Samir Gaikwad : माहेरपण सरलेली सुभद्रा

Agriculture Rural Story : सुभद्रा सासरी गेल्याने रत्नाईच्या मनाला टोचण लागली. आबांनी तिची समजूत घातली, “सुभद्रा आता माहेरवाशीन उरली नाही, तिचं गणगोत आपल्यापरीस दसपट आहे. कैक जीवांची ती आई आहे, तिचं मातृत्व निभावण्यातच तिला अधिक आनंद आहे, तेंव्हा रत्नाईने आपल्या लेकीवरचा माहेरपणाचा हट्ट आता सोडलेला बरा!''
Agriculture Rural Story
Agriculture Rural Story Agrowon
Published on
Updated on

समीर गायकवाड

Rural Story : घरात कुणाचं लक्ष नसताना सुभद्रा (Subhadra) गोठ्यात जाऊन लाडू गायीपाशी बसे, तिच्या अंगावरून हात फिरवे तेव्हा त्या दोघींच्या डोळ्यात पाणी यायचं. लाडूची तगमग सुभद्रेला सहन होत नव्हती.

लाडूला तिच्या वासराची ओढ लागली होती आणि तिच्या डोळ्यातली ओल सुभद्रेच्या काळजात उतरली होती. लाडूची तगमग बघवेनाशी झाली तेव्हा दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी तिने लाडूला सोबत घेऊन सासरचा रस्ता धरला.

मध्यरात्र उलटून गेली होती. रातकिड्यांची किर्रकिर्र सुरु होती. अश्विन महिन्यातली बोचरी थंडी भिंतीतनं अंथरुणात पाझरली होती. सुभद्रेचा नि गोठ्यातल्या गुरांचा अपवाद वगळता रामकृष्णआबांच्या घरातली मंडळी गाढ झोपी गेली होती. सुभद्रा एकसारखी कूस बदलत होती. तिला झोपच येत नव्हती. सुभद्रेच्या हालचालींच्या आवाजानं गोठ्यातली गुरं जागी होत होती.

त्यांच्या घुंगरमाळांची किनकिन कानी येताच सुभद्रेची तगमग अधिकच वाढायची. न राहवून तिने माजघराच्या खिडकीतून गोठ्यात डोकावून बघितलं. तहान नसूनही दोनतीनदा लख्ख तांब्यातलं पाणी पिऊन झालं. अंगावरच्या उबदार रजईवरून मायेने हात फिरवून झाले, डोईखालची उशी काढून शेणकुटाने सारवलेल्या जमिनीवर पाठ टेकवून झाली. तरीही डोळं मिटलं की खंडीभर चित्रंच दिसत.

Agriculture Rural Story
Sameer Gaikwad : पाऊस घेऊन आला भावांच्या मायेचा ओलावा

दिवस उजाडायला बराच वेळ होता. आपण या गुंत्यातून बाहेर पडलं पाहिजे, आपलं काळीज आपल्याला जे काही सांगतंय ते ऐकलं पाहिजे असं तिला राहूनराहून वाटू लागलं. शेवटी टक्क जागं होऊन तिने जमिनीवर निजलेल्या आई-आबांच्या समोर उभे राहून हात जोडले. दादा-वहिनीच्या खोलीकडे लांबूनच पाहिले. डोक्यावरचा पदर गच्च आवळून कंबरेला खोचून आवाज न करता चपला पायात सरकावल्या.

अल्लाद दाराची कडी काढली. हलकेच चालत ती गोठ्यात गेली. तिला पाहून सगळी गुरं सावध झाली. बसलेली जित्राबं धडपडत ताडकन उठून उभी राहिली आणि उभं असलेल्यांनी कातडं थरथरवून जीभ बाहेर काढून कोरड्या पडलेल्या नाकपुड्या चाटायला सुरुवात केली. ते पाहताच ती काहीशी गडबडून गेली. शूss `शूssss आवाज करत तोंडावर बोट ठेवलं तशी सगळी गुरं एका मिनिटात शांत झाली. त्यांच्या थरथरत्या कातड्यावरून तिने हळुवार हात फिरवला. तिच्या मखमली स्पर्शाने त्यांना गहिवरून आलं.

एकेक करून सगळ्यांना थापटत ती लाडूपाशी आली, तिच्या पांढऱ्याशुभ्र टणक कपाळावर तिने ओठ टेकवले. लाडूच्या डोळ्यात तरारून पाणी आलं. आपल्या खरबरीत जिभेने ती सुभद्रेला चाटू लागली. गेले दोन दिवस लाडूनं काही खाल्लंही नव्हतं. चारच दिवसात तिचं पोट खपाटीला गेलं होतं. मात्र आता समोर उभ्या असलेल्या सुभद्रेला पाहून तिच्यातली उर्मी दुणावली होती. तिने दावणीला बांधलेल्या दाव्याला हिसडे द्यायला सुरुवात केली.

