Adani Hydroelectric Project : कोल्हापूर पाठोपाठ आता अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला साताऱ्यात तीव्र विरोध

Satara Hydroelectric Project : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणावरील अदानी समुहाच्या वीज निर्मीती प्रकल्पास मोठा विरोध झाला होता. त्यानंतर हा पाटगांव मध्यम प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला. यानंतर आता असाच विरोध सातारा जिल्ह्यात अदानी समुहाला होत आहे.
Adani Hydroelectric Project
Adani Hydroelectric ProjectAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती गौतम अदानी हे धारावी झोपडपट्टी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणवरून चांगलेच चर्चेत आले होते. अदानींना धारावी झोपडपट्टी पुर्नविकासावरून महाविकास आघाडीने तर कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाटगाव धरणवरून जनआंदोलन उभारत विरोध केला होता. यानंतर आता अदानींना साताऱ्यात विरोधाला सामोरे जावं लागत आहे. येथे होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पास आता विरोध वाढत आहे. दरम्यान श्रमिक मुक्ती दलाकडून या प्रकल्पास विरोध केला जाईल असे डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.

सह्याद्री पर्वतरांगा या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचे काम करतात. येथे जैवविविधता पाहायला मिळते. मात्र यावर आता केंद्र सरकारकडून घाला घालण्याचे काम होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने अदानींबरोबर 'अर्थपूर्ण' संबंध दृढ करण्यासाठी राज्यातील अनेक मोठे प्रकल्प अदानी समुहाला दिले आहेत. त्यातच आता सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेत तीन जलविद्युत प्रकल्प उभारण्यास अदानी समुहाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात आढळणाऱ्या जैवविविधतेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

Adani Hydroelectric Project
Patgaon Dam Adani Power Project : गौतम अदानींना कोल्हापुरी हिसका, अखेर पाटगाव धरणावरील प्रकल्प रद्द

याबाबत आर्टिकल १४ या संस्थाचा अहवाल प्रसिद्ध झाला. ज्यात अदानी समूहाला केंद्र सरकारने फक्त भाजप हित लक्षात घेऊन सातारा, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जलविद्युत प्रकल्पास मंजूरी दिली आहे. ही परवानगी जुलै २०२३ मध्ये देण्यात आली होती. आर्टिकल १४ या संस्थाच्या अहवालानुसार आणि पर्यावरणीय तज्ज्ञांनुसार या प्रकल्पांमुळे सह्याद्री पर्वतरांगेतील जैववैविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी देताना सर्व पर्यावरणीय नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

तसेच अशी परवानगी केंद्राने दिलीच कशी असा सवाल आता जिल्ह्यातील पर्यावरण तज्ज्ञांसह नागरिकांकडून होत आहे. तर आता यावरूनच श्रमिक मुक्ती दलाने या प्रकल्पांला विरोध दर्शवला आहे. तसेच याबाबत अदानींनी खुलासा करावा असे डॉ. भारत पाटणकर यांनी म्हटले आहे.

Adani Hydroelectric Project
Adani Project : ‘पाटगाव’मधून एक थेंबही पाणी अदानी वीज प्रकल्पास देणार नाही

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी, पर्यावरणाच्या दृष्टीने सह्याद्रीचा पश्चिम घाट हा महत्वाचा आणि अतिसंवेदनशील आहे. तो जागतिक वारसा यादीत असूनही या या प्रकल्पांना केंद्राने परवानगी कशी दिली, असा सवाल केला आहे.

तसेच या प्रकल्पांमुळे येथे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे श्रमिक मुक्ती दलाचा याला विरोध आहे. साताऱ्यातील तारळी येथे होणाऱ्या पीएसएचपीच्या १५०० मेगावॅटच्या प्रकल्पाची माहिती जिल्ह्यातील जनतेपासून का लपवून ठेवण्यात आली? याचा खुलासा अदानींसह सरकारने करावा असे पाटणकर यांनी म्हटले आहे.

तारळी धरणावर वीज निर्मिती प्रकल्प

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डांगीस्तेवाडी गावात अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात आला होता. येथील तारळी नदीवरील तारळी धरणावर आणखी एका जलाशयाची निर्मिती करून १५०० मेगावॅट वीज निर्मिती करणारा प्रकल्प प्रस्तावित आहे.

या प्रकल्पास तारळी धरणाचा खालील भागातील बामनेवाडी, मुरुड येथील जलाशय वापरता येणार आहे. तर पाटण तालुक्यातील निवडे गावाजवळ एक अतिरिक्त जलाशय (धरण) बांधले जाणार आहे. याचा वापर हा वीज निर्मितीसाठी केला जाईल. निवडे गावाजवळील अतिरिक्त धरण हे ०.४० टीएमसीचा असून ज्याची उंची ६१.५ मीटर असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com