Indian Agriculture : देरे मोत्यावाणी दाणं देवा माझ्या कणसाला

New Year And Agriculture : नव्या वर्षाच्या नव्या उत्साहात नवे विचार, नवे संकल्प सुचू लागतात. ते पूर्णत्वास किती जातात तो वेगळा विषय, परंतु नव्या वर्षाच्या निमित्ताने निर्माण होणारी आशेची ही किनार जगण्याची उमेद जागी ठेवते, हेही नसे थोडके!
Jowar
JowarAgrowon

तान्हाजी बोऱ्हाडे

मावळत्याकडे पाठ आणि उगवत्याला नमस्कार, हा मानवी स्वभाव आहे. त्याच न्यायाने ‘जुने जाऊद्या मरणालागुनी’ म्हणत आपण नव्या वर्षाचे स्वागत करत असतो. म्हटलं तर नवं वर्ष म्हणजे कॅलेंडर बदलतं एवढंच! तारीख लिहिताना शेवटी २०२३ ऐवजी २०२४ लिहिलं जाईल इतकंच. पण असं असलं तरी बदलणारं कॅलेंडर मनात थोडा उत्साह निर्माण करतंच.

येणारं नवं वर्ष नव्या स्वप्नाची मनात रुंजी घालतंच. वर्षभर दैनंदिन जगण्याच्या धकाधकीने थकलेल्या जिवांना नव्या वर्षात नवं काही तरी करूया, अशी आशेची पालवी फुटू लागते. दिव्याची काजळी झडावी तशी निराशेची मरगळ झडू लागते. नव्या वर्षाच्या नव्या उत्साहात नवे विचार, नवे संकल्प सुचू लागतात. ते पूर्णत्वास किती जातात तो वेगळा विषय, परंतु नव्या वर्षाच्या निमित्ताने निर्माण होणारी आशेची ही किनार जगण्याची उमेद जागी ठेवते, हेही नसे थोडके!

नवं वर्ष म्हटलं, की आपण काही संकल्प करतो, नवी स्वप्नं पाहतो, या वर्षात करायच्या कामांची यादी तयार करतो. पण हे सगळं आपल्या स्वतःसाठीच. इतरांसाठी यामध्ये काहीच नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काही करता येईल का? ज्या पर्यावरणात राहतो, ज्या निसर्गाचा आपण भाग असतो त्यासाठी काही विचार, काही संकल्प येणाऱ्या वर्षात करता येईल का? येणाऱ्या नव्या वर्षाकडे असं इतरांसाठी काही मागता येईल का? याचाही विचार करूया.

Jowar
Indian Agriculture : शेती करायची कशी?

‘जो जे वांछील तो ते लाहो’ असं विश्‍वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्‍वर सर्वज्ञात आहेत. असाच एक ज्ञानेश्‍वर आजही आपल्याकडे आहे, जो दुनियेच्या भुकेसाठी जमीन नांगरतो, ताटातल्या घासासाठी दाणा मातीत पेरतो.

देरे मोत्यावाणी दाणं

देवा माझ्या कणासाला

तुझ्याच लेकारांसाठी

गरे मागतो फणसाला

अशी मागणी करणारा ज्ञानेश्‍वर म्हणजे बळीराजा अर्थात शेतकरी. जगाच्या भुकेसाठी पसायदान मागणाऱ्या या ज्ञानेश्‍वरासाठी नव्या वर्षात आपण सारेजण काही तरी मागूया. आभाळाची छाया त्याच्या डोईवर राहू दे. काळ्या आईच्या लेकरांना धरतीची अपार माया लाभू दे.

नव्या वर्षात निसर्गानं त्याचा हात हाती घ्यावा, आभाळानं साथ सोबत करावी, अवकाळीचा घातपात नको. ट्रिलियन डॉलरची स्वप्नं पाहण्यापेक्षा उघड्या बोडक्या शिरावर छप्पर, पोटाला पोटभर भाकर मिळो. अन् सजीव सृष्टीतील प्राणिमात्रांना पोटभर चारापाणी मिळो. ही अशी प्रार्थना आजच्या ह्या विनाशकालात, नव्या वर्षाच्या प्रारंभी करणं महत्त्वाचं वाटते.

शेतकरी सुखी, तर जग सुखी असं उगीच म्हणत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देईल की नाही हे आपण सांगू शकत नाही, पण आठवडी बाजारात शेतकऱ्यानं आणलेला माल आपण मात्र योग्य भावानं विकत घेऊ शकतो. आपल्या ताटात येणाऱ्या अन्नासाठी आपण ते अन्न पिकविणाऱ्या बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. प्रत्येक घरात शिजणाऱ्या अन्नामागे त्याच्या घामाची मेहनत असते, म्हणून ते अन्न वाया घालवू नये, हा साधा विचारही शेतकऱ्यांच्या श्रमाची जाणीव ठेवायला पुरेसा आहे.

