Nagpur News : कोकणासह राज्यातील अन्य ठिकाणी डोंगराळ भागातील पाणी अडविण्यासाठी छोटे बंधारे बांधण्यासाठी नवी योजना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आणू, असे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत गुरुवारी (ता. १४) दिले.
लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे प्रलंबित असल्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला असता भास्कर जाधव यांनी कोकणातील डोंगर उतारावरील पाणी वेगाने वाहून जाते.
तेथे विहिरी काढण्यासाठी १५ ते १६ लाख रुपये लागतात. त्यामुळे शेततळे योजनेचा विस्तार करण्याची गरज आहे, अशी मागणी केली. तसेच भाजपच्या आशिष शेलार यांनीही कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मागणी केली असता मुंडे यांनी ही घोषणा केली.
लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर शेततळ्यांपैकी जवळपास ६९३ शेततळ्यांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. तसेच राज्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने कोरडवाहू शेतकरी अडचणीत आला असल्याची बाब देशमुख यांनी निदर्शनास आणली. शेततळ्याचे ४८८७ अर्ज लॉटरी पद्धतीने नाकारले आहेत. मराठवाड्यात २८ हजार शेततळ्यांची मागणी आहे पण ती पूर्ण होत नाही, असाही मुद्दा उपस्थित केला.
या वेळी लाभार्थी अर्ज भरतो त्यावेळी इतर दहा ते ११ योजनांबाबत भरतो. त्या योजना टाकल्यानंतर शेततळे मंजूर होते. कृषी विभागाच्या शेततळे योजनेसाठी ७५ हजार तर रोजगार हमी योजनेतील योजनेतून सहा लाख रुपये मंजूर होतात.
त्यामुळे लाभार्थीच रोहयोची योजना स्वीकारतात आणि कृषी विभागाची योजना रद्द करतात. त्यामुळे ही रकमेतील तफावत लक्षात घेतली पाहिजे, असे कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करत लाभक्षेत्रात शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यास परवानगी देण्याचा मुद्दा उपस्थित केला. रोजगार हमीच्या कामात शिथिलता दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावर सरकार विचार करेल, असे आश्वासन देण्यात आले.
डोंगरमाथ्यावर पाणी साचले पाहिजे
शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी कोकणात विहिरी खोदण्यासाठी १५ ते १६ लाख रुपये खर्च येतो अशा वेळी कृषी विभागाचे ७५ हजार किंवा रोहयोच्या सहा लाखांत हे गणित बसत नाही. तसेच कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार तेथे दोन डोंगरांमध्ये तळी बांधली जातात. त्याऐवजी डोंगरमाथ्यावर पाणी साचले तर पाण्याचा उद्भव वाढेल असा मुद्दा उपस्थित केला.
मोठी तळी बांधतो त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्यासाठी डोंगरमाथ्यावर पाणी साचवून ठेवण्याबाबत अभ्यास समिती नेमाल का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर मुंडे यांनी विचार करू असे उत्तर दिले.
त्याला आक्षेप घेत भाजपच्या आशिष शेलार यांनी कोकणासाठी मागणी लावून धरली. यावर अशी योजना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मंजूर करू, असे आश्वासन मुंडे यांनी दिले.
शेततळ्यांची संख्या वाढवा
काँग्रेच्या बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाणी देण्याचा फायदा सांगत शेततळ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली. ते म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाणी दिले तर उत्पादकता वाढते, असा माझा अनुभव आहे. मी कृषी विभागाची जबाबदारी सांभाळली आहे. तेव्हा असे लक्षात आले की राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेकडील निधी कृषी विभागाकडे वळविता येऊ शकतो.
त्यातून राज्यात मोठ्या प्रमाणात शेततळे योजना राबवावी. त्यातून दुष्काळी भागात चांगली शेती होईल. आपले हे आकडे पाहिले तर काहीच चालले आहे असे दिसत नाही. अर्थमंत्री आणि अन्य लोकांसोबत बसून नवी योजना आणली पाहिजे. यावर मुंडे यांनी एकाच सरकारच्या दोन विभागांत किमतीची तफावत असेल.
यासाठी एकाच विभागाने योजना राबवावी. किंवा पैसे द्यावेत यासाठी मुख्यमंत्री, राहयो मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेऊन विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. बबनराव लोणीकर यांनीही शेततळी आणि विहिरी वाढविण्याची मागणी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.