
Agricultural Yojana : सर्व कृषी विद्यापीठांमधील शेतीविषयक उपक्रम आणि कार्यक्रमांबाबत माध्यमांना माहिती द्यावी, असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. एरवी फटकून राहणाऱ्या कृषी विद्यापीठांचे उपक्रम सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचावेत, या साठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा आदेश दिला आहे. याबाबत कृषी विभागाने परिपत्रक काढून सर्व विद्यापीठांना सूचना दिली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली या विद्यापीठातील दैनंदिन घडामोडी, कार्यक्रमांबाबत माध्यमांना माहिती दिली जात नाही. त्याबाबतची पूर्वसूचनाही दिली जात नाही. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही. कार्यक्रम झाल्यानंतरही त्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी तत्परता दाखविली जात नाही.
कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत असते. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. मात्र कृषी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या उपक्रम, संशोधनाची माहितीच होत नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे समोर आल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
त्यामुळे कृषी विद्यापीठांतील विविध घडामोडींबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच विद्यापीठांमार्फत केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या संशोधन व उपक्रमांना शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी माध्यमांना माहिती द्यावी, असे आदेश दिले आहेत.
शासनाच्या धोरणास अनुसरून होणारे कार्यक्रम, घडामोडी यांची पूर्वसूचना देण्याबरोबरच कार्यक्रम झाल्यानंतर प्रसिद्धीची व्यवस्था करावी. तसेच विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपर्कात राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.