सुभद्रेने लाडूच्या मनात काय चाललंय हे अचूक ताडलं होतं. पुढे वाकत तिने लाडूच्या पन्हाळीला कुरवाळलं, दावणीचं दावं मोकळं केलं. शुभ्र रेशमी पाठीवरून हात फिरवत तिला चुचकारलं. सुभद्रेच्या पावलावर पाऊल टाकून लाडूदेखील अगदी चोरपावलांनी तिच्या मागोमाग निघाली. त्यांच्या पाठोपाठ वस्तीवरचा कुत्रा झिल्या हादेखील शेपूट हलवत निघाला.

इकडे घरातली सगळी मंडळी साखरझोपेत दंग होती आणि गोठ्यातली लगबग वाढली होती. सुंसुं आवाज करत अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्यास साक्षीला ठेवून अंधारातच सुभद्रा, लाडू आणि झिल्याची पायपीट सुरु झाली. त्यांना बराच मोठा पल्ला गाठायचा होता. वस्तीची हद्द ओलांडेपर्यंत ते बेताने चालत होते नंतर मात्र त्यांनी झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली.

Agriculture Rural Story
आजीच्या प्रेरणेतून सुभद्रा ब्रॅण्ड सेंद्रिय हळदनिर्मिती

खरं तर सुभद्रा बऱ्याच दिवसानंतर माहेरी मुक्कामी राहिली होती. तसं बघितलं तर सारखंच तिचं माहेरी येणं व्हायचं. याचं कारण सुभद्रेच्या नांदण्यात होतं. सुभद्रेचं सासर आणि माहेर एकाच गावातलं. माहेरचं घर गावकुसात होतं तर सासर गावाबाहेर दूर असणाऱ्या पाच कोस अंतरावरील लमाण तांड्याशेजारच्या वस्तीत होतं.

सुभद्रेला दोन बहिणी. थोरली पुण्याला तर धाकटीला बार्शीला दिलेलं आणि सुभद्रेला गावातच तालेवार घराण्यात दिलेलं. तीनही मुलींचा संसार सुखाचा असल्याने आईवडील रामकृष्ण आबा आणि रत्नाई दोघे भरून पावले होते. त्यांचं जीवन तृप्त झालं होतं. सुभद्रेच्या एकुलत्या भावाचा संदीपचा संसारदेखील शिगोशिग सुखाने भरून होता. तीनही मुलींचे संसार मार्गी लागले होते. मुली माहेरी आल्या की घराचं गोकुळ होऊन जाई.

राहून राहून त्यांना अधून मधून खंत वाटे ती सुभद्रेची. घरातल्या इतर सगळ्या मुलींत एकटी सुभद्राच शेतीवाडी करणाऱ्या राबणाऱ्या घरात दिली होती. पण सुभद्राची काही तक्रार नव्हती. मुळात तिचा स्वभावच सोशिक. सासू सासऱ्यांची सेवा असो वा गुरांना पाणी पाजणं असो, दोन चाड्याच्या पाभरीतून पेरणी असो की दारं धरण्याचं काम असो ती मागं कधी हटली नाही.

स्वतःच्या वाट्याला आलेली सुखंदेखील तिने भावकीत वाटली होती. सुभद्रेच्या बाकी बहिणी गावात आल्या की त्यांना विशेष लळा, माया, आस्था लाभे. कारण त्या दूर असत आणि गावानजीक असणाऱ्या सुभद्रेला माहेरी आल्यावरही फारसा फरक वाटत नसे. मुळात या घरच्या अंगणातून काढून त्या घराच्या अंगणात लावलेल्या तिच्या देहाच्या रोपट्याने सासर माहेरच्या अंगणात कधी फरकच केला नव्हता. पण सुभद्रा समाधानी होती.

शेलाट्या बांध्याची, श्यामसावळ्या रंगाची सुभद्रा म्हणजे शंभर नंबरी सोनं होतं. भावजय माहेरी गेली की सुभद्रेला माहेरी जावं लागे. खास सुभद्रेसाठी माहेरपण असं क्वचितच घडलं होतं. तिच्या रत्नाईला याची खंत असायची. सुरुवातीच्या वर्षात शेतीवाडीची, कामांची आणि मुलांची ओढ सुभद्रेला जास्तीच असायची. आता तिची मुलं मोठी झाली होती तरीही कुठल्या न कुठल्या कारणाने तिला मनसोक्त राहण्याचं सुख विशेष लाभत नव्हतं. अलीकडं एक नवंच लोढणं तिने गळ्यात बांधून घेतलं होतं ते म्हणजे लाडू! ती सुभद्रेची लाडकी गाय होती.

