Indrjeet Bhalerao : संत रविदासांच्या भाष्यकाराची भेट

योगायोगानं मी सात आणि आठ जानेवारीला मिरजेत असणारच होतो. सात तारखेला सकाळी एका महाविद्यालयाचं स्नेहसंमेलन होतं. ते संपलं की दुपारून मी रिकामा असणार होतो. तेव्हा सांगलीत जाऊयात आणि जुन्या लेखक, कवीमित्रांच्या भेटी घेऊयात, असं मी ठरवलं होतं.
Indrjeet Bhalerao : संत रविदासांच्या भाष्यकाराची भेट

- इंद्रजीत भालेराव

मध्यंतरी औदुंबरमध्ये सांगलीच्या प्रसाद ग्रंथवितरणचे मालक त्रिलोकनाथ जोशी यांची भेट झाली, तेव्हा दरवर्षी ते घेत असलेला सांगलीतला ग्रंथमहोत्सव सात तारखेपासून (०७-०१-२०२४) सुरू होत आहे असं म्हणाले. उद्घाटक कोण आहेत ? असं विचारल्यावर ते म्हणाले तुम्ही येता का ? मी म्हणालो, 'मी येणारच आहे पण उद्घाटक म्हणून नव्हे. एक रसिक प्रेक्षक म्हणून येणार आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी तुमच्या प्रसाद ग्रंथ वितरण आणि भारती विद्यापीठानं सांगलीत घेतलेल्या पहिल्या ग्रंथमहोत्सवाचा मीच उद्घाटक होतो. तेव्हा आता पुन्हा मीच कशाला ?'. जोशी म्हणाले, 'मग काय हरकत आहे ? पुन्हा एकदा तुमच्याच हस्ते उद्घाटन करू'

मी म्हणालो, 'नको, मी तुम्हाला सांगलीतलाच एक तोलामोलाचा माणूस देतो.' ते म्हणाले, कोण हो ? मी म्हणालो, रवींद्र श्रावस्ती. ते म्हणाले, कोण आहेत हे ? मी म्हटलं, 'भारती विद्यापीठात मेडिकल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत. अनोखे डॉक्टर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते माझे आवडते लेखक आहेत. आणि ते खूप मोठे लेखक आहेत. त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करूयात.' ते म्हणाले, काहीच हरकत नाही. मग मी तिथूनच रवींद्र श्रावस्ती यांना फोन लावला आणि 'सात तारखेला संध्याकाळची वेळ राखीव ठेवा, अशा अशा ग्रंथमहोत्सवाचं तुम्हाला उद्घाटन करायचं आहे,' असं त्यांना सांगितलं. त्यांनी संकोचत होकार दिला. याचा मला आनंद वाटला.

योगायोगानं मी सात आणि आठ जानेवारीला मिरजेत असणारच होतो. सात तारखेला सकाळी एका महाविद्यालयाचं स्नेहसंमेलन होतं. ते संपलं की दुपारून मी रिकामा असणार होतो. तेव्हा सांगलीत जाऊयात आणि जुन्या लेखक, कवीमित्रांच्या भेटी घेऊयात, असं मी ठरवलं होतं. पण त्याच दिवशी ग्रंथमहोत्सवाचा उद्घाटन असल्यामुळे तिथं बहुतेक आपण भेटू इच्छिणारे सगळेजण येतील अशी मला खात्री होती. रवींद्र श्रावस्ती यांनाही मला भेटायचंच होतं. त्यांना यानिमित्ताने कार्यक्रमात सहभागी करून मी बोलावून घेतलं. पण त्यादिवशी श्रावस्ती सरांचा फोन आला की, सर तुम्ही आधी माझ्या घरी या मग आपण मिळून ग्रंथमहोत्सवाकडं जाऊयात. तेव्हा त्यांनी टाकलेल्या लोकेशनप्रमाणे आम्ही आधी त्यांच्या घरी गेलो.

