khandoba : सुंबरान ; बिरोबा धनगर

पावसाळा उघडला की माणदेशाकडून येणारे मेंढरांचे कळप सगळ्या रस्त्याने म्याsss म्याsss करीत ओरडत पळताना दिसायचे. त्यांच्या मागे काही अंतरावर कसोट्या घातलेल्या धनगरीन बायका घोड्यांना बांधलेली दोरी धरून मागे चालायच्या. घोड्यावर कपड्याची गठुळी, भांडी-कुंडी, कोंबड्या, आणि त्यात बांधलेले एखादे तान्हे पोरगं हमखास लोंबकळताना दिसायचं.
Rural
Rural Agrowon

लेखक - ज्ञानदेव पोळ 

पावसाळा उघडला की माणदेशाकडून येणारे मेंढरांचे कळप सगळ्या रस्त्याने म्याsss म्याsss करीत ओरडत पळताना दिसायचे. त्यांच्या मागे काही अंतरावर कसोट्या घातलेल्या धनगरीन बायका घोड्यांना बांधलेली दोरी धरून मागे चालायच्या. घोड्यावर कपड्याची गठुळी, भांडी-कुंडी, कोंबड्या, आणि त्यात बांधलेले एखादे तान्हे पोरगं हमखास लोंबकळताना दिसायचं. बायकांच्या डोक्यावर मोठं मोठ्या सामानाने भरलेल्या पाट्या असायच्या. सोबत बारकी चिली पिली आणि पायात घुटमळ करणारी कुत्री. असा सारा लवाजमा रस्त्याने निघाला की धनगर घाटाकडे निघाले असं माणसं म्हणायची.  त्या मेंढरांच्या कळपातले काही कळप सह्याद्रीचा घाट पार करून खाली उतराचे. तर काही कळप घाटावरच थांबायचे.  या सर्वांचे  मार्ग आणि थांबण्याची गावे ठरलेली असत. त्यातील तीन चार कळप गावात उतरायचे. यात एक मुख्य कळप असायचा तो बिरोबा धनगराचा. बिरोबा धनगर माणदेशी धनगर. अंगात फाटका सदरा, धोतर, डोक्यावर लाल रंगाचं सैदव गुंडाळलेलं मळकट कापड. गळ्यात पितळेसारखी दिसणारी एक कसलीशी डबी काळ्या धाग्यात लोंबकनारी. आणि उजव्या हातात फरशी कु-हाड आणि डावा हात वळवून मानेवर धरलेली एक बांबूची लांबलचक काठी. अशा पोशाखात न चुकता दरवर्षी बिरोबा धनगराचं गावात आगमन व्हायचं. गावाच्या बाजूने मोठा नदीकाठ आणि गावाच्या शिवेला चारी बाजूनी मोठे माळरान, याशिवाय डोंगरकाठाने आणि ओढ्याकडेने कायम येथे मुबलक चारा मिळायचा.

त्यामुळे एखाद्या गरजवंत शेतक-याच्या नांगरट केलेल्या शेतात हि मेंढरे बसविली जात. आठवड्याभर त्याच शेतात जागा बदलून बदलून मेंढरे बसविली जात. आठवड्यात ते शेत लेंड्या मुताच्या खताने असे खतून जाई कि वर्षभर त्या वावरात हिरवेगार पिक फुलून येई. एखाद्याची बाभळ सवळायला आली की तो मालक बिरोबा धनगरालाच बोलवणार. बिरोबा बाभळी वरचे काटे चुकवत सरासरा वर चढायचा. वाकडे तिकडे झालेले हिरवेगार डहाळे तोडून खाली टाकायचा. खाली शेळ्या-मेंढ्या जमलेल्या असायच्या. फांदी खाली पडली रे पडली की शेळ्या मेंढ्या भुकेने त्या फांदीला लगडायच्या.

