Indian Singers : गायकांचा अभ्यास

A study of singers : प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. शिवाय नृत्य, चित्रकला, शिल्पकला व वास्तुकला या कलांविषयी सखोल चिंतन होतं.
Indian Singers
Indian SingersAgrowon
Published on
Updated on

अतुल देऊळगावकर
Atul Deulgaonkar Article : प्रज्ञावंत गायक पं. कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. शिवाय नृत्य, चित्रकला, शिल्पकला व वास्तुकला या कलांविषयी सखोल चिंतन होतं. विचारांचा विशाल कॅनव्हास असलेल्या कुमारजींना इतिहासाची जाण व वर्तमानाचे चोख भान होते. ते भविष्याचा वेधही घेऊ शकत होते. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असत. हे जाणणाऱ्या ‘ग्रंथाली’ने १९८५ मध्ये त्यांची सलग सहा दिवस मुलाखतमैफल आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. असा अभिजात ऐवज आता पुस्तक रूपात उपलब्ध होत आहे. त्या वेळचे कुमारजींचे गायन अनुभवता यावे यासाठी ५४ क्यूआर कोड पुस्तकात दिले आहेत. अतुल देऊळगावकर यांनी संपादन केलेल्या ‘गंधर्वांचे देणे- पं. कुमारजींशी संवाद’ या पुस्तकास प्रतिभावंत तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकामधील काही अंश...

‘ग्रंथाली’ने १९८५ मध्ये पं. कुमार गंधर्व यांची सलग सहा दिवस मुलाखतमैफल आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. त्यातील काही अंश पुढे दिले आहेत.

अब्दुल करीम खाँसाहेबांचं गाणं. त्यांच्यामुळे किराणा घराण्याचं नाव आपण घेतो. पण त्यांच्या घराण्याचे गायक पुष्कळ आहेत अजून. मी आता जे बोलतोय ते खाँसाहेबाद्दलच बोलतोय. मी इतर गायकांनाही ऐकलं आहे. तसं वाहिद खाँही होते. किराणा घराणं आजपर्यंत चालू आहे. हे सर्व अब्दुल करीम खाँसाहेबांमुळे चालू आहे. तर त्यांच्याबद्दलच फक्त मी बोलतो. त्यांची सूर लावण्याची पद्धत फार कठीण आणि वेगळी होती. गायक लोक त्यांच्याबद्दलच खूप काही बोलत आलेले आहेत. न विचार करता पुष्कळ बोलत आले आहेत. पूर्वी काय वाट्टेल ते बोलायचे. पण असं का बोलायचं? मला कळत नसे. कारण माझ्या ऐकण्यात पुष्कळ आलं. रामभाऊ-सवाई गंधर्वांचं ऐकलं आहे. लहानपणी मी नक्कल करत असे खाँसाहेबांची. नंतरही मधूनमधून असं कानावर पडलं होतं. म्हणून मी खाँसाहेबांचा पुन्हा अभ्यास केला होता. मधूनमधून रेडिओवर खाँसाहेबांच्या रेकॉर्ड वाजतात. तर त्या वाजत असताना पुन्हा पुन्हा मी त्यावर विचार केला आणि कोणी मित्र आले असताना त्यांना ऐकवलं. त्यांना सांगण्यासाठी म्हणून काय काय बोललो त्यांच्याबद्दल. माझ्याकडे वाटेल त्या विचाराचे लोक येत असतात. ‘कुमारजी, अब्दुल करीम खाँसाहब के बारे में हमको समझाइये.’ आता घ्या! समजावून दिलंच पाहिजे. मग करायचं काय? मी समजावून देतो. मग त्याला रेकॉर्ड ऐकव. अमुकअमुक गाणं का चांगलं, त्याला लोक चांगलं का म्हणत असत, रेकॉर्ड ऐकवून त्यांत ते काय चांगलं म्हणत असत, ते सांगायचं.

