ॲग्रोवन वृत्तसेवा
Mumbai News : मुंबई : वैनगंगा -नळगंगा नदीजोड या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या वैधानिक मान्यतांसाठी एक हजार ३२ कोटी सहा लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता, तर प्रकल्प बांधकामासाठी ८७ हजार ३४२ कोटी रुपयांच्या किमतीस तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली होती. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताही देण्यात आली होती.
या प्रकल्पामुळे गोदावरीच्या उपखोऱ्यातून वैनगंगेतील पाणी बुलडाणा जिल्ह्यातील वैनगंगा प्रकल्पात आणणे प्रस्तावित आहे. यासाठी ४२६.५२ कि.मी.चे जोड कालवे बांधण्यात येणार आहेत. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांतील १५ तालुक्यांना सिंचन तसेच पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारणासाठी या पाण्याचा वापर प्रस्तावित आहे. रब्बी हंगामात पाण्याचा वापर करता यावा म्हणून ३१ साठवण तलावही बांधले जाणार आहे.
या प्रकल्पातील जोड कालव्यांद्वारे उपलब्ध होणारे पाणी रब्बी हंगामात वापरण्यासाठी ४१ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. यापैकी ३१ साठवण तलाव नव्याने बांधण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या १० तलावांपैकी ६ तलावांची उंची वाढविणे आणि वर्धा नदीवरील निम्न वर्धा प्रकल्प, काटेपूर्णा नदीवरील काटेपूर्णा प्रकल्प व नळगंगा नदीवरील प्रकल्प अशा तीन प्रकल्पांचा संतुलन तलाव म्हणून वापर केला जाणार आहे.
या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम हाती घेण्यापूर्वी सर्वेक्षण, संकल्पना, तसेच आवश्यक सर्व वैधानिक मान्यता, वनजमीन संपादन करण्यासाठी एक हजार २३२ कोटी सहा लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
प्रत्यक्ष बांधकामासाठी ८७ हजार कोटी
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातील बांधकाम घटकांसाठी ८७ हजार ३४२ कोटी रुपयांच्या किमतीस तत्त्वत: मान्यता देण्यात आली. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण, अन्वेषण व संकल्पना तसेच सर्व वैधानिक मान्यता दिल्यानंतरच बांधकाम करावे लागणार आहे. बांधकामांपूर्वी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता प्राप्त करून पुन्हा प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.