तिचा हात पाठीवर पडल्याशिवाय तिची आचळं तटतटुन येत नसत, ती धारा देत नसे. तिचा आवाज कानी पडल्याशिवाय ती अमुन्याच्या पाटीला तोंड लावत नसे. सुभद्रा माहेरी गेली की लाडूचे हाल होत. मग तिच्यात जीव गुंतलेली सुभद्रा सासरी परत येई. कधी कधी रोज खेटे मारून ती आपली माया निभावून नेई. लाडूच्या कारणाने तिला निवांत राहता येत नाहीये हे रामकृष्ण आबा आणि रत्नाईच्या ध्यानी आलं होतं. सुभद्रेच्या आभाळमायेपुढे तेही हतबल होते. बघताबघता लाडूही मोठी झाली तिचं पहिलं वेत झालं. तिला कालवड झाली. लाडूचं दुध शेरभर वाढलं. असेच दिवस जात राहिले आणि दिवाळी तोंडावर आली.

सुभद्रेने यंदाच्या दिवाळीत मनभरून माहेरी राहावं म्हणून तिच्यासोबत लाडूला देखील माहेरी आणलं गेलं. वस्तीवरच्या गोठ्यात तिची रवानगी झाली. एव्हाना लाडूचं दुध बऱ्यापैकी कमी झालं होतं. पहिल्या दिवशी तिने हिरवीगार वाडं खाल्ली, पेंड चारा खाल्ला. पण दुसऱ्या दिवसापासून तिने खाणं सोडून दिलं. रामकृष्णआबांचं घर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन निघालं होतं पण सुभद्रेचा आनंद नितळ नव्हता.

लाडूचं उपाशी राहणं तिला टोचत होतं. लाडूचं सगळं चित्त कशात गुंतलं आहे हे सुभद्रेने एव्हाना अचूक ताडलं होतं. कारण ती देखील एक आई होती. घरात कुणाचं लक्ष नसताना ती गोठ्यात जाऊन लाडूपाशी बसे, तिच्या अंगावरून हात फिरवे तेव्हा त्या दोघींच्या डोळ्यात पाणी यायचं. लाडूची तगमग सुभद्रेला सहन होत नव्हती. लाडूला तिच्या वासराची ओढ लागली होती आणि तिच्या डोळ्यातली ओल सुभद्रेच्या काळजात उतरली होती.

लाडूची तगमग बघवेनाशी झाली तेव्हा दिवाळीच्या पहिल्या अंघोळीच्या दिवशी तिने लाडूला सोबत घेऊन सासरचा रस्ता धरला होता. वाटेने कुणी आडवं आलं तर तिचं रक्षण करायला झिल्या तिच्या सोबतीला होताच. मजल दरमजल करत तासाभरात ती सासरी वस्तीवर पोहोचली देखील. वस्ती जवळ येताच लाडूने सुभद्रेच्या हाताला हिसका देत आपल्या कालवडीकडे धाव घेतली. तिचं सर्वांग चाटायला सुरुवात केली. सुभद्रेच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू वाहत होते.

इकडे रामकृष्ण आबांना पहाटेस जाग आली तेंव्हा सुभद्रा जागेवर नसल्याने क्षणभर ते बावरले. मनातली शंका दूर करण्यासाठी ते गोठ्यात गेले आणि त्यांचा संशय खरा ठरला. सुभद्रा सासरी गेल्याने रत्नाईच्या मनाला टोचण लागली. आबांनी तिची समजूत घातली, “सुभद्रा आता माहेरवाशीन उरली नाही, तिचं गणगोत आपल्यापरीस दसपट आहे. कैक जीवांची ती आई आहे, तिचं मातृत्व निभावण्यातच तिला अधिक आनंद आहे, तेंव्हा रत्नाईने आपल्या लेकीवरचा माहेरपणाचा हट्ट आता सोडलेला बरा!''

सुभद्रेचं माहेर आता सरलं होतं. आई असण्यातली परिपक्वता तिच्यात कैकपटीने मुरली होती त्याला कुणाचाच काहीच इलाज नव्हता. तिकडे बऱ्याच दिवसानंतर लाडूने चरवी भरून दुध दिलं. लाडूच्या धारोष्ण दुधात सुभद्रेचे अश्रू मिसळल्याने त्याला वेगळीच चव आली होती....

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com