विजय मोरे
विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दि. ३ ते ९ नोव्हेंबर, २०२३ दरम्यान कमाल तापमान सरासरी इतके, तर किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
खरीप भात :
हे पीक सध्या तीन जातीनुसार दोन अवस्थेत आहे. हळव्या आणि निमगरव्या जाती या प्रामुख्याने दाणे भरण्याची ते पक्वता या अवस्थेत आहेत. तर गरव्या जाती दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत.
तयार हळव्या व निम गरव्या भात पिकाची कापणी जमिनीलगत वैभव विळ्याने सकाळच्या वेळी करावी. कापणी केल्यानंतर भात शेतात न ठेवता ठरावीक वेळेनंतर भात सुरक्षित ठिकाणी न्यावे. मळणी करून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी भात पसरून ठेवावे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भात पीक दुधाळ अवस्थेत असताना लोंबीवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येतो. पिकाचे सातत्याने निरीक्षण करत राहावे. या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी,
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ०.९ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि.
माळजमिनीवर असलेल्या हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे समजते. अशा ठिकाणी तयार झालेल्या हळव्या भात पिकाची त्वरित कापणी करावी. शेतात १ ते २ दिवस पाणी बांधल्यास देखील या किडीचे नियंत्रण होते.
भात कापणीनंतर जमिनीची खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामुळे किडीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल.
नागली/नाचणी
दाणे भरणे ते पक्वता
पक्व नागली पिकाची कणसे विळ्याने कापून शेतात न ठेवता कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावीत. वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले धान्य २ ते ३ उन्हे देऊन सुरक्षित आणि कोरड्या जागी साठवणूक करावी.
वाल, कुळीथ, चवळी
पेरणी
भात कापणीनंतर जमिनीच्या अंगओल्यावर विनामशागत वाल किंवा कडवा वाल पिकाची पेरणी करावी. त्यासाठी भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने दोन ओळीत ३० × १५ सें.मी. अंतर ठेवून वालाची पेरणी करावी. पेरणी करतेवेळी बियाण्याशेजारी हाताने छिद्र पाडून, त्यात दाणेदार मिश्रखत १९ः१९ः१९ गुंठ्यास एक किलो या प्रमाणे द्यावे. अशाच पद्धतीने चवळी आणि कुळीथ पिकाची पेरणी जमिनीच्या अंगओलितावर करणे शक्य आहे.
मशागतीनंतर वाल पिकाची पेरणी करणार असाल, तर भात कापणीनंतर वाफसा आल्यानंतर जमिनीची नांगरट करावी. नांगरणीच्या वेळेस प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावे. जमीन समपातळीत आणल्यानंतर वाल बियाण्याची टोकण पद्धतीने ३० × १५ सें. मी. किंवा ३० × २० सें. मी. किंवा ३० × ३० सें. मी. अंतरावर पेरणी करता येते. पेरणीवेळी ५४० ग्रॅम युरिया आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति गुंठा ओळीमध्ये बियाण्याखाली साधारण ५ सें.मी. खोलीवर द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.
दोन्ही पद्धतीने वालाची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या प्रक्रियेनंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया पेरणीपूर्वी १ तास आधी करावी व बियाणे सावलीत सुकवावे. रायझोबियमच्या प्रक्रयेमुळे मुळांवरील गाठीची संख्या वाढते. नत्राचे स्थिरीकरण जास्त होऊन उत्पादनात वाढ होते.
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ , ८१४९४६७४०१
(नोडल ऑफिसर, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.