Indian Singers
Sugarcane Growth : उसाची वाढ आणि दरप्रश्‍नाचा अभ्यास

फय्याज खाँसाहेब. किती मोठा गायक! कसे कसे आवाज काढायचे ते! आता काय समजावून सांगायचं त्यात? आली का पंचाईत? सध्याच्या लोकांच्या गाण्याबद्दल कल्पना फार वेगळ्या आहेत. दर्जा कळत नाही, ही गोष्ट वेगळी आहे (हशा). फय्याज खाँचं लोक का ऐकायचे इतकं? त्यांना माहीत नसतं. कारण त्यांच्या आवाजाचं माध्यम वेगळं होतं. ते ऐकायला जायचे. आताही ऐकतात. रेकॉर्ड वगैरे. ‘ऐसे कैसे? इतना बडा गवैया.’ म्हणजे सांगणं मुश्किल होतं. तर असं. म्हणजे मान्यता मिळाल्यानंतर सर्व गोष्टी सुंदर होतात, हे त्यांना कळत नाही. मग आपण त्यांना दुय्यम धरतो. खास करून भारतीय संगीतामध्ये आवाजाला फार महत्त्व आहे असं कधी गृहीत धरलेलं नाही, ही फार मजेशीर गोष्ट आहे. वाईट वाईट आवाजाचे लोक फार मोठे गवई होऊन गेले आहेत (हशा). हा अगदी विरोधाभास वाटेल, पण हे सत्य आहे. कारण ते रागाच्या माध्यमातून काय सांगायचे, काय मांडायचे, याला फार महत्त्व आहे आपल्याकडे. ‘गायला गळा पाहिजे. आवाज गोड पाहिजे’, हे सारे आताचे विचार आहेत. हे फार मजेदार आहे. तर अब्दुल करीम खाँसाहेबांचे विचार डोक्यामध्ये आले तेव्हा, अरे फार कठीण आहे हे. लोक म्हणतात, तितकं सोपं नाही ते. लोकांना कळलंय का खाँसाहेबांचं गाणं? त्यांच्याकडे शिकून गेले तरीसुद्धा? परीक्षण केलं का त्याचं? त्यावर विचार केला का? कारण लोक म्हणतात, ‘त्यांचे उच्चार फार वेगळे, काही कळत नाहीत. आणि तानांचं? त्यांचं असं होत होतं.’ बरं, त्यांनी ताना वगैरे गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. अब्दुल करीम खाँसाहेबांमुळेच गाणं फार गोड लागतं, हे कळलं लोकांना. इतकं मोठं परिवर्तन केलं त्यांनी. गाणं फार गोड आहे. राग फार गोड आहे.

Indian Singers
Sugarcane Growth : उसाची वाढ आणि दरप्रश्‍नाचा अभ्यास

आणखी त्यावर विचार केला तर, हं. त्यामुळे काय झालं त्यांचं, की ज्या प्रकारे त्यांनी रियाज केला आणि काय साधलं, ते महत्त्वाचं. ते अक्षराचे आणि अर्थाचे शत्रू नव्हते. पण त्यांनी काय केलं? त्यांचे उच्चार स्वरांमध्ये मिळून जायचे. धूसर करायचे ते. सगळं मिसळून जाऊ दे, उच्चारणसुद्धा वेगळं करायचं नाही. तुम्हाला अगदी स्वच्छ ऐकू गेलं पाहिजे, अशी लोकांची इच्छा. तसं उच्चार करणारी इतर गायक घराणी होती म्हणून. स्वच्छ अगदी. त्याच्यात त्यांनी काय केलं, की अक्षरांवर जास्त प्रेम केलं, म्हणून लोकांनी हे त्यांना दिलेलं बक्षीस. आणि उच्चार करताना आघात एकदमच काढून टाकला. रियाजसुद्धा षड्जापासून रिषभ लावायचा. तो किती हळू चालायचा. त्याला काही नियम आहे? कारण तो लागलाच पाहिजे ना? नाही लागला तर पुन्हा जायचं. असं करत बसायचं. मनासारखा लागेपर्यंत. गंधाराचा विचारच करायचा नाही. रियाज फक्त रिषभपुरताच. तसाच गेला पाहिजे. तो तसाच लागला पाहिजे. उच्चार तितकाच शांत. तुम्हाला कळो की न कळो. स्वच्छ उच्चार करणं, लोकांनी लिहून घ्यावं इतका स्वच्छ उच्चार करणं सोपं आहे. स्वरमय उच्चार करणं फार कठीण आहे. हे करत असताना आयुष्य संपलं होतं, मग करायचं काय? आणखी आयुष्य मिळालं असतं, तर आणखी वेगळं काही ऐकवलं असतं.

