Education System : मी डोंगल फोडले, कारण...

सोनी त्या दिवशी शाळेत लवकर आली होती. इतर मुले वर्ग आणि शालेय परिसराची स्वच्छता करत असताना तिसरीत शिकणाऱ्या सोनीने सर्वांचा डोळा चुकवून टेबलाच्या ड्रावरमधून गुपचूप डोंगल काढले.
Education
Education Agrowon

लेखक - भाऊसाहेब चासकर

-------------------------------------------------

 “सर, सोनीने डोंगल फोडला..!” शाळेसमोरच्या (School) झाडाखाली मोटारसायकल उभी करतो न करतो तोच मुलांनी ‘ताजी’ बातमी (News) सांगितली. ही बातमी मुलांनी सांगितली तेव्हा मनातून सोनीचा बराच राग आला होता. मात्र तसे दाखवले नाही. परंतु माणसाचा चेहरा खोटे बोलत नाही असे म्हणतात. ‘आता सोनीला शिक्षा होणार’ या ‘खात्रीशीर आनंदात’ बातमीदार मुले आल्या पावली पळत पळत निघून गेली.

डोंगल नसल्याने शाळेतील ‘डिजिटल क्लास’ हा कार्यक्रम बंद ठेवावा लागणार होता. कारण आम्ही शाळेतील सर्व संगणक ‘लोकल एरिआ नेटवर्क’ या संगणक प्रणालीने (LAN) एकमेकांशी जोडले होते. त्याचा सर्व्हर माझ्या तिसरीच्या वर्गात ठेवलेला होता. ‘डिजिटल स्कूल’ हा कार्यक्रम सुरू करायचा असल्यास माझ्या वर्गातल्या संगणकाला पेन ड्राइव्हच्या आकाराचा हा डोंगल जोडावे लागे. त्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुरू होत नसे. काम झाले की, डोंगल काढून टेबलाच्या ड्रावरमध्ये ठेवत असे.

सोनी त्या दिवशी शाळेत लवकर आली होती. इतर मुले वर्ग आणि शालेय परिसराची स्वच्छता करत असताना तिसरीत शिकणाऱ्या सोनीने सर्वांचा डोळा चुकवून टेबलाच्या ड्रावरमधून गुपचूप डोंगल काढले. शाळेच्या इमारतीच्या मागे असलेल्या शेतात गेली. दोन मोठे दगड जमवले. खाली एक पसरट दगड ठेवला. त्यावर डोंगल ठेवले. दोन्ही हातांनी साधारण अडीच तीन किलोग्रॅम वजनाच्या दगडाने डोंगलवर जोरदार प्रहार केला. डोंगलचा पार भुगा झाला!

सोनी तिकडे लांब शेतात एकटीच काय करतेय? अशी बालसुलभ उत्सुकता चाळवली गेल्याने काही मुले-मुली धावत धावत तिच्याकडे गेली. ‘काय करतेस?’ असे त्यांनी सोनीला विचारले. ती काहीच बोलली नाही. पण आपण केलेल्या उपद्व्यापाची भीती वाटून तिला रडू कोसळले. तिच्यासमोर काहीतरी ‘तोडफोड’ दिसत होतीच! अशा गोष्टी मुलांना फार उलगडून सांगाव्या लागत नाहीत, त्यांना लवकर अंदाज येतो. काय समजायचे ते मुले समजली. शाळेत आल्या आल्या मुलांनी ‘खुशीतच’ ती बातमी आम्हा शिक्षकांना सांगितली!

मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सगळे शिक्षक एकत्र आल्यावर मी हा नाजूक विषय काढला. एव्हाना ही गोष्ट सर्वांनाच समजली होती. तेव्हाचे (या गोष्टीला आता सात वर्षे उलटलीत.) मुख्याध्यापक म्हणाले ‘तुमचीच लाडकीये. तुम्हीच बघा आता काय करायचे ते?’ अर्थातच ते जरासे रागावलेले होते. त्यांचे रागावणे साहजिकच होते. कारण ते डोंगल आता पुण्यावरून बोलवावे लागणार होते. त्यासाठी वेळ आणि पैसे खर्च होणार होते. कार्यक्रम बंद राहणार होताच, मुख्य म्हणजे आधीच आर्थिक दारिद्र्यरेषेखाली असलेल्या वाडीतल्या एका सरकारी शाळेला असे खर्च परवडणारेही नसतात.

वर्गात गेलो. बघतो तर सगळी मुले परिपाठासाठी मैदानाकडे गेलेली. सोनी तिच्या बाकावर खाली मान घालून, शून्यमनस्क अवस्थेत बसलेली. मुलांनी बभ्रा करून शिक्षकांची भीती घातल्याने, आपण काहीतरी गंभीर गुन्हा केलाय, या विचाराने तिच्या मनाची पकड घेतल्याने तिचे अवसान पूर्णपणे गळालेले...

Education
Education System : इंग्रजी शाळा शिकून घोटाळा...

‘तुला कोणी हा उद्योग करायला सांगितला होता?’ असे तिचा कान पिरगळून दरडावून विचारावे, असे वाटले. पण ती अवस्था अगदी क्षणभरच टिकून राहिली. रडून रडून केवीलवाणा झालेला सोनीचा चेहरा बघून माझेही काळीज विरघळले. तिच्याजवळ बसलो. पाठीवर हात फिरवत तिला धीर दिला. ‘तुला कोणी काही शिक्षा करणार नाही. तू ते डोंगल का फोडले ते खरे सांग.’ एरवी प्रश्न विचारून भंडावून सोडणारी, सतत वटवट करणारी, तक्रारखोर सोनी आज काही केल्या बोलेचना. मुख्याध्यापकांची तिला भारी भीती वाटत होती. विश्वासात घेऊन संवादाच्या किल्लीने तिच्या मनाचे कुलूप खोलले. ती हळूहळू बोलती झाली. ‘डोंगल का फोडले?’ या माझ्या पुस्तकछाप प्रश्नावर तिने जे काही सांगितले ते थक्क करणारे होते.

