Pune News : विधानसभेच्या २८८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंळवारी (ता.३०) संपली. यावेळी सुमारे ११ हजार अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहे. अनेक जागांवर महायुतीसह महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. तिसऱ्या आघाडीसह महाराष्ट्र नव निर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह छोटे-छोट्या पक्षांना दंड थोपाटले आहेत.
आतापर्यंत जाहीर केलेल्या यादीतून महायुती २८२ तर मविआकडून २८७ उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहेत. तर थेट ४७ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळणार आहे.
राज्यात विधानसभा जाहीर झाल्यापासून अनेकांनी उमेदवारीसाठी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यात काहींना यश आले. तर काहींनी अपक्ष उभरावे लागले आहे. शेवटच्या दिवशी ४ हजार ९९६ उमेदवारांनी ६ हजार ४८४ अर्ज दाखल केले. यामुळे आतापर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
आज (ता.३०) अर्जांची छाननी होणार असून ४ नोव्हेंबर २०२४ रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतरच विधानसभेच्या मैदानात किती उमेदवार असतील याचा खरा आकडा समोर येणार आहे. मतदान २० नोव्हेंबरला होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
मात्र महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करत शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरून आता महायुतीसह मविआचे नेते ४ तारखेपर्यंत बैठका घेऊन यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजप-काँग्रेसची निवडणुकीत शंभरी पार
विधानसभा निवडणुकीत यंदा सहा पक्ष लढणार असून यात भाजप, काँग्रेससह दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी आहेत. सर्वाधिक १५२ उमेदवार भाजपने दिले आहेत. त्यांची अपेक्षा १६० जागांची होती. येथे भाजपला ८ जागा कमी झाल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांना ९० जागा हव्या होत्या. मात्र त्यांना ८० जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार गटाला सर्वात कमी ५२ जागा मिळाल्या असून त्यांची अपेक्षा ६० जागांसाठी होती. यावेळी शिंदे यांच्या १० आणि अजित पवार गटाच्या ८ जागा कमी झाल्या आहेत.
असेच काहीसे चित्र महाविकास आघाडीत देखील पाहायला मिळत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १०० जागा हव्या होत्या. पण त्यांना ९६ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या वाट्याला १०४ जागा आल्या असून काँग्रेसच्या मागणी प्रमाणे जागा मिळाल्या आहेत. तर शरद पवार यांच्या गटाला किमान ७० ते ८० जागा मिळतील अशी अपेक्षा असताना त्यांना ८७ जागा मिळाल्या आहेत.
मनसेसह वंचितचे उमेदवारी
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकीकडे महायुती आणि मविआत थेट लढत होत आहे. तर दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडी, तिसऱ्या आघाडीसह छोट्या-छोट्या पक्षांनी उमेदवार दिले आहेत. यात मनसेनं १३८ शिलेदारांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर वंचितने २०० पेक्षा अधिक ठिकाणांवर उमेदवार दिले आहेत.
शिवसेना विरूद्ध शिवसेना भिडणार
यंदा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना विरूद्ध शिवसेना भिडेल. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ४७ मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. रामटेक, मेहकर, चोपडा, बुलढाणा, बाळापूर, कन्नड, सिल्लोड, परभणी, कळमनुरी, पालघर, वैजापूर, पैठण, नांदगाव, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बोईसर, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, ओवळा-माजीवडा, कोपरी-पाचपाखाडी, मागाठणे, विक्रोळी, नेवासा, अंधेरी पूर्व, दिंडोशी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, चेंबुर, कुर्ला, माहिम, वरळी, भायखळा, कर्जत, महाड, उस्मानाबाद, परांडा, बार्शी, सांगोला, पाटण, दापोली, राधानगरी, सावंतवाडी, गुहागर, कुडाळ, राजापूर, रत्नागिरी येथे शिवसेना विरूद्ध शिवसेना भिडणार आहे.
मविआतदेखील गोंधळ
फक्त महायुतीतच उमेदवारीवरून गोंधळ आहे असे नाही तर मविआतदेखील गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत होणार असून येथे मविआचेच दोन उमेदवार आहेत. काँग्रेसचे भगीरथ भालके आणि शरद पवार गटाचे अनिल सावंत. भाजपकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे, आणि मनसेकडून दिलीप धोत्रे देखील मैदानात उतरले आहेत. परंड्यात ठाकरे यांच्या शिवसेनेने रणजित पाटील यांना उमेदवारी दिली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटे यांना उमेदवारी दिली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेचे अमर पाटील ही निवडणुक लढवत आहेत. तर दिलीप माने अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.