Nashik Wedding News : सुकेणे (ता. निफाड) येथील शेतकरी श्यामराव मोगल यांनी मित्राच्या मुलीच्या लग्नात देशी गाय, विषमुक्त अन्न-धान्यांसह ११ प्रकारचा भाजीपाला, ५ किलो गूळ, देशी गाईचे तूप, पिवळी व लाल जास्वंद, चाफा, प्राजक्त अशी फुलझाडे, तुळस यांसह ३१ प्रकारची विविध देशी झाडे, दगडी जाते, रांजण भेट दिला आहे.
तर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून मातीची चूलही दिली आहे. असा अनोखा आहेर देऊन त्यांनी कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले आहे.
विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा संस्कार आहे. मात्र अलीकडच्या काळात हा संस्कार न राहता मानपान आणि प्रतिष्ठेसाठी एक इव्हेंट झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळते. असे असताना हा अनोखा आहेर दिल्याने मोगल यांचे कौतुक होत आहे.
मोगल यांचे मित्र श्याम काठे यांची कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा लग्नसोहळा नुकताच नाशिक येथे झाला. एकीकडे महागड्या गाड्या, मोटरसायकली तर घरातल्या वस्तू या भेट स्वरूपात देण्याची पद्धत पडत आहे. त्यास मोगल यांनी फाटा दिला.
मांडवात हा आहेर ठेवण्यासाठी त्यांनी ज्वारी व बाजरीच्या कडब्याचा वापर करून आकर्षक दालन बनविले होते. हा आहेर पाहण्यासाठी लग्नानिमित्त उपस्थित असलेले सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार अनिल कदम, माणिकराव बोरस्ते, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. सुनील मोरे यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.
मोगल हे सध्या १९ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. यापूर्वी मोगल यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नातही अशाच प्रकारे शेतीसंबंधी साधने भेट दिली होती.
महापुरुषांचे चरित्र ग्रंथही...
सेंद्रिय कृषी उत्पादनासोबत ग्रंथही मोगल यांनी आहेर म्हणून भेट दिले. श्रीमद् भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, भागवत चरित्र देण्यात आले. तसेच नवीन पिढीच्या प्रेरणा व चारित्र्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक आदींचे चरित्र ग्रंथ भेट देण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.