Agriculture Extensition : कृषी विस्तारामुळे मिळाले संरक्षित शेतीमध्ये यश

वाराणसी जिल्ह्यातील बांगलीपूर गावातील अवनिश पटेल यांनी नैसर्गिक वायुविजन पद्धतीचे हरितगृह १० गुंठे क्षेत्रावर उभारले. त्याला राज्य सरकारच्या फळबाग विभागाकडून अनुदानही मिळाले.
Agriculture
AgricultureAgrowon

कोणतेही नवे तंत्रज्ञान स्वीकारताना ते अत्यंत डोळसपणे अंगीकारण्याची आवश्यकता असते.

केवळ अनुदान (Subsidies) मिळते म्हणून हरितगृह (Greenhouse) किंवा नेटहाउसची (Nethouse) उभारणी करणे म्हणजे कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकण्यासारखे असते.

बांगलीपूर (वाराणसी) येथील अवनिश पटेल यांची ही चूक वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेतील (Vegetable Research Institute) शास्त्रज्ञांच्या प्रयत्न आणि मदतीमुळे वेळीच सुधारली गेली.

आज अवनिश पटेल हे परिसरामध्ये हरितगृह शेतीतील शास्त्रीय व्यवस्थापनातील ‘मास्टर’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.

कृषी विस्तार आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वेळीच शास्त्रीय माहिती व व्यवस्थापन पद्धती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे हे शक्य झाले.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील बांगलीपूर गावातील अवनिश पटेल यांनी नैसर्गिक वायुविजन पद्धतीचे हरितगृह १० गुंठे क्षेत्रावर उभारले. त्याला राज्य सरकारच्या फळबाग विभागाकडून अनुदानही मिळाले.

मात्र त्यात घेतलेल्या टोमॅटो पिकाची लागवड योग्य वेळी न केल्यामुळे आणि पिकांचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने न केल्यामुळे पहिल्याच पिकामध्ये त्यांना नुकसान सोसावे लागले. इतकी मोठी भांडवली गुंतवणूक आणि त्यात झालेले नुकसान यामुळे त्यांना मोठा धक्का बसला.

आपले काही तरी चुकले हे त्यांच्या लक्षात आले. पण अधिक माहिती घेण्यासाठी त्यांनी वाराणसी येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. त्यांच्या विनंतीवरून जुलै २०२१ मध्ये शास्त्रज्ञांच्या गटाने हरितगृहाला भेट देत पाहणी केली.

संरक्षित शेती पद्धतीची तांत्रिक आणि शास्त्रीय माहिती नसल्यामुळे व्यवस्थापनामध्ये अनेक त्रुटी राहिल्याचे त्यांच्या प्राथमिक भेटीमध्ये स्पष्ट झाले. मग शास्त्रज्ञांनी याच पॉलिहाउसमध्ये ढोबळी मिरची आणि टोमॅटो या दोन्ही पिकांची प्रात्यक्षिक स्वतःच्या देखरेखीखाली घेण्याचा निर्णय घेतला.

ढोबळी मिरचीच्या स्वर्णा अतुल्या आणि अन्य खासगी कंपन्यांच्या दोन जातींची निवड केली. त्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीने मशागतीसह व्यवस्थापनाची सर्व कामे वेळच्या वेळी करण्यावर भर दिला.

पिकामध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाची नोंद आणि देखरेख शास्त्रज्ञांकडून त्याच वेळी करण्यात आली. त्यामुळे अवनिश पटेल यांच्या हरितगृहातून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्वीच्या उत्पादनाच्या १५ पट अधिक उत्पादन मिळाले.

०.२५ एकरामधून एकूण सात महिन्यामध्ये २८६४ किलो मिरचीचे दर्जेदार उत्पादन मिळाले. त्यातून त्यांना १.२७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Agriculture
Nagar Vegetable Market : नगरला गाजर, वाटाणा, हिरवी मिरचीची आवक वाढली

हरितगृहाचे तंत्र नेमकेपणाने जाणून पीक व्यवस्थापनाच्या शास्त्रीय पद्धती राबवल्यास होणारा प्रत्यक्ष फायदा स्वतः अवनिश पटेल यांच्यासोबत परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रयोगामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी शास्त्रीय ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न खरोखरच लाखमोलाचे ठरले.

दर्जेदार मिरचीने वेधले सर्वांचे लक्ष

या प्रयोगाच्या दरम्यान भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये १४ ते १६ डिसेंबर २०२१ या काळामध्ये भाजीपाला संशोधन आणि पोषकता, उद्योजकता आणि पर्यावरणातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी अवनिश पटेल यांच्या रंगीत ढोबळी मिरचीचे प्रदर्शन मांडले होते.

१७ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्व उत्तर प्रदेशातील हरितगृह उत्पादकांसाठी पटेल यांच्या हरितगृहावरच खास शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेचे संचालक डॉ. टी. के. बेहेरा यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अवनिश पटेल यांची पाठ थोपटली.

(स्रोत ः भारतीय भाजीपाला संशोधन संस्था, वाराणसी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com