Supply of seeds, fertilizers : खरिपासाठी बियाणे, खतांचा पुरेसा पुरवठा

Supply of seeds, fertilizers Update : राज्यात कापूस बियाणे कायदा लागू आहे. त्याअंतर्गत कापूस बियाणे पुरवठ्यावर शासनाचे लक्ष असते. कंपन्यांचा पुरवठा नियोजनानुसार होतो की नाही, याची पडताळणी बियाणे विक्री सुरू झाल्यानंतर रोजच घेतला जातो.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

राज्यात काही कंपन्यांच्या विशिष्ट कापूस वाणाच्या बियाण्यांचा तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी या बियाण्याची ७० ते ८० टक्के जास्त भावात विक्री केली जात आहे, असे शेतकरी सांगत आहेत. तसेच कंपन्यांनी सोयाबीन आणि तूर बियाण्याच्या भावात देखील वाढ केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे खरिपाच्या तोंडावर बियाणे पुरवठा आणि टंचाईचा मुद्दा गाजत आहे. खरंच राज्यात बियाण्याची टंचाई आहे का? कृषी विभागाने यंदाच्या खरिपासाठी कसे नियोजन केले? याचा घेतलेला हा आढावा...

खरीप हंगामाच्या काही महिने आधीपासूनच कृषी विभागाने नियोजन सुरू केलेले असते. वेगवेगळ्या कंपन्यांशी बैठका घेऊन त्यांचे बियाणे पुरवठ्याचे नियोजन काय आहे? पुरवठा कसा होणार? याची माहिती कृषी विभागातर्फे घेण्यात येते. राज्यात कापूस बियाणे कायदा लागू आहे. त्याअंतर्गत कापूस बियाणे पुरवठ्यावर शासनाचे लक्ष असते. कंपन्यांचा पुरवठा नियोजनानुसार होतो की नाही, याची पडताळणी बियाणे विक्री सुरू झाल्यानंतर रोजच घेतला जातो. तसेच कंपन्या किंवा विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ करतात का, याचीही तपासणी सुरूच असते, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

खरीप २०२४ साठी हंगामातील अपेक्षित पेरणी क्षेत्र, मागील तीन वर्षांची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर हे विचारात घेऊन पीकनिहाय बियाण्याची गरज निश्‍चित करण्यात येते. त्याच प्रमाणे सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्याची माहिती घेऊन नियोजन करण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामासाठी १९.२८ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. गरजेच्या तुलनेत सद्यःस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

राज्यातील अपेक्षित बियाणे उपलब्धता पीक...अपेक्षित पेरणी क्षेत्र...बियाणे गरज... बियाणे उपलब्धता
सोयाबीन...५०,७०,०००...१३,३०,८७५...१८,४५,७१४
बीटी कापूस...४०,००,०००...९५,०००...९७,४३०
तूर...१२,००,०००...५२,५००...५५,१८५
मका...९,८०,०००...१,४७,०००...१,५९,७९०
खरीप ज्वारी...२,१५,०००...१६,१२५...१६,४८५
खरीप बाजरी...४,९५,०००...१२,३७५...१६,१९९
मूग...३,५०,०००...११,५५०...११,६७०
उडीद...३,५०,०००...१८,३७५...२४,३४५
भुईमूग...२,५०,०००...१०,०००...१२,२८२
तीळ...१०,०००...१३७.५...८७०
भात...१५,९१,०००...२,२९,१०४...२,५५,०१३

Fertilizer
Seed, Fertilizer Act : राज्य सरकारच्या नवीन कायद्यांमुळे शेतकऱ्यांनाही शिक्षा होणार का?

कापूस बियाण्याची टंचाई नाही : कृषी विभागराज्यात साधारणतः ४० लाख २० लाख हेक्टरवर कापूस लागवड होते. हेक्टरी साधारणतः चार ते सव्वाचार पाकिटे बियाण्याची गरज असते. त्यामुळे राज्याला १ कोटी ७० लाख पाकिट बियाण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यात १ कोटी ७५ लाख पाकिटे बियाणे उपलब्ध आहे. म्हणजेच गरजेपेक्षा ५ लाख पाकिटांचा पुरवठा जास्त आहे.राज्यात सध्या बियाणेटंचाईची जी चर्चा आहे, ती काही कंपन्यांच्या विशिष्ट वाणासंदर्भात आहे. सगळ्याच बियाण्याची टंचाई नाही. राज्यात विशिष्ट प्रकारच्या आठ ते दहा वाणांची शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे तुटवडा जाणवत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. बाजारात अशीच वैशिष्ट्ये असलेली इतर कंपन्यांचे वाण उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे चाचणीतून हे निष्पन्न झाले की सध्या शेतकरी ज्या कंपन्यांच्या वाणाचा आग्रह धरत आहेत त्याचेउत्पादन आणि इतर वैशिष्ट्ये इतर कंपन्यांच्या वाणांचीही आहेत. फक्त त्या भागात त्या वाणांचे मार्केटिंग झाले, चर्चा झाली त्यामुळे मागणी वाढली. प्रत्यक्षात कापसाचे उत्पादन हे वाण निवडीसोबतच जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड, योग्य पीक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतात. केवळ याच कंपन्यांच्या वाणाची लागवड केली तर जास्त उत्पादन मिळेल, असे होत नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले

काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई :

राज्यात एकूण ४५,२२९ --- विक्रेते, ४१,४१९ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आलेली आहे.- राज्यात एकूण २९१ उत्पादक असून २३५ उत्पादकांची तपासणी.- राज्यात एकूण २९,९२० नमुने तपासणी, त्यापैकी १,१६७ नमुने अप्रमाणित.- १,१६७ अप्रमाणित नमुन्यांपैकी ५१७ नमुने कोर्ट केस पात्र आहेत.- राज्यात १८४ बियाणे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.- मार्च २०२४ अखेर बियाण्याचा १६७६. ८४७ क्विंटल साठा जप्त करण्यात आला.- राज्यामध्ये २७ पोलिस केसेस दाखल आहेत

बियाण्याची खरेदी करताना याकडे लक्ष द्या...

१) गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी.

२) बनावट आणि भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील असावा. जसे की पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद करावे. तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी.

३) खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टण म्हणजेच पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.

४) खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.

५) भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद किंवा मोहोरबंद असल्याची खात्री करावी.

६) बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतिम मुदत पाहून घ्यावी.

७) कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री किंवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.

यंदा पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धताराज्यात खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्याअनुषंगाने हंगामातील पेरणीच्या वेळी आणि उभ्या पिकांना नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता देण्यासाठी प्रामुख्याने युरिया खत आणि पेरणीच्या वेळी डीएपी खताची शेतकऱ्यांकडून एकाच वेळी मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनस्तरावरून खरीप २०२४ करिता १.५० लाख टन युरिया आणि २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यास प्रशासकीय मान्यता आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

राज्यात खरीप हंगाम २०२४ च्या नियोजनासाठी केंद्र शासनाच्या खत विभागाकडून युरिया १३.७३ लाख टन, डीएपी ५ लाख टन, एमओपी १.३० लाख टन, संयुक्त खते १८.०० लाख टन, एसएसपी ७.५० लाख टन असा एकूण ४५.५३ लाख टन तसेच नॅनो युरिया २० लाख आणि नॅनो डीएपीच्या १० लाख बॉटल इतक्या खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. नॅनो खतांच्या वापरामुळे पारंपरिक युरिया वापरामध्ये ९० हजार टन आणि डीएपी वापरामध्ये ५० हजार टन खतांची अंदाजित बचत होणार आहे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले.

खरिपात शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभाग केंद्राकडे आपली गरज कळवतो. त्यानंतर केंद्र सरकार खतांची उपलब्धता करून देत असते. कृषी विभागाच्या मागणीनुसार केंद्र सरकार खतांचा पुरवठा करत असून यंदा मुबलक प्रमाणात खते उपलब्ध असून टंचाई भासणार नाही, असे कृषी विभागाच्या वतीने कळविण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामात ३१ लाख ५४ हजार टन खते उपलब्ध झाली असून, जवळपास अडीच लाख टनांची विक्रीही झाली, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

Fertilizer
Seed Fertilizer Act : बनावट खते, बियाणे विक्रीविरोधी कायद्याचा मसुदा अंतिम टप्प्यात

राज्यातील मागील पाच वर्षांतील खत वापर (लाख टन) वर्ष...खरीप...रब्बी... एकूण २०१९-२०...३३.६४...२७.६९...६१.३३

२०२०-२१...४६.९५...२६.७२...७३.६७

२०२१-२२...४३.५२...२७.१५...७०.६७

२०२२-२३...३७.६८...२७.०५...६४.७३

२०२३-२४...४४.५६...२०.०१...६४.५७

खरीप हंगामासाठी उपलब्ध खते (लाख टन) खत प्रकार...उपलब्ध खते...झालेली विक्री...सध्याचा साठा

युरिया...१०.०७...१.०९...८.९८

डीएपी...१.७३...०.२१...१.५२

एमओपी...०.८१...०.०९...०.७२

संयुक्त खते...१३.७०...०.७१...१२.९९

एसएसपी...५.२४...०.२६...४.९८

एकूण...३१.५४...२.३५...२९.१९………………..

खरिपासाठी खतांचे दर...

