
Jalgaon News : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांचा महत्त्वाकांक्षी आंतरराज्य मेगा रिचार्ज प्रकल्प योजनेचा (Mega Recharge Project) दोन्ही राज्यांद्वारे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून दोघा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेण्यासंदर्भात तयारी सुरू आहे. या योजनेचे यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते भूमिपूजन होईल, असे संकेत आहेत.
जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशासाठी वरदान ठरणाऱ्या तापी परिसरातील मेगा रिचार्जबाबत मागील २० ते २२ वर्षे चर्चा सुरू आहे. तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावे केला.
या प्रकल्पाच्या प्रशासकीय कामाला तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या हवाई पाहणीनंतर वेग आला. सर्वेक्षण व इतर कामे झाली. निधी किती लागेल याची चर्चा झाली. केंद्राने हा प्रकल्प प्रायोगिक प्रकल्प म्हणून हाती घेतला. त्यासाठी निधी देण्याची तयारी केली.
योजनेचा तपशीलवार कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्यातील पाणीवाटप अंतिम करण्यासाठी दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक होणार आहे. त्याबाहत रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे मागणी केली होती.
तापी मेगा रिचार्ज प्रकल्प मध्य प्रदेशात तापी नदीवर खारिया गोटी येथे असणार आहे. सातपुडा पर्वतरागांत त्यातून पाण्याचे पुनर्भरण करण्याची ही योजना आहे.
मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि महाराष्ट्रात अकोला व अमरावतीचा सातपुडालगतचा भाग, जळगावमधील यावल, रावेर व चोपडा या तालुक्यांत भूगर्भातील जलपातळी उंचाविण्यास यातून मदत होईल. चोपडा, यावल व रावेरात भूजलपातळी झपाट्याने घटते. ही घट या प्रकल्पाने थांबेल.
तसेच सातपुडा पर्वत ते तापी नदी यामधील भागात भूगर्भातील जलसाठे मुबलक तयार होतील. केळी पट्ट्यासाठी हा प्रकल्प लाभदायी ठरू शकतो. कारण रावेर तालुका केळीचे आगार आहे.
२०१६ मध्ये हा प्रकल्पाची अंदाजित किंमत सहा हजार कोटी एवढी होती. यातील १०० टक्के निधी केंद्र सरकार देणार असल्याची माहिती मिळाली.
मोदींच्या हस्ते भूमिपूजन
आधीच मेगा रिचार्ज प्रकल्पाला वेळ झाला असून, या वर्षाच्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा घेण्यात येऊन, त्यांच्याच हस्ते भूमिपूजन करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. जळगाव येथील तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत कार्यवाही सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.