
Pune News : छत्रपती संभाजीनगर येथे सरकी, सरकी तेल आणि सरकी पेंड परिषद होणार आहे. ७ आणि ८ जुलैला होणाऱ्या या परिषदेत सरकीच्या मूल्य साखळीतील अनेक पैलूंबाबत सखोल चर्चा होणार आहे.
या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल. तर देशभरातून कापूस मूल्यसाखळीशी संबंधित तीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील, असे एसईचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी सांगितले.
द सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एसईए आणि दि ऑल इंडिया कॉटन क्रशर्स असोसिएशन अर्थात एआयसीओएससीए यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होणरा आहे. मराठवाडा आणि विदर्भ ही देशातील प्रमुख कापूस उत्पादन केंद्रे आहेत. त्यामुळे यंदाची राष्ट्रीय परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू वर्षात भारतात १२८ लाख हेक्टर क्षेत्रामधून ३१५ लाख गाठी कापूस उत्पादन झाले. कापसामध्ये सुमारे ६७ टक्के सरकी असते. या सरकीपासून पेंड आणि तेलाची निर्मिती होते.
देशात दरवर्षी १२ लाख टन सरकी तेलाची निर्मिती होते. त्यातील निम्मे म्हणजे ६ लाख टन तेलाचा वापर मानवी आहारात केला जातो. प्रामुख्याने गुजरातमध्ये हा वापर होत असतो. उरलेले तेल है अन्नप्रक्रिया, हॉटेल आणि फॅटीन इ. मध्ये वापरले जाते.
सरकी तेलाचे महत्व
कॉलेस्ट्रॉल, रक्तदाब, काही प्रकारचे कर्करोग सांधेदुखी सारख्या आजारांवर नियंत्रण करण्याची क्षमता असणारे आरोग्यदायी सरकी तेल हे तळणासाठी जगातील सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे.
त्यात तळलेले अन्नपदार्थ चार आठवड्यांपर्यंत ताजेपण राखून त्याचे गंध, फ्लेवर इ. गुण अधिक काळ टिकवून ठेवते. मोहरी आणि सोयाबीन नंतर तिसऱ्या क्रमांकावर असणारे सरकी तेल देशाची खाद्यतेल आयात निर्भरता कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकते.
सरकीवर होणार सखोल मंथन
या परिषदेच्या निमित्ताने सरकीच्या तेलाबाबत अधिक जागरुकतेबरोबरच पशुखाद्य म्हणून सरकी पेंडीचा वापर करून दूध उत्पादन वाढ कशी करता येईल? यासंबंधीच्या चर्चासत्रात देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सरकीच्या मूल्य साखळीतील अनेक पैलूंबाबत माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. अखेरच्या सत्रात सरकी, सरकी तेल आणि सरकीची पेंड यांचे उत्पादन आणि दिशा काय राहतील याबाबतची अनुमाने जाणकार देणार आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच देशभरातील सरकी तेल आणि पेंड निर्माते, खाद्यतेल रिफायनरी, पॅकींग उद्योग, साॅल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स, कापूस जिनर्स आणि विक्रेते, ब्रोकर्स आणि विमा कंपन्या, शासकीय अधिकारी, कृषि शास्त्रज्ञ, सल्लागार आणि मशिनरी निर्माते यांचा सहभाग राहणार आहे, असे एसईएचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला आणि एआयसीओएससीएचे अध्यक्ष संदीप बजोरिया यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.