Jalgaon News : शेतात केळीची लागवड असतानाही लागवड न करतानाच शेतकरी विमा योजनेत सहभागी झाल्याचा जावईशोध प्रशासनाने अनेक प्रामाणिक केळीविमाधारकांच्या बाबतीत लावला आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी, जळगावातील भादलीखुर्द यासह इतर गावांमधील केळी विमाधारक शेतकरी संतप्त झाले आहेत.
तांदलवाडी येथील शेतकरी प्रेमानंद हरी महाजन यांची संयुक्त परिवाराची ७० हजार झाडे केळी दरवर्षी असते. एका हेक्टरमध्ये साडेपाच बाय साडेपाच फूट अंतरात लागवडीनुसार चार हजार झाडे असतात.
महाजन यांनी आपल्या कुटुंबातील सहा जणांच्या नावाने ऑक्टोबर २०२२ मध्ये २४ हेक्टर केळीखालील क्षेत्राला विमा संरक्षण घेतले होते. महाजन यांना केळी पिकातील उत्कृष्ट कार्याबाबत कृषिभूषण, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानरत्न हे शासकीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
‘अॅग्रोवन’च्या केळीसंबंधी शेतकरी नियोजन या तांत्रिक लेखमालेतही प्रेमानंद महाजन यांच्या शेतीचे व्यवस्थापन व इतर बाबींची माहिती प्रसिद्ध झाली आहे. विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी महाजन यांची मदत कृषी विभागाने घेतली. महाजन यांना या योजनेत सहभागी होण्याची विनंती केली.
दरम्यान, शेतकरी योजनेत सहभागी होवू लागले. महाजन यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये विमा संरक्षण घेतलेल्या सर्वच शेतांत केळीची लागवड होती. परंतु महाजन यांचे सर्व २६ हेक्टर क्षेत्राचे विमा प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले आहेत. यातून पीक पडताळणीबाबत संशय व प्रश्न उपस्थित होत आहे. विमा कंपनीचा भोंगळ कारभारही समोर आला आहे.
जळगाव तालुक्यातील भादली खुर्द गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. येथील ९९ टक्के क्षेत्रात केळी पीक असते. परंतु या गावातील सुमारे ३०० शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव कंपनीने नामंजूर केले आहेत.
सॅटेलाईट इमेज व एमआरसॅटकडून तांत्रिक माहिती घेऊन कृषी विभागाने केळी पिकाची पडताळणी केली होती. ही पडताळणी करतानाच अनागोंदी झाली आहे. ही पडताळणीच चुकीची व नियमबाह्य असल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.