डॉक्टर आमची वाटच पाहत थांबलेले होते. गावाबाहेर नव्या वसाहतीत बांधलेलं त्यांचं घर त्यांनी जेतवन या नावानं उभं केलय. घराभोवती ऐसपैस रिकामी जागा आहे. तिथं छान बागबगीचा, कारंजी असं सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि घरात तर छानच माहोल होता. नव्वदीला पोहोचलेल्या त्यांच्या आई होत्या, त्यांच्या सहधर्मचारिणी आणि बामसेफच्या कार्यकर्त्या दीपाताई होत्या, शिक्षक असलेले त्यांचे मोठे बंधू देखील घरीच होते. याच भावांनी आपणाला शिकवलं अशी कृतज्ञता डॉक्टरांनी व्यक्त केली. आज हे भलंमोठं कुटुंब नातवा-भाचरासह एकत्रित राहतय हे पाहून मला कितीतरी आनंद झाला.थोडक्यात डॉक्टरांचं जीवन समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा वाटलं डॉक्टरांनी आपलं आत्मकथन लिहायला हवं. पण नंतर बोलण्याच्या ओघात कळलं की त्यांच्या आईंनी त्यांच्या काही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. हे तर मला आणखीच भारी वाटलं.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्या आई-वडिलांचं कुटुंब होतं. थोडीफार शेती होती. पारंपारिक बलुत्याची कामं करून, रात्रंदिवस ते शेतीतही राबत होते. आई-वडील दुसऱ्याच्या शेतावरही काम करत होते. पण गावातल्या त्यांच्याच भाऊबंदांनी खूप त्रास दिल्यामुळे गावातल्याच एका पाटलानं त्यांना राहायला शेतावर जागा दिली. रवींद्र श्रावस्ती यांचं बारा वर्षापर्यंतचं लहानपण त्या झोपडीत गेलं. तिथूनच त्यांनी शिक्षण केलं. त्यांचे मोठे भाऊही तिथूनच शिकले. आई-वडील प्रचंड कष्ट करायचे. त्या कष्टाचं वर्णन डॉक्टर श्रावस्तींच्या तोंडून ऐकताना, माणसं किती काम करू शकतात याचा आपण अंदाजही करू शकत नाही, असं जाणवलं.

त्यांच्या आई-वडिलांनी ध्यासच घेतला की आपली मुलं शिकवायची. अशा परिस्थितीतून एक भाऊ शिकून मास्तर आणि पुढे मुख्याध्यापक झाला. त्यांच्याच आधारानं शिक्षण घेत रवींद्र स्वतः डॉक्टर झाले. भारती विद्यापीठात आता ते आरोग्य शास्त्राचे अध्यापन करतात. त्यांचा छोटासा पण समाजसेवी स्वरूपाचा असा एक दवाखाना आहे. त्यांच्या पत्नी दीपाताई पवार या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या बामसेफचं काम करतात. आता कोल्हापूर विद्यापीठात तासिका तत्वावर काही कामही करत आहेत.

त्या सांगत होत्या, 'तुम्ही येणार म्हणून डॉक्टर आज खूपच आतूर झालेले होते. आतापर्यंत कुणाच्या भेटीसाठी त्यांना इतकं आतुर झालेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. मलाच नवल वाटलं. ' खरंतर प्रत्यक्ष डॉक्टरांची आणि माझी ओळख नव्हतीच. एकदा इस्लामपूरला गेलो तेव्हा तिथल्या नागनालंदा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं संत रविदास यांच्यावरचं त्यांचं पुस्तक मी पाहिलं आणि लगेच विकत घेऊन टाकलं. ते पुस्तक मला इतकं आवडलं की मराठीतच काय हिंदीत देखील रविदासांवर एवढं सखोल संशोधन कुणी केलेलं नसेल. त्यामुळे पुस्तक वाचून झाल्यावर मी भारावून त्या पुस्तकावर फेसबुक नोंद लिहिली. तेव्हा आमची पहिल्यांदा फोनवर भेट झाली. त्यानंतर एक दोनदा आम्ही फोनवरच बोललो. नंतर डॉक्टरांनी त्यांच्या डॉक्टरकीच्या अनुभवाचं लेखन असलेली आणखी दोन पुस्तकं मला पाठवून दिली. पण अजुनही आमची प्रत्येक्ष भेट नव्हती. त्यांच्या लेखनामुळे भारावून गेलेलो असल्यामुळे मलाही त्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच. त्यामुळे या भेटीसाठी मी जितका आतूर होतो, तितकेच तेही होते, असं दीपाताई मला सांगत होत्या. तेव्हा मला तुकारामाचा अभंग आठवून गेला, 'भेटीलागी जीवा, लागलीसे आस' आणि खरंच आमची ही गळा भेट वाङ्मयव्यवहारापासून दूर असलेल्या दोघा आत्मीय माणसांची गळाभेट होती.