इतर धनगर आणि बायका त्या सगळ्या शेळ्या मेंढ्यांनच्या वाट्याला याव्यात यासाठी सा-या बांधावर पसरून टाकत. डहाळीच्या बाभळीच्या शेंगा खाण्यासाठी मेंढरांची झुंबड उडायची. कोवळ्या लूस शेंगाचा बघता बघता सुपडा साफ व्हायचा. मेंढरानी खाऊन पडलेल्या रिकाम्या काटेरी फांद्या बिरोबा धनगर त्याच्या इतर सोबत्या सोबत गोळा करायचा. बाभळीच्या खालीच बांधाला लागून काटेरी फांद्याचा ‘फेस’ (फेसाटी) रचायचा. त्याला बाभळीचा ‘हेल’ असेही म्हंटले जाई .त्याने रचलेला ‘हेल’ कितीही वादळ वारा सुटला उडणार नाही की विस्कटणार नाही. त्याने रचलेला ‘हेल’ वाळून गेला कि पावसाळ्यात जळणासाठी दोन गडी माणसं खालून जाड लाकूड घालून अगदी सहजपणे बैलगाडीत चढवायची. घराजवळ रस्त्याच्या कडेला बैलगाडी उलटी केली तरी ‘हेल’ विस्कटायचा नाही. इतका अप्रतिम हेल रचायचा बिरोबा धनगर. तो फांद्या छाटतानाच अशा छाटायचा की एखादी घर धनीन जेव्हा रस्त्याकडेला जळणासाठी काटक्या कुटक्या तोडायला बसायची  तेव्हा तिला वाळक्या फांदीचा काटा टोचणार नाही की फांदीची वाळकी कोच सुद्धा टोचणार नाही.

सायंकाळ झाली कि शेळ्या मेंड्या ठरलेल्या मुक्कामी शेताकडे म्याsss म्याsss करीत माघारी परतत. वावराच्या बाजूने त्यांच्या सुरक्षेसाठी वाघर बांधली जाई. आभाळाच्या छताखाली आणि कंदिलाच्या उजेडात धनगरीन बायका वावरात तीन दगडांच्या चुली पेटवायच्या. लहान मुलं चुलीच्या जाळाभोवती जमा व्हायची. वाळक्या काटक्या कुटक्या घालून पेटवलेल्या लाल बंद चुलीवर बिरोबाची बायको-हिरा धनगरीन इतर बायकासोबत भाकरी भाजताना दिसायची. एखादी धनगरीन कालवणाला दगडाची ठीकरी द्यायची. तर  एकादी धनगरीन आमटीला खमंग फोडणी अशी द्यायची की सगळ्या माळरानावर वास पसरत जायचा. रस्त्याने जाणारा येणारा वाटसरू म्हणायचा, कशाला फोडणी दिली बि-या धनगराच्या बायकोनं. लका वास बघ कसा सुटलाय. पाणी सुटलं गड्या तोंडाला. एखाद्या दिवशी बक-याचा खास बेत असेल तर गावातील ठराविक जणांना त्याचं खास आमंत्रण मिळे. रात्र चढेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम चाले. सगळ्यांचे जेवण खाण आटोपले की खास धनगरी ओव्यांचा बेत चाले. सगळे एकत्र गोलगोल फिरत ओव्या गात. बिरोबा गळ्यात ढोल अडकावायचा. सुरवातीला दोन्ही बाजूनी एका सुरात बडवायचा. डूपांगs डुंबss इडीबांगs डूपांगs डुंबss आवाज निघू लागला कि बाकीचे गोल गोल गिरक्या घेत उड्या घेत राहयचे. नंतर नंतर मोठ्याने ढोल बडवत बिरोबा सगळं गाव जागं ठेवत सुंबरान मांडत जायचा.

