Aishwary Patekar : संचित नाहीतर काय म्हणावं !

Article by Aishwary Patekar : हा माझा लेखक असण्याचा रियाज जो मी सतत करत आलो आहे. याचंच फलित म्हणजे ‘भुईशास्त्र’ हा माझ्या काव्यसंग्रह.
Aishwary Patekar
Aishwary PatekarAgrowon

हा माझा लेखक असण्याचा रियाज जो मी सतत करत आलो आहे. याचंच फलित म्हणजे ‘भुईशास्त्र’ हा माझ्या काव्यसंग्रह. त्याने जे सन्मान माझ्या पदरात घातले त्यापेक्षा त्याने ज्या माणसांच्या सन्मुख मला नेऊन उभे केले ते मला जास्त महत्त्वाचे वाटते. दिल्लीत एका कार्यक्रमात माझी भालचंद्र नेमाडे यांच्याबरोबर भेट झाली.

ते मला म्हणाले, ‘‘ऐश्‍वर्य, तुझ्यात गाव ठासून भरले आहे; ते जरा उकर!” खरं तर तेच गाव उकरून मी ‘जू’ आत्मकथनात ठेवलं अन् अगदी काल प्रकाशित झालेल्या ‘कासरा’ कवितासंग्रहातही ते आलं. मुळात मातीवर जर शेण पडलं, की ते माती घेऊन उठतं तसच लेखक कवी ज्या समाजात राहतो, जा प्रदेशात राहतो त्याचा परिसर घेऊन तो उठत असतो.

थोडक्यात सांगायचे तर लेखन ही गोष्ट एखाद्या सामान्य माणसाला त्याच्या लेखनकर्तृत्वामुळे वेगळं बनवते याचा अनुभव मी हरघडी घेतला आहे. मी जर लेखन केलं नसतं, तर आयुष्यातलं बरच काही गमावून बसलो असतो. पण लेखक असण्याच्या गोष्टीने वेळोवेळी काही मला दिलं आहे, ज्याचं मोल आपण नाही करू शकत. मला आठवतं माझी ‘बाभूळकांड’ नावाची कथा ‘साधना’ नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. ती वाचून मला फोन आला. मला त्या वेळी तो उचलता आला नाही. जरा वेळाने त्या नंबरवर मी फोन लावला.

Aishwary Patekar
Aishwary Patekar : वाचकांच्या संचिताची उबदार गोधडी

“तुम्ही फोन केला होता?”

“हो, तुमचं लिखाण आवडलं ते सांगण्यासाठी. मी तुमचं याआधीचं काहीच वाचलेलं नाही. तुमचं नावही मला माहीत नव्हतं. तुमची शैली फार आवडली. अतिशय संयत अन् वेगळीच, अतिशय उत्तम लिखाण; अशा प्रकारचं लिखाण मी पहिल्यादी वाचतोय. मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही लिहीत राहवं..!”

तोपर्यंत मला वाचकांशी बोलण्याची एक टिपिकल सवय लागली होती. त्यानुसारच मी त्यांना बोलतं करण्यासाठी माझे प्रश्‍न सुरू केले.

“काय करता सर तुम्ही?”

“मी छोटसं समाजकार्य करतो!”

“गाव कुठलं?”

“गडचिरोली?”

“नाव काय सर तुमचं?”

“अभय बंग!”

नि:शब्द झालो. अंगावर काटा आला. डोळे ओलावले. खरं तर मला समाजकार्य करता येत नाही; म्हणून मी लिखाण करतो. मी अभय बंग या माणसाच्या कार्यासमोर नतमस्तक तर आहेच; मात्र त्यांच्या विचारांनी मी अनेकदा प्रभावित झालो आहे. त्यांच्या बातम्यांची कात्रणे मी माझ्या वहीत चिकटवून ठेवली आहेत.

Aishwary Patekar
Aishwary Patekar : माझ्या साहित्याची बीजे गावात दडलेली आहेत.

त्याच माणसाने फोन करुन आपल्या लिखाणाची तारीफ करावी! बरं जेव्हा ‘जू’ आलं तेव्हा वाटलंही होतं, की आपण त्यांना पाठवू. परत वाटलं की त्यांच्या कामातून कधी वेळ मिळेल? काहीही असो, त्यांच्या एका फोनने खूप काही दिले. माझ्या डोळ्यासमोर २८ वर्षांपूर्वी पहिली कविता लिहिणारा एक पोरगा उभा राहिला. सदोदित कागदाच्या ढिगाऱ्याशी बसून असायचा.

कधी कधी वाटायचं की या कागदाच्या ढिगाऱ्यातच तो बुजून जाईल की काय? त्याला त्या कागदांवरून कोसणारेच अनेक. त्याने लिहू नये अशी परिस्थिती. आज त्या पोराच्या डोळ्यात आनंद अश्रू. एक डोंगराएवढा माणूस त्याला लिहीत राहण्यासाठी विनंती करतो. लिखाणाने पुरस्कार किती दिले, हे मी न मोजणारा माणूस आहे; पण अशा माणसाची संख्या पुरस्कारापेक्षा जास्त करण्यासाठी आयुष्यभर झटेन. यास संचित नाही तर काय म्हणणार?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com