‘डोंगल जोडल्यावर कंप्युटरच्या टीव्हीवर (स्क्रीनवर) चित्रं, माणसं दिसत्यात, ते नाचात्यात, गाणी म्हणत्यात. मला वाटलं ही माणसं याच्यातच (डोंगलमध्ये) राहत असतील. हे फोडलं का ते बाहेर येतील. त्यांना भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल... म्हणून मी ते फोडलं...’ सोनीने डोंगल फोडून नसता उपद्व्याप किंवा खोडसाळपणा केलाय, या आमच्या पारंपरिक शिक्षकी ठोकताळ्याला बरोबर छेद देणारे काहीतरी ती सांगत होती. आता तिने सांगितलेले हे कारण माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होते. ते ऐकून अक्षरशः शहारून गेलो. तिच्या बोलण्यातून एका निरागस मुलीचे निराळेच भावविश्व या निमित्ताने उलगडत होते. शिक्षक म्हणून हे सारे माझ्या कल्पनाशक्तीच्या क्षितिजाच्याही पलिकडले होते. ‘हिशोबी’ नसलेल्या, चौकस बुद्धीच्या मुलांच्या विचारप्रक्रियेपुढे आमचे शिक्षकांचे ठोकताळे आमच्या खुरटलेल्या मनोवृत्तीचे दर्शन घडवत राहतात. त्याचा पुन:प्रत्यय आला. खजील होण्याची वेळ आता माझ्यावर आली! आता हळूहळू सोनीच्या मनावरचा ताण बराच हलका झाला होता.

वर्गाबाहेर डोकावलो. बघतो तर तिकडे परिपाठ सुरू झालेला होता. ‘डोंगल का फोडले? हे सर्व मुले आणि शिक्षकांसमोर सांगून टाक’, असे सोनीला सुचवले. तिचे धाडस होईना. तिचे मनोधैर्य उंचावेल, अशा भाषेत सांगितल्यावर कशीबशी ती तयार झाली. आत्मविश्वास गमावलेल्या एखाद्या व्यक्तीला शब्द सूचत नाहीत. अवसान गळून गेल्याने लुळेपांगळे झाल्यासारखे वाटू लागते. मनाची अवस्था सैरभैर झालेली असली तरी अशाही स्थितीत आख्खं आत्मबळ एकवटून ती बोलली. ‘ऑपरेशन डोंगल’ या विशेष ‘मोहिमे’विषयी मोजक्या शब्दांत तिने सांगितले. ते ऐकून शिक्षक अवाक झाले. मुलांना हसू फुटले. मात्र आम्ही चर्चेला जरा वळण दिले. सोनीला आज शिक्षा होणार, असे मनसुबे रचणाऱ्या मुलांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.

सोनी किती जिज्ञासू वृत्तीची आहे, ती कसा वेगळा विचार करतेय, शिक्षणात असा विचार सतत करत राहणे कसे आवश्यक आहे, हे सविस्तरपणे सांगितले. तिला शाबासकी दिली. परस्पर असे डोंगल फोडण्यासारखी काही कृती करण्याऐवजी मनात आलेले प्रश्न, शंका शिक्षकांना, आईवडिलांना अन्य कोणाला तरी विचारावेत, असे मुलांना सुचवले. वेगळा विचार केल्यास हेटाळणी वाट्याला येत नाही उलट शाबासकी मिळते, असा संदेश मुलांना मिळाला.

चैतन्यमूर्ती असलेल्या मुलांमधली उत्कट उत्सुकता आणि कुतूहल ही मुलांची ताकद असते. प्रश्न किंवा शंका आणि काही कृती करून बघणे हे मुलांच्या ठायी असलेल्या कुतूहलातून येते. हे सोनीने आम्हा शिक्षकांना शिकवले होते. या प्रसंगानंतर काही पुस्तके वाचनालयात मुद्दामहून आणली. मुले ती वाचू लागली. का? कुठे? कधी? कोण? कसे? अशा मुलांच्या मनात येणाऱ्या अनेक ‘क’कारयुक्त प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळू लागली. शाळेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांना जाणीवपूर्वक प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. कोणत्याही प्रश्नाचे कोणत्याही मुलाने सांगितलेले उत्तर पूर्णपणे चुकीचे नसते, असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण केला. शिकणे म्हणजे विचार करणे, हे मुलांच्या मनात रुजवतो आहोत. हळूहळू मुले बोलू लागलीत. बिनधास्तपणे शंका विचारू लागलीत. आम्ही त्यांच्या कुतुहलास खतपाणी घालताना, चिकित्सक वृत्ती वाढीला लागावी यासाठी पोषक पर्यावरण निर्माण करतोय. डोंगल फोडून सोनीला त्याच्या आतली माणसं भेटली की नाही ते माहिती नाही, परंतु यानिमित्ताने शिक्षक म्हणून मुलांच्या मनातले अंतरंग जाणून घ्यायची आयतीच संधी आम्हाला मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com