या धनगरांच्या कळपाला रात्रीची मुख्य भीती असायची ती लांडग्यांची. सा-या शिवारभर लांडग्यांची बक-यांच्या वासामुळे प्रचंड दहशत असे. वाघरीत उड्या मारून गळा पकडून कधी मेंढी गायब व्हायची याचा पत्ता सुद्धा लागू देत नसत लांडगे. यासाठी धनगरांना रोज जागे राहण्याची पाळी असे. अशीच एखदा बिरोबाकडे पाळी आलेली. अमावस्येची रात्र.  काळाकुट्ट अंधार पडलेला. मध्यरात्री वाघरत अचानक हालचाल सुरु झाली. कुत्री जागी झाली. आणि ओढ्याच्या दिशेने भुंकत सुटली. पण बिरोबा जागचा आजिबात हलला नाही. कुत्र्यांना लांब घेऊन जाणारे लांडगे वेगळे होते. आणि मेंड्यावर हल्ला करण्यासाठी थांबलेले लांडगे वेगळे होते हे त्याच्या चाणाक्ष नजरेने ओळखलेले होते. अचानक वाघरत शिरून एक मेंढी लांडग्यांने बाहेर काढली. लांडग्यांच्या जाण्याच्या नेमक्या मार्गात दबा धरून बसलेल्या बिरोबाने क्षणाचाही विलंब न करता एका कुर्‍हाडीच्या घावात लांडग्यांची मान खाली पाडली. अंधारात रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. लांडग्याच्या तावडीत तडफडणारी मेंढी पकड ढिली झाल्यामुळे सैरावैरा पळू लागली. त्याच्या आवाजाने झोपलेली सगळी धनगरं जागी झाली. तर बिरोबा धनगर अजून कुर्‍हाडीचं घाव घालत ओरडत होता, लका पोटच्या पोरागत शेळ्या मेंड्या जपतोय. तुमाला लय न्याट पडतय व्हय रं फुकटचं खायाला. पुन हिकडं फिरकाल तर याद राखा. दुस-या दिवशी सा-या गावभर हीच चर्चा. बि-या धनगराने लांडगा छाटला.

Rural
Rural Social Structure : नासवलेल्या संसारात कोलमडलेली माणसं

 उन्हाळी पाऊस ढासळू लागला कि कळपातल्या शेळ्या मेंढ्याचं प्रचंड हाल सुरु व्हायचं. अशा वेळी मुरमाड माळावर त्यांचा मुक्काम पडायचा. खालून जमिनीला पाण्याने पाझर सुटलेला असायचा. मेंढरं बसायचीच नाहीत खाली. लेकरं टेकायचीच नाही बुड जमिनीला. पालाच्या चिखलातच पेटल्या जायच्या चुली. कडाडणा-या विजांच्या उजेडात भाजल्या जायच्या भाकऱ्या. पावसात साठवलेल्या पाण्यावरच दिल्या जायच्या आमट्याना फोडण्या. पण पडलेल्या पावसानं नवा हिरवा चारा फुटेल आणि आपलीच मेंढरं मातीला झोंबतील हा नवा आनंद सुद्धा असायचाच प्रत्येकाच्या मनात.

बिरोबाला आपल्या कळपातील शेळ्या मेंढ्याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी लागत असे. जर डोळा चुकवून कुणाच्या शेतात मेंढ्या गेल्या आणि पिकांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई धनगरांना द्यावी लागत असे. कधी कधी एखाद्याचा मार खावा लागायचा. तर कधी एखादा शेतकरी त्याच्या हातातली कू-हाड अथवा लांब काठी हिसकावून घेत असे. एखाद्या प्रसंगी या मेंढरांना कोंडवाड्याचीही पायरी चढावी लागायची. पण पंच कमिटी बसायची यात अंतिम निर्णय यायचा. यात नुकसान झालेल्या शेतक-याच्या रिकाम्या वावरात दोन चार दिवस फुकट मेंढरं बसवावी लागत.  

