भाषेतील अडथळे दूर करून स्थानिक बोलीभाषेत सल्ला देणारी AI यंत्रणा विकसित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला.या सत्रासाठी उपस्थितांचे आभारप्रदर्शन फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने यांनी मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.