शेवटी कळतं म्हणजे काय? आपल्याला काही नाही आलं, हे कळतंच शेवटी. आणि कळून उपयोग काय शेवटी? करत करत नंतर आपल्याला कळतं, की आतापर्यंत आपण छान आलोय हे ठीक आहे, पण आता पुष्कळ कळून उपयोग काय? वेळ कुठं आहे अभ्यास करायला? तर हे सर्व त्यांचं ऐकताना, त्या स्वरमयी संगीताला मी थोडंसं गाऊन व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन. कारण कठीण आहे ते, फार कठीण आहे. सर्व संगीतच स्वरमय करायचं आणि पुन्हा काही राहू द्यायचं नाही. संगीताच्या प्रत्येक भागावर त्यांचं प्रेम होतं. ठुमरीसुद्धा छान म्हणायचे. रागाचा खूप मोठा कॅनव्हास होता त्यांचा. त्यांना काय येत नव्हतं? कुठला राग येत नव्हता, असं नव्हतं. सरगम चांगली लागते, हे गाण्यामध्ये पहिल्यांदा अब्दुल करीम खाँसाहेबांनीच सांगितलं. आणि लोकांनाही ते आवडलं. त्यांच्या सर्व गोड संगीतामुळे त्यांचा प्रचार वाढला. लोक वेड्यासारखे त्यांच्याकडे ऐकत बसत. फार मोठे गायक म्हणवले जाणारे फडतूस गायकलोक, ज्यांना चारपाच राग यायचे व जिल्ह्यात नाव झालं, की त्यांना आपण मोठं झालो असं वाटतं, ते खाँसाहेबांना नावं ठेवायचे. पण खरे मोठे लोक असं बोलत नाहीत. अर्धवट असतात तेच बोलतात. ते ठुमरी छानच म्हणायचे. कारण रागसंगीताला जमणं शक्य नाही. सोपं आहे का? अ‍ॅक्रोबिटिकल गोष्टी करणं सोपं आहे संगीतामध्ये. स्वराला चिकटणं, सप्तकामध्ये तुमचे दोन स्वर खर्‍या अर्थानं लागले, तरी खूप झालं. खऱ्या अर्थानं, सात स्वर लागणं फार कठीण आहे. आपण जातो तिथं, पण लागत नाहीत फक्त! (हशा).
सब सूर साधे जब भयो पार
मिल नर नारी तब सब करे गान...

चला ठीक आहे. सात सुरांमधले एखाददोन सूरसुद्धा लागले तरी त्याचं नाव वाटेल तिथं जाऊ शकेल. सातही सूर लागणं कठीण आहे; परंतु माणसाचा प्रयत्न असावा. तिथंच गायकाला वाव मिळतो, लक्षात ठेवा. त्याचा जो सूर लागतो, बाकी तो हिंडून येत असतो. सूर लागत नसतात. कोणाचं काय? वझेबुवांचं उदाहरण सांगतो, ते कोमल गंधार ज्या रागात गायचे त्याची ऐसी की तैसी करून ठेवायचे. गंधारचे राग आले, मल्हार वगैरे आले, की मग त्यांचं काय होईल सांगता येत नाही. कारण त्यांचं कोमलगंधारवर इतकं प्रभुत्व होतं, की तो सरेंडर होऊन जायचा. रिषभही लागावा, गंधार लागावा, मध्यम लागावा. मध्यम लागल्यानंतर आपण आकाशात तरंगतोय असं वाटायला पाहिजे. मध्यमची जागा अशी आहे. संवाद होणारा जो मध्यम आहे, तशी प्रत्येकाची एक जागा आहे. कारण ग्रंथांमध्ये या सर्व स्वरांचा छान छान उल्लेख केला आहे. तर आपण काहीही स्वर न साधताही नाव होऊ शकतं. स्वर साधल्यानंतर काय होईल मग! त्याच्यामध्ये सातही सूर लागणं फारच कठीण कर्म.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com