एका वर्षी दरवर्षी प्रमाणे बिरोबाची मेंढरं गावाच्या शिवारात उतरलेली. उन्हाळ्याचे दिवस होते. सगळीकडे उन्हाने नुसती अंगाची काहिली होत होती. अशा भर उन्हात बिरोबाची बायको हिरा धनगरीन ओढ्याच्या काठाने जळणासाठी काटक्या कुटक्या गोळा करीत होती. याच भर उन्हात तिला उन्हाचा झटका आला आणि ती कोसळली. इतर बायकांनी तिला पाहिल्यावर ओढ्यात एकच कल्लोळ माजला. शिवारातली कामं करणारी माणसं आवाजाच्या दिशेने पळत सुटली. बघता बघता हिरा धनगरीन मेल्याची सा-या गावभर बातमी पसरली. माणसांनी तिला ओढ्यातून वर आणून एका लिंबाच्या झाडाखाली ठेवलेली. तास दोन तास संपले. रडारड थांबली. तिथच ओढ्याच्या काठावर तिला अग्नी दिला गेला. काही वेळाने सगळी माणसे पांगली. बराच वेळ गेला. अजून ओढ्यात हिरा धनगरीन जळत होती. सगळ्या ओढ्यातून धूर पसरला होता. ओढ्याच्या वर असलेल्या किश्यानानाच्या विहिरीच्या धावेवर बाभळीच्या झाडाखाली जीभातली लाळ गाळणा-या कुत्र्यासोबत, त्याच्या दोन रडक्या पोरास्नी मांडीवर घेऊन भविष्याच्या काळजीत बिरोबा धनगर वाळक्या भाकरी चावत बसलेला.  

वर्षामागून वर्षे लोटली. बिरोबा धनगराची पोरेबाळे मोठी होऊ लागलेली. दरवर्षी न चुकता धनगरांचे कळप गावोगावी येत होते. पण हळूहळू ते उन्हाळ्यापुरतेच मर्यादित दिसू लागले. मेंढरं चरायला जागाच शिल्लक राहिली नाही. सगळ्या अवती भोवती पाण्याचे पाट वाहू लागलेले. माणसांनी शेताला बांध ठेवला नाही की गुरांढोराना चरायला माळरान सुद्धा मोकळे ठेवले नाही. बघावे तिकडे नुसत्या ऊसाचंच पीक उगवून वर वर येऊ लागलेलं. ज्वारी, बाजरी, तूर, जुंधळ करायला कोणी तयारच नाही. तिथं मेंढरं चरणार तरी कशी आणि धनगर उतरणार तरी कुठे? ऊस निघाला की पुन्हा त्याच शेतात ऊसाचं पीक. की लगेच वावरात कारखान्याची मळी. वावराला विश्रांती अशी नाहीच. मग मेंढरं बसवण्याची वाट बघणार तरी कोण? जागाच उरली नसल्याने बिरोबा धनगराचा मेंढरांचा कळप चार आठ दिवस नुसता गावाभोवती वळसा मारून पुढच्या गावाला निघून जाऊ लागला. 

Rural
Vikas Godage Story : म्हातारीच्या जगण्याची गोष्ट

पुढं शिक्षणासाठी आमचं घरदार सुटलं. गावाचा हात कायमचा सोडला आणि शहराचा हात हातात घेतला. आपल्याच माणसाची आठवण यायला वेळ नाही तिथं बिरोबा सारख्याची येणार तरी कोठून. बिरोबा धनगरासारखी लहानपणी पाहिलेली कितीतरी माणसं मेंदूच्या एखाद्या पेशीत अदृश्य होऊन गेली. एखदा म्हसवडला सिद्धनाथाच्या यात्रेला गेलेलो.  दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेतला. तर पायरीवर एक व्यक्ती एकटीच बसलेली दिसली. कुठेतरी चेहरा पाहिल्यासारखा वाटला. पण काही आठवेना. तसाच पाय-या उतरू लागलो. तर पटकन डोळ्यासमोर बिरोबा धनगर दिसला. पटकन पुन्हा माघारी वळालो. खात्री केली तर बिरोबा धनगरच.  तसं त्याने मला ओळखण्याचं काहीच कारण नव्हतं.  मी माझी ओळख दाखविली. तसा बिरोबा हरखून गेला.  आपल्याला या वयात कोणीतरी ओळख दाखविली ही गोष्टच त्याच्यासाठी खूप मोठी असावी. वयानुसार तो आता पार थकून गेलेला. घरची विचारपूस केली तर त्याचा लग्न झालेला पोरगा बायका पोरांना घेऊन जगण्यासाठी बाहेर पडलेला.

