Marathi Journalism Day : समाजातला ‘जागल्या’ पत्रकार

Article by Suryakant Netke : समाजात घडलेल्या घटना, घडामोडी लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतो. पत्रकारितेचे स्वरूप आता बदलतेय, मात्र तरीही, कशाची तमा न बाळगता समाजातील जागल्या म्हणून शहरी आणि ग्रामीण भागात अविरत पत्रकारिता सुरू आहे.
Marathi Journalism Day
Marathi Journalism DayAgrowon
Published on
Updated on

The Role of Journalist : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले नियतकालिक ६ जानेवारी १८३२ ला सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून या दिवशी पत्रकार दिन साजरा केला जातो. खरं तर तेव्हापासून मराठी पत्रकारितेचा काळ सुरू झाला. दर्पण सुरू झाले त्याला या वर्षी १९१ वर्ष पूर्ण होत आहेत.

तेव्हापासून सामाजिक जबाबदारी समजून पत्रकारिता अविरत सुरू आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतात. पत्रकारितेवर अनेक हल्ले झाले, पण पत्रकारिता थांबली नाही. भारत विविधतेने नटलेला, विविध जातिधर्मांचा देश, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजुरांचा देश, अशा या विविध धर्मीय आणि वेगवेगळ्या भाषिक देशात समन्यायी भूमिका घेऊन सामाजिक समतोल राखत काम करणारी पत्रकारिता जपली जात आहे.

बहुभाषिक देशात सर्वन्यायी संतुलित भूमिका घेऊन सामाजिकता वर्धिष्णू करणे आणि बंधू भावाने समाज बांधणी करणे मोलाचे आहे. सामाजिक बांधणी करण्यात पत्रकारितेने योगदान मोठे आहे.

पत्रकारितेत पूर्वी केवळ छापील वृत्तपत्र असायचे, आता दूरचित्रवाहिन्यांची संख्या मोठी झाली. समाजमाध्यमाचा वापर वाढला आहे. समाज माध्यमांवर आपापली मते व्यक्त करण्याला मुक्तता असली, तरी लोक त्यालाही एक प्रकारची पत्रकारिताच मानतात. समाज माध्यम, डिजिटल यातून पत्रकारिता वाढीस लागत असली तरी देशाला भ्रष्टाचारमुक्त, भीतीमुक्त, चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर होत असेल, तर अशा सत्तेपासून लोकांना मुक्त ठेवायची अपेक्षा लोक पत्रकारितेकडून करत असल्याचे आजही आपल्याला पाहायला मिळत आहे.

दिवसभर माध्यमावर एखादी घटना सतत ऐकूनही सकाळी वर्तमानपत्राच्या पानावर ते वृत्त वाचण्यासाठी असलेली ओढ म्हणजेच समाजातील जागल्या पत्रकार निर्भीडपणे आजही काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. वृत्तपत्रातील बातम्या सकारात्मक छापून येण्याची सामाजिक अपेक्षा असते. कारण अलीकडच्या काळात काही नकारात्मक बाबी घडत असताना त्याला प्रसिद्धी मिळाली तर त्याचा समाज जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Marathi Journalism Day
Marathi Journalist Day : पहारेकरी पत्रकार

त्यातून लोकांतही नकारात्मकता तयार होते. वाईट कृत्यांच्या; देशभेदी राजकारणाच्या बातम्या स्वतःला मोठे होण्यासाठी, एव्हाना स्वतःला मोठे आहे दाखविण्यासाठी जर प्रसिद्ध झाल्या तर त्याचा परिणाम चुकीचा होऊ नये. पत्रकारांनी मात्र सत्याची आणि निर्भीडतेची बाजू मांडताना अजूनही बऱ्यापैकी आपल्या लेखणीची धार कायम ठेवल्याचे पाहायला मिळते.

पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाजशिक्षणाचे एक माध्यम आहे. पूर्वीही ते होते. आज ही आहे आणि उद्याही राहणार आहे, पण लोकशिक्षण, समाजशिक्षण म्हणजे काय याच्या आकलनात काळानुरूप बदल होत गेल्याने पत्रकारितेची रूपे बदलत गेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश शासन हे परक्यांचे शासन आहे, त्या शासनाला उलथविले पाहिजे.

