डॉ. विठ्ठल कौठाळे, कैलास गव्हाणे, अभिजित घोलपAgrivoltaic Research: बाएफ ग्रामीण नवोन्मेष केंद्रातर्फे ॲग्रीव्होल्टाइक मॉडेल्सची उभारणी करून त्याखाली विविध पिकांची लागवड व संशोधन करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वीज निर्मितीसोबत सौर पॅनेल आणि शेती यांचे योग्य एकत्रीकरण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनीचा कार्यक्षम वापर करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करणे हा आहे. .आजच्या काळात शेतीसमोर हवामान बदल, अनियमित पाऊस, वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि शेतीयोग्य जमिनीवर वाढता दबाव अशी अनेक आव्हाने उभी आहेत. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे देशाची ऊर्जेची गरजही सातत्याने वाढत आहे. या दोन्ही गरजांचा समतोल साधणारी अभिनव संकल्पना म्हणजे ॲग्रीव्होल्टाइक तंत्रज्ञान. या पद्धतीमध्ये एकाच जमिनीचा वापर सौर ऊर्जा निर्मिती आणि कृषी उत्पादनासाठी एकाच वेळी केला जातो. त्यामुळे जमिनीचा कार्यक्षम वापर होऊन शेतकऱ्यांना उत्पन्नाचे विविध स्रोत उपलब्ध होण्याची क्षमता निर्माण होते..Moong Production: सुधारित वाण, तंत्रातून मुगाचे वाढले उत्पादन.ॲग्रीव्होल्टाइक तंत्रज्ञानही एक नवीन संकल्पना आणि अभिनव विचार आहे ज्यामध्ये एकाच जमिनीवर सौर ऊर्जा उत्पादन आणि शेती दोन्ही एकत्रितपणे केले जाते. साधारणपणे सोलर पॅनल्स शेतामध्ये उभे केले जातात आणि त्या खाली शेती केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी अन्न आणि ऊर्जा असा दुहेरी उत्पन्नाचा लाभ मिळतो. पारंपरिक सौर प्रकल्पांमध्ये सौर पॅनेल्स जमिनीवर टेकल्यामुळे शेती करता येत नाही, मात्र ॲग्रीव्होल्टाइकमध्ये सौर पॅनेल्स ठरावीक उंचीवर बसवून त्याखाली तसेच दोन पॅनेल्स मधील अंतर गरजेनुसार वाढवून त्यामध्ये पीक लागवड केली जाते. म्हणजेच शेतकरी एकाच वेळी अन्नदाता आणि ऊर्जादाता बनतो..‘बाएफ’चा ॲग्रीव्होल्टाइक संशोधन प्रकल्पपुणे जिल्ह्यातील टिळेकरवाडी येथे ‘बाएफ ग्रामीण नवोन्मेष केंद्र’ कार्यरत आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या ॲग्रीव्होल्टाइक मॉडेल्सची उभारणी करून त्याखाली विविध पिकांची लागवड व संशोधन करण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश वीज निर्मितीसोबत सौर पॅनेल आणि शेती यांचे योग्य एकत्रीकरण करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनीचा कार्यक्षम वापर करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीचे मॉडेल विकसित करणे हा आहे..हवामान सक्षम गाव संकल्पनाॲग्रीव्होल्टाइक आणि सौर ऊर्जेचा उपयोग केवळ शेतीपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करता येऊ शकतो. बाएफच्या माध्यमातून ग्रामीण भागात सौर ऊर्जेच्या विविध उपयोगांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हवामान सक्षम गाव संकल्पनेअंतर्गत टिळेकरवाडी गावातील सौर पथदिवे हे याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. सौर पथदिव्यांमुळे गावातील रस्ते प्रकाशमान होतात, पारंपरिक विजेवरील खर्च कमी होतो आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळते. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सौरऊर्जा ही विश्वासार्ह आणि शाश्वत पर्याय म्हणून पुढे येत आहे. याशिवाय सौर ऊर्जेचा वापर सिंचन पंप, पाणीपुरवठा, कृषी प्रक्रिया आणि इतर ग्रामीण गरजांसाठी करण्याच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत..विविध मॉडेल्सचा अभ्यासॲग्रीव्होल्टाइकमध्ये ७८३ किलो वॉट क्षमतेच्या विविध प्रकारच्या सौर ऊर्जा मॉडेलची उभारणी करून अभ्यास सुरू केला आहे.फिक्स्ड टिल्टेड सोलर पॅनेल मॉडेल (जमिनीपासून १.०, १.५ आणि १.८ मीटर उंचीच्या विविध संरचनांमध्ये).व्हर्टिकल सोलर पॅनेल मॉडेलउंचावरील मॉडेल (जमिनीपासून ४ मीटर उंच)सिंगल ॲक्सिस ऑटो-टिल्टिंग सोलर पॅनेल मॉडेलसिंगल ॲक्सिसआडवे टिल्टिंग सोलर पॅनेल मॉडेलपॉलिहाउसवरील फ्लेक्सिबल सोलर पॅनेल मॉडेलपाण्यावर तरंगणारे सोलर पॅनल मॉडेल.Moong Production: सुधारित वाण, तंत्रातून मुगाचे वाढले उत्पादन.जनावरांच्या गोठ्याच्या छतावरील पॅनल मॉडेलया विविध संरचनांमध्ये पॅनेलची उंची, दिशा, अंतर आणि सावलीची तीव्रता वेगवेगळी असल्यामुळे पिकांच्या वाढीवर आणि ऊर्जा निर्मितीवर होणारा परिणामही वेगळा असतो. त्यामुळे विविध मॉडेल्सची तुलना करून शेती आणि ऊर्जा निर्मिती यांच्यात सर्वोत्तम समतोल साधणारे मॉडेल विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संशोधनामध्ये विविध मॉडेल्सखाली पिकांची वाढ, उत्पादन, गुणवत्ता, सूक्ष्म हवामान आणि सौर ऊर्जा निर्मिती यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे..विविध पिकांवर संशोधन आणि प्रात्यक्षिकेप्रक्षेत्रावर ॲग्रीव्होल्टाइक प्रणालीमध्ये तीसपेक्षा जास्त पिकांवर संशोधन सुरु असून प्रत्येक पिकाची उत्पादन क्षमता वेगवेगळी आहे. काही पिकांना अंशतः सावली अनुकूल ठरते, तर काही पिकांना अधिक सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य पिकांची निवड हा ॲग्रीव्होल्टाइक तंत्रज्ञानातील यशाचा महत्त्वाचा घटक आहे. येथे विविध ॲग्रीव्होल्टाइक मॉडेल्सखाली भाजीपाला, फुले, मसाला पिके, चारा पिके आणि फळपिकांवर व्यापक संशोधन व प्रात्यक्षिके करण्यात येत आहेत..संशोधनातील पिकेभाजीपाला पिके : मिरची, वांगे, पालक, मेथी, कोथिंबीर, चवळी, कोबी, फुलकोबी, झुकिनी, ब्रॉकोली, मुळा, गाजर, बीट, मका, घेवडा, भोपळा, काकडी, कांदा आणि वाटाणा.फुलपिके : झेंडू आणि शेवंती..मसाला पिके : हळद आणि आले.चारा पिके : लसूण घास, बरसीम आणि गिनी ग्रास.फळपिके : केळी आणि पपई.अशा विविध प्रकारच्या पिकांची ॲग्रीव्होल्टाइक प्रणालीमध्ये चाचणी घेऊन वेगवेगळ्या पिकांची सावली सहनशीलता, वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता यांचा अभ्यास करण्यात येत आहे..ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधीॲग्रीव्होल्टाइक ही केवळ ऊर्जा निर्मितीची संकल्पना नसून ग्रामीण युवकांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण करणारे क्षेत्र आहे. सौर प्रकल्पांची उभारणी, देखभाल, पॅनेल साफसफाई, तांत्रिक देखरेख, डेटा संकलन, कृषी व्यवस्थापन आणि पिकांचे उत्पादन यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असते.त्यामुळे ग्रामीण युवकांना सौरऊर्जा तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती या दोन्ही क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. .बाएफच्या माध्यमातून युवकांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, हवामान-स्मार्ट शेती, सौर ऊर्जा आणि ॲग्रीव्होल्टाइकविषयी माहिती व प्रशिक्षण देऊन ग्रामीण स्तरावर कुशल मनुष्यबळ तयार करण्याची संधी निर्माण होत आहे. भविष्यात ग्रामीण युवक ॲग्रीव्होल्टाइक तंत्रज्ञ, सौर प्रकल्प देखभाल कर्मचारी, कृषी उद्योजक, डेटा संकलक किंवा कृषी सल्लागार म्हणून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करू शकतील..शेतकऱ्यांसाठी जनजागृती आणि प्रशिक्षणनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि वैज्ञानिक माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने शेतकरी, ग्रामीण युवक आणि विविध भागधारकांसाठी ॲग्रीव्होल्टाइक विषयावर जनजागृती कार्यक्रम आणि प्रशिक्षण आयोजित केले जातात. या प्रशिक्षणामध्ये विविध ॲग्रीव्होल्टाइक मॉडेल्स, योग्य पिकांची निवड, सावलीचा पिकांवर होणारा परिणाम, पाणी व्यवस्थापन, आधुनिक सिंचन पद्धती, सौर ऊर्जा निर्मिती, ॲग्रीव्होल्टाइकची आर्थिक क्षमता, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती, ग्रामीण रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी मिळणार आहे..हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वहवामान बदलामुळे वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि अनियमित पाऊस यांचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत ॲग्रीव्होल्टाइक प्रणाली पिकांसाठी काही प्रमाणात अनुकूल सूक्ष्म हवामान निर्माण करण्यास मदत करू शकते. सौर पॅनेलमुळे निर्माण होणाऱ्या अंशतः सावलीमुळे काही परिस्थितींमध्ये जमिनीतील बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होण्यास मदत होते. तसेच अति उष्ण वातावरणात संवेदनशील पिकांना संरक्षण मिळण्याची शक्यता असते. मात्र यासाठी योग्य पिके, योग्य मॉडेल आणि स्थानिक हवामानानुसार वैज्ञानिक नियोजन आवश्यक आहे..संशोधन, सूक्ष्म हवामानाचा अभ्यासया प्रकल्पामध्ये केवळ पिकांचे उत्पादन आणि सौर ऊर्जा निर्मिती यांचा अभ्यास न करता पिकांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या सूक्ष्म हवामान घटकांचाही अभ्यास करण्यात येत आहे. यामध्ये पिकांची वाढ आणि विकास, उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता, प्रकाशाची उपलब्धता, तापमान आणि सापेक्ष आर्द्रता, जमिनीतील ओलावा, पाण्याचा वापर,.सूक्ष्म हवामानातील बदल, विविध मॉडेल्सनुसार सावलीचे प्रमाण, सौर ऊर्जा निर्मिती, विविध मॉडेल्सची आर्थिक व्यवहार्यता या माहितीच्या आधारे कोणत्या प्रकारच्या ॲग्रीव्होल्टाइक मॉडेलमध्ये कोणती पिके अधिक योग्य ठरू शकतात, याबाबत शास्त्रीय माहिती विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.- डॉ. विठ्ठल कौठाळे, ९९६०५३६६३१(बाएफ विकास संशोधन प्रतिष्ठान, उरुळीकांचन, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.