दोन्ही मुलीं लग्न होऊन नांदायला गेलेल्या. तुम्ही कुठे राहता विचारल्यावर म्हणाला, आता एका पुतन्याकडे तुकडे खातोय. शेळ्या मेंड्याचा कळप आहे का म्हणून विचारल्यावर तो कुठेतरी हरवून गेला. म्हणाला, सगळं गेलं आता काळासोबत उडून. जगायचं कसंतरी आता. किती दिस राहिल्यात आता. मी जाण्यासाठी खालच्या पायरीकडे निघालो.  तर त्याचा उजवा हात मनगटापासून खाली तुटलेला दिसला. नुसती त्या हाताची कुनी थरथर कापताना दिसली. उडालोच. सर्रकन अंगावर काटाच आला. एकेकाळी ज्या हाताने चकाकणारी फरशी कुऱ्हाड गावोवावी रुबाबात मिरवली. तो हात मनगटापासून खाली तुटला तरी कशाने? अमावस्येच्या मध्यरात्री ओढ्याकडेला लांडग्याचं मुंडकं छाटणाऱ्या बिरोबाच्या उजव्या हाताची शिकार नेमकी केली तरी कुणी म्हणायची? रिकाम्या पोटाने?  काळाने?  की व्यवस्थेने? भीतीने त्याला विचारलं तर समजलं, पोटासाठी आटपाडी कडच्या एका रसाच्या गाड्यावर कामाला होता. ऊसाच्या चरक्यात ऊसाच्या कांड्या घालता घालता एकेदिवशी हातच घालून बसला.

मनात विचार आला, एकेकाळी बाभळीच्या फांद्या तोडण्यासाठी सळसळ करणाऱ्या त्याच्या उजव्या हाताला अजून बाभळी तोडाव्या वाटत असतील का? त्या थरथर कापणा-या हाताच्या तुटक्या कुनीला अजून वादळ वाऱ्यात न विस्कटणारी फेसाटी रचावी असं वाटत असेल का? हातात फारशी कु-हाड आणि खांद्यावर बांबूची लांबलचक काठी घेऊन अजून ह्याss ह्याss करत एखाद्या ओढ्याकाठी बाभळीच्या झुडपाचा पाला शेळ्या मेंढ्याना खाऊ घालावा असं अजून त्या हातांना वाटत असेल का? काय ही बिरोबची अखेरची दशा. ही व्यथा फक्त बिरोबा धनगराचीच की अदृश्य असणाऱ्या कित्येक धनगरांची?  येऊ घातलेल्या धनगर आरक्षणाचा फायदा बिरोबा सारख्याना नेमका मिळणार तरी काय आहे? की त्यात 'अंशता दिले' या सारख्या शब्दांच्या जंजाळात बुडवून काढून बिरोबा धनगर नुसताच शासनाच्या कागदोपत्री योजनेत चिकटवला जाईल. अनेक प्रश्न डोक्यात. अनेक चित्रे डोळ्यात. पण उत्तरांची वानवा. मागे वळून बघण्याचं धाडसच होईना. भराभरा चालू लागलो. तर मागून बिरोबा धनगर हाका मारतोय असा कानांना भास.....

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com