
Agriculture Weather Update :
डॉ. कैलास डाखोरे, डी. डी. पटाईत
हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत पहिले तीन दिवस आकाश कोरडे राहील आणि पुढील दोन दिवस (ता. २ आणि ३ डिसेंबर) आकाश ढगाळ ते पूर्णत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मात्र केवळ लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत ५ मि.मी. पावसाची शक्यता दिसते.
सर्वत्र कमाल तापमान २७.० ते ३२.० अंश, तर किमान तापमान ११ ते २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता अनुक्रमे ४४ ते ८७ व ३६ ते ७४ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी ७ ते १८ किमी प्रति तास राहील.
मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू २ ते ३ अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील चोवीस तासांत फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर हळूहळू ३ ते ५ अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ता. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे किंवा सरासरीपेक्षा कमी राहील. त्या
पुढील ता. ६ ते १२ डिसेंबर दरम्यान पाऊस या काळातील सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. इस्रो अहमदाबाद यांच्या सॅक उपग्रहाने घेतलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
ज्वारी
लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात अमेरिकन लष्करी अळीचा (शा. नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) दुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मि.लि.
टीप ः वरील फवारणी आलटून पालटून करताना कीटकनाशक पोंग्यात पडेल, याची काळजी घ्यावी.
ऊस
वाढलेल्या बाष्पोत्सर्जामुळे ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी - प्रमाण प्रति लिटर पाणी
क्लोरपायरीफॉस (२० %) २.५ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.४ मि.लि.
पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० टक्के) ३.६ मिलि. प्रति लिटर पाणी फवारणी करावी.
हरभरा
जोमदार वाढीसाठी हरभरा पीक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी करावी.
हरभरा पिकास आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे.
हरभरा पिकाची पेरणी करून २५ ते ३० दिवस झाले असल्यास १९:१९:१९ या विद्राव्य खताची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक फवारणी करावी.
सुरुवातीच्या काळात हरभरा पिकात मर, मूळकुज, मानमूज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतामध्ये १० टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव असल्यास प्रादुर्भावग्रस्त भागात बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा २० मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे एक आळवणी करावी.
तुती रेशीम उद्योग
कर्नाटक, आंध्र प्रदेश या दक्षिणात्य राज्यांना जवळ समुद्रामुळे परतीच्या पावसाचा तुती लागवडी साठी आणि वातावरणात आर्द्रता योग्य ठेवण्यासाठी फायदा होतो. मात्र त्या तुलनेमध्ये उत्तर कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात हवामान उष्ण व कोरडे आहे. पहिल्या व दुसऱ्या रेशीम कीटक वाढीच्या अवस्थेत २८ अंश सेल्सिअस तापमान व ८५ टक्के आर्द्रता महाराष्ट्र राज्यात राहण्यात अडचणी येतात.
तुतीची पाने दिवसाच्या वातावरण थंड असलेल्या काळात करावी. त्यानंतर त्यांच्या साठवणीसाठी लिफ चेंबरचा वापर करावा. त्यावर गोणपाट झाकून पाणी शिंपडत राहावे म्हणजे फांद्या सुकणार नाहीत. तुती पाने १० टक्के इतकी जरी सुकली तरी किटकांना खाता येत नाहीत. हिवाळ्यात तापमान २० अंशांच्या खाली गेल्यावर रूम हीटर किंवा कोळशाच्या शेगडीचा वापर करावा. पण संगोपन गृहात धूर होणार नाही याची काळजी घ्यावी.
हळद
वाढलेल्या बाष्पोत्सर्जामुळे आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
काही ठिकाणी कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनालफॉस (२५%) २ मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के) १.५ मि.लि. (हळद पिकावर लेबल क्लेम नाही, विद्यापीठाची शिफारस) उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.
हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
ॲजॉक्सीस्ट्रॅाबिन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ मि.लि. अधिक ०.५ मि.लि. स्टीकर.
करडई
मागील काही दिवसांत किमान तापमानात झालेली घट ही वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकातील मावा किडीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असेल. करडई पिकात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी
डायमिथोएट (३० टक्के) १.३ मि.लि.
पिकात तणांच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीनंतर २५ ते ५० दिवसांपर्यंत एक ते दोन कोळपण्या व खुरपण्या घ्याव्यात.
बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास ६५ किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तणविरहित ठेवावेत. आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
- डॉ. कैलास डाखोरे (प्रकल्प समन्वयक), ७५८८९९३१०५
- डी. डी. पटाईत (सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग), ७५८८०८२०४०
(ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.