खतांची विक्री किंमत काय असेल, याची माहितीही कृषी विभागाकडून दिली जाते. युरियाचे दर केंद्र सरकार ठरवत असते. तसेच युरियावर सर्वाधिक अनुदान मिळत असते. युरिया वगळता इतर खतांच्या किमती ठरविण्याचा अधिकार खत कंपन्यांना देण्यात आला आहे. युरियाची विक्री किंमत स्थिर असून, ४५ किलोची गोणी २६६.५० रुपयांना मिळते. खत पुरवठादार कंपन्यांच्या उत्पादन स्थळानुसार अनुदान वेगवेगळे आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी खतांचे दर (५० किलो) खत...किंमत (रुपये)

युरिया (४५ किलो) ...२६६.५०

डीएपी १८:४६:०:० ...१३५०

एमओपी ०:०:६०:०...१६५५-१७००

एनपी २४:२४:०:०...१५००-१७००

एनपीएस २४:२४:०:०८...१६००

एनपीएस २०:२०:०:१३...१२००-१४००

एनपीके १९:१९:१९...१६५०

एनपीके १०:२६:२६:०...१४७०

एनपीके १२:३२:१६...१४७०

एनपीके १४:३५:१४ ...१७००

एनपी १४:२८:०...१७००

एनपी २०:२०:०:०...१३००

एनपीके १५:१५:१५...१४७०

एनपीएस १६:२०:०:१३...११५०-१४७०

एनपीके १६:१६:१६:०...१३७५

एनपी २८:२८:०:०...१७००

एएस २०.५:०:०:२३...१०००

एनपीकेएस १५:१५:१५:०९...१४५०-१४७०

एनपीके १७:१७:१७...१२१०

एनपीके ०८:२१:२१ (४० किलो)...१८००

एनपीके ०९:२४:२४ (४० किलो)...१९००

एसएसपी (G) ०:१६:०:११...५३०-५९०

एसएसपी (P) ०:१६:०:१२...४९०-५५०

अनुदानित युरिया गैरवापर टाळण्यासाठीच्या उपाययोजना

१) खत कंपन्यांना युरिया खताच्या रेकची आगाऊ कल्पना देण्यासंदर्भात सक्त सूचना देण्यात आल्या.

२) युरिया खताचे वितरण होण्यापूर्वी ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे युरिया खताचा पुरवठा होणार आहे त्यांची यादी देण्याबाबत कंपन्यांना सक्ती करण्यात आलेली आहे.

३) संबंधित किरकोळ विक्रेत्यांकडे युरियाचा पुरवठा झाला आहे किंवा नाही याची रॅन्डम पद्धतीने क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत तपासणी करण्यात येत आहे.

४) मोठ्या २० खरेदीदारांची तपासणी.

५) ज्या औद्योगिक कारणास्तव युरिया वापरला जातो त्या औद्योगिक युनिटची तपासणी.

६) मिश्र खताच्या कारखान्यामध्ये युरिया खताचा वापर योग्य प्रमाणात होतो किंवा नाही याबाबत तपासणी.

पुरेसा खत, बियाणांचा साठा :

कृषी विभागाने खरिपासाठी पूर्ण तयारी केली आहे. खरिपासाठी मुबलक बियाणे आणि खतांचा पुरवठा झाला आहे. बियाण्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग आणि उडीद बियाण्याला चांगली मागणी आहे. कापूस बियाणे काही ठिकाणी कमी असल्याची तक्रार असल्याचे दिसून आले. पण याची पडताळणी केल्यानंतर असे दिसून आले की, शेतकरी काही कंपन्यांच्या विशिष्ट वाणांची मागणी करत आहेत. पण या वाणाची उपलब्धताच कमी आहे. त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु बाजारात याच गुणवत्तेचे आणि समान गुणधर्म असलेले वाण उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचाच आग्रह न धरता इतर समान गुणधर्म असलेल्या बियाण्याची खरेदी करावी.

खतांच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यासाठी ४५ लाख टन खते मंजूर झाली आहेत. यापैकी जवळपास निम्मा साठा सध्या उपलब्ध आहे. सरकारने दीड लाख टन युरिया आणि २५ हजार टन डीएपीचा बफर स्टॉक केला आहे. जेणेकरून जुलैमध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात युरियाची मोठी मागणी येते तेव्हा टंचाई टाळण्यासाठी हा स्टॉक केला आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात भरारी पथके तयार केली आहेत. ज्या ठिकाणी बियाणांचा काळाबाजार होत आहे किंवा जादा दराने विक्री तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री होत आहे, त्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. अवैध एचटीबीटी बियाणे इतर राज्यातून आणताना जप्त केले आहेत.

तसेच कापूस बियाण्याची जास्त दराने विक्री करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. कृषी विभाग बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेसंदर्भात अजिबात तडजोड करणार नाही. कुठेही शेतकऱ्यांना खते, बियाण्याचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, जादा दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाकडे तक्रार करावी. शेतकरी १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करू शकतात.
- विकास पाटील,
(संचालक, निविष्ठा आणि गुणनियंत्रण, कृषी विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com