Indrjeet Bhalerao : संत रविदासांच्या भाष्यकाराची भेट
Indrjeet Bhalerao : फळबागा : इज्रायलचा प्रयोग भारतात

वाङ्मयव्यवहारापासून दूर राहून आपलं अस्सल लेखन करणारे मराठीत जे अगदी थोडे लेखक आहेत त्यात रवींद्र श्रावस्ती हे अग्रभागी आहेत. सुरुवातीच्या काळात ते वाङ्मयव्यवहारात वावरले होते. पण आलेल्या कटू अनुभवामुळे ते एकदम अलिप्त झाले. आणि त्यामुळेच त्यांच्या अभ्यास आणि निर्मितीत सखोलता आली. म्हणूनच आज ते खूप महत्त्वाचं लेखन करत आहेत. वाङ्मयव्यवहारापासून बाहेर राहिल्यामुळे त्यांच्या लेखनात एक नितळपणा आलेला आहे. त्या नितळपणानंच मला त्यांच्या लेखनाकडं आणि मग ते लेखन करणाऱ्या व्यक्तिमत्वाकडं आकर्षून घेतलेलं होतं.

संत रविदास यांच्यावरील पुस्तकानंतर डॉ. श्रावस्ती यांचं नवीन काय सुरू आहे ? याची मला उत्सुकता होती, म्हणून मी त्यांना तसं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचं कबीरावर संशोधन सुरू आहे आणि पुढचं पुस्तक त्यांना कबीरावर लिहायचं आहे. संत रविदास यांच्यावरच्या त्यांच्या पुस्तकाचा दर्जा पाहता नक्कीच कबीरावरचं डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचं पुस्तक मराठीसाठी अनमोल राहणार आहे. त्याची मला खूपच उत्सुकता आहे. कबीर हा माझ्याही उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय असल्यामुळे मी वाचलेल्या कबीरविषयक ग्रंथाविषयी आमची बरीच चर्चा झाली. हजारीप्रसाद द्विवेदी यांच्यापासून ते पुरुषोत्तम अग्रवाल, धर्मवीर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या कबीराच्या अभ्यासाची आम्ही एकमेकांच्या वाचनातून उजळणी केली.

डॉक्टर श्रावस्ती यांचं नाव पाहून मला सुरुवातीला असं वाटलं होतं की हे कुणी परप्रांतीय गृहस्थ आहेत की काय ? पण नंतर समजलं की त्यांनी हे बौद्ध संस्कृतीची अस्मिता असलेलं नाव जाणून बुजून स्विकारलं आणि कागदोपत्री तशी नोंदही करून घेतली. त्यांचं मूळ आडनाव पवार आहे असंही मला नंतर समजलं. पुढं ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाचं डॉक्टरांनी केलेलं भाषण ऐकतानाही बौद्ध संस्कृतीचा त्यांच्यावरचा प्रभाव जाणवत होता. त्यामुळे पुष्कळ नवी माहिती मला त्यांच्या भाषणातून मिळाली. वाचनसंस्कृतीचा सगळा आंबेडकरी पटच त्यांनी आपल्या भाषणातून उलगडून दाखवला.

डॉक्टरांच्या आई त्यांच्या काळात त्यांना अभ्यासाला असलेल्या कविता अजून म्हणतात हे पाहून मला खूप आनंद झाला. त्यांच्या काळातल्या त्यांच्या अभ्यासक्रमातल्या कविता या वयात म्हणून दाखवताना त्यांना श्वास पुरत नव्हता. पण म्हणून दाखवण्याचा उत्साह मात्र अमाप होता. आज त्यांची तब्येतही बरी नव्हती, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या आईशी थोड्या गप्पा मारल्या. त्यांचं आयुष्य समजून घेतलं. थोड्याफार कवितेच्या आठवणीही काढल्या आणि डॉक्टरांकडं कॉफी घेऊन आम्ही प्रसाद ग्रंथवितरणच्या ग्रंथमहोत्सवाकडं गेलो.

तिथं सगळेजण आमची वाटच पाहत होते. कोल्हापुरहून रवींद्र जोशी आणि राम देशपांडेही मुद्दाम आलेले होते. तिथं फीत कापून ग्रंथमहोत्सवाचं औपचारीक उद्घाटन झालं. आम्ही सगळ्या ग्रंथमहोत्सवात फिरून काही ग्रंथ खरेदी केली. नंतर अनौपचारिक स्वरूपाचा छोटा कार्यक्रमही झाला. पण या निमित्तानं डॉ. रवींद्र श्रावस्ती यांची भेट झाली हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. रवींद्र जोशी आणि त्रिलोकनाथ जोशी हे मूळचे औदुंबरचे. हे सगळे नऊ भाऊ आहेत. आणि सर्वच्या सर्व ग्रंथवितरणात आहेत. त्यांच्याविषयी एक स्वतंत्र नोंद मी आधी समाज माध्यमावर लिहीलेलीच होती. मी ग्रंथवेडा असल्यामुळे ग्रंथासाठी आणि ग्रंथाभोवती जी जी माणसं घुटमळतात ती सगळी मला माझीच आप्त वाटतात. त्यातलेच हे जोशीबंधू. त्यांच्याविषयी मी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com