महागाई हा सामान्य माणसाचं जगणं असह्य करणारा आजार आहे. उत्पन्न तेच असलं तरी महागाई मात्र वाढतेच आहे. शेतकऱ्यांसाठी तर उत्पन्न अनिश्‍चितच! भांडवली खर्च मात्र दरवर्षी वाढतोच आहे. एकीकडे शेअर बाजाराचा निर्देशांक रोज नवा उच्चांक गाठत आहे तर दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या जगण्याची पातळी अधिकच नीचांकाला चालली आहे. मूलभूत गरजांची पूर्तता होऊ शकत नाही, अशा लोकांना रोज उंचावणाऱ्या निर्देशांकाचं काय अप्रूप?

पिढ्यान् पिढ्या तेच आहेत

आमच्या सातबारावरचे आकडे

मग हे उंचावलेले निर्देशांक

कोणाच्या मालकीचे...?

अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे अकुशल हातांना काम उरलं नाही. आणि आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने उद्योगातील माणसाची जागाच रिप्लेस केली जाईल की काय, अशी भीती वाटते आहे. मग वाढणाऱ्या बेरोजगारीचं काय? या अशा काळात समस्यांना तोंड द्यायला आपण तयार आहोत का? त्यांचा सामना करताना आपल्याकडे काही उपाय आहेत का? निदान या नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुढील काळात समोर येणाऱ्या प्रश्‍नांवर विचार तर करूया.

Jowar
Climate Change : हिमनद्यांवर मॉन्सून परिवर्तनशीलतेचा परिणाम

हवामान बदल हे जगासमोरीलच एक मोठे संकट बनले आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून मॉन्सूनची अनियमितता, त्यातूनच पर्जन्याचे असमान वितरण, आपल्याकडे या सगळ्यांचा सर्वाधिक फटका कृषी व्यवस्थेला बसतो. हवामान बदलास कारणीभूत असणाऱ्या कर्ब उत्सर्जनास जबाबदार असतात औद्योगिक शहरे, फटका मात्र ग्रामीण अर्थव्यवस्थेला. याबाबत आपण काही विचार तरी करणार आहोत की नाही?

निराशेचा सूर आळवता येईल असंच सारं वातावरण आपल्या अवतीभवती आहे. येणारा प्रत्येक दिवस नवे प्रश्‍न घेऊन उगवतो आहे. एकविसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात विज्ञान, तंत्रज्ञान, इंटरनेट याबाबतच्या अत्याधुनिकतेमुळे दैनंदिन जगण्याच्या अनेक गोष्टी सोप्या आणि सहजसुलभ झाल्याही असतील; परंतु मनुष्यप्राणी म्हणून जगण्यात वाढलेली गुंतागुंत आपल्याला नाकारता येणार नाही. अशा काळात सकारात्मकता हीच एक ऊर्जा ठरेल.

सोशल मीडियावर नव्या वर्षाच्या स्वागताला केवळ शुभेच्छांचा वर्षाव करण्यापेक्षा प्रत्यक्षात हे नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी काही करता येईल का याचा विचार करूया. आणि स्वतःसाठी लिहिलेल्या नव्या वर्षाच्या संकल्पाच्या डायरीत एखादा विचार, संकल्प इतरांसाठी नोंदवूया. आणि हो, फक्त विचार करून काय उपयोग? शंभर विचारांपेक्षा एक कृती श्रेष्ठ! इतरजण काय करतात यापेक्षा मला काय करता येईल, असा विचार करून स्वतःपासून कृतीला सुरुवात करूया.. नव्या वर्षात अशी नवी सुरुवात करता येईल. सोबतच सगळ्यासाठी एखादी प्रार्थनाही म्हणता येईल...

चकोराच्या वाट्याचे चांदणे

त्याचे त्याला लाभो

चातकाच्या व्याकूळ कंठासाठी

जरा लवकरच येवो वळवाचा पाऊस

संध्याकाळ होताना प्रत्येकाच्या पावलांना

मिळो चालण्यापुरता प्रकाश

ज्ञानियाची सुकलेली आसवे

सांडो इंद्रायणीच्या डोहात

आणि वाहत राहो

अखंड प्रार्थना होऊन..!

(लेखक व्याख्याते आणि कवी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com