समाजातील कुप्रथा संपुष्टात आल्या पाहिजेत यासाठी सर्व राजकारण्यांनी पत्रकारितेचा आधार घेतलेला आपल्याला दिसून येतो. मराठी भाषेचा विचार केला, तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ‘केसरी’ व इंग्रजीत ‘मराठा’ काढला. गोपाळ गणेश आगरकर यांनीही समाजसुधारणेसाठी पत्रकारितेची कास धरली. लोकमान्यांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणात आलेले महात्मा गांधी यांनीही ‘स्वदेश’ व ‘हरिजन’ ही वृत्तपत्रे काढली.

राजकारणाचा वेगळ्या शैलीत वसा चालविणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यातर प्रत्येक जीवनपैलूचे अधिष्ठान राष्ट्रभक्ती, प्रखर राष्ट्रभक्ती हेच होते. त्यांनीही पत्रकारिता केली. दलित उत्थान व राष्ट्रभक्तीचा वसा घेतलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही चळवळीसाठी म्हणून बुद्धभूषण प्रेसची स्थापना केली व बहिष्कृत भारतचे संपादन, प्रकाशन सुरू केले.

Marathi Journalism Day
Agri Journalism Award : ‘अॅग्रोवन’च्या चौगुले यांना आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार

स्वातंत्र्यप्राप्ती ते आणीबाणी हा पत्रकारितेचा वेगळा टप्पा होता. काळानुरूप परिवर्तने झाले. आधुनिक यंत्रसामग्री व नवनवीन तंत्रे यांचा वापर महत्त्वाचा ठरला. पत्रकारितेचे स्वरूप बदलले असले तरी आजही ग्रामीण तसेच शहरी भागातही बदलते स्वरूप समजून घेत तेवढ्याच ताकदीने पत्रकारिता जपली जात आहे. बांधीलकी, नवा आयाम पत्रकार पुढे नेत आहेत.

पत्रकारितेची परंपरा पुढे नेत आजही राज्यात आणि देशात वृत्तपत्रे समाजासाठी भरीव काम करत आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, शेती, संशोधन, महिला, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी यांसह समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडली जात असू,न बदलत्या परिस्थितीतही तेवढ्याच विश्‍वासार्हतेने पत्रकार काम करत आहेत. प्रत्येक बाबींची प्रामुख्याने वृत्तपत्रे जाणीव करून देत आहेत.

शेती-मातीवर प्रेम करणारी पत्रकारिता सामाजिक जबाबदारी समजून ग्रामीण आणि शहरी पत्रकारिता सुरू आहे. त्यात समाजाच्या दैनंदिन घडामोडीचे वार्तांकन करून लोकांपर्यंत माहिती पोचण्याचे वर्षानुवर्षे पत्रकारिता काम करतेय. राज्यात आणि देशात शेती आणि शेतीचे स्वरूप बदलत आहे. त्या अनुषंगाने दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींबरोबर शेती-मातीवर प्रेम करणारी पत्रकारिता वाढीस लागत आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने देशात पहिल्यांदाच शेतीविषयक ‘ॲग्रोवन’ हे सुरू केलेले दैनिक देशभरात लोकप्रिय झाले. त्यासोबत अन्य माध्यमांतूनही शेतीविषयक पत्रकारितेला प्राधान्य दिले जात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. पारंपरिक शेती करतानाच अलीकडच्या काही वर्षांपासून शेतीत नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग, कृषी विद्यापीठाचे योगदान, संशोधन आणि त्यातून शेती विकासाला मदत होत असून शेतकरी डिजिटल होत आहेत.

वेगवेगळ्या तंत्रज्ञानातून यशस्वी शेतीचे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची पत्रकारिता सक्रिय होत आहे. शेतीत राबणारे हात आता शेतीतील प्रयोग पत्रकारितेच्या माध्यमातून लिहीत आहेत. त्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील शेतकरी, तेथील शेतीतील प्रयोग, पूरकव्यवसाय, तरुण शेतकऱ्यांचा शेतीतील सहभाग अशा अनेक बाबी समोर येत आहेत.

संसोधनालाही त्याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. हा पत्रकारितेतील अलीकडच्या दहा वर्षांतील बदल खरेतर समजून घ्यावा लागणार आहे. भारतात मोठी लोकशाही नांदत आहे. लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकारिता करत आहे. राज्यात आणि देशात अडचणीच्या आणि बदलत्या काळातही निर्भीड पत्रकारिता सुरू आहे. अशा पत्रकारितेला सलाम !

(लेखक ‘ॲग्रोवन’चे अहमदनगर जिल्हा बातमीदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com