
Mumbai News: मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन विभागाच्या वतीने राज्यातील २१ जिल्ह्यांतील ६८ तालुक्यांमध्ये नव्या बाजार समित्या सुरू करण्यात येणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवस आराखड्यानुसार कृती कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सर्वाधिक तालुक्यांत बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या ३०५ बाजार समित्या कार्यत असून, या बाजार समित्यांचे ६२५ उपबाजार कार्यरत आहेत. तर राज्यातील ६८ तालुक्यांत बाजार समित्या नव्हत्या.
पणन विभागामार्फत पुढील १०० दिवसांच्या करावयाच्या कृती कार्यक्रमांतर्गत नव्याने बाजार समित्या स्थापन करण्याचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानसुार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पातील भाषणादरम्यानही एक तालुका एक बाजार समितीची घोषणा केली होती.
सध्या राज्यात ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसली तरी मुंबई उपनगरातील कुर्ला, अंधेरी, बोरिवली या तालुक्यांत शहरी भाग असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करणे व्यावहारिक नाही. तसेच जालना बाजार समितीचे विभाजन होऊन बदनापूर बाजार समिती निर्माण झाली आहे. तसेच या बाजार समितीप्रश्नी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उर्वरित ६५ तालुक्यांमध्ये बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, अमरावती, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत या बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
सध्या राज्यात ३०५ बाजार समित्या असून ३० बाजार समित्यांचे उत्पन्न २५ लाखांपेक्षा कमी आहे, तर २७ बाजार समित्यांचे उत्पन्न २५ ते ५० लाखांच्या दरम्यान आहे. एक कोटीच्या आत उत्पन्न असलेल्या ५४ बाजार समित्या आहेत, तर २५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पाच बाजार समित्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूर बाजार समित्यांचा समावेश आहे. तर ‘ड’ वर्गातील म्हणजे २५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ३० बाजार समित्या याही तालुकापातळीवरील आहेत.
नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या बाजार समित्यांसाठी पणन संचालकांनी निकष स्थापित करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील बाजार समित्यांसाठी किमान पाच एकर, तर उर्वरित जिल्ह्यांसाठी किमान १० ते १५ एकर जमीन आवश्यक आहे.
येथे स्थापन होणार बाजार समित्या
सिंधुदुर्ग : कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग
रत्नागिरी : संगमेवश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड
रायगड : उरण, टाळा, सुधागड-पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हासळा
ठाणे : अंबरनाथ
पालघर : तलासरी, जवाहर, मोखाडा, वाडा, विक्रमगड
नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्वर
जळगाव : एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव
अमरावती : भातकुली, चिखलदरा
पुणे : वेल्हा
नागपूर : नागपूर ग्रामीण
भंडारा : मोहाडी, साकोली
गोंदिया : सालकसा
गडचिरोली : धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कोर्ची, एटापल्ली, भामरागड
चंद्रपूर : बल्लारपूर, जिवती
नांदेड : अर्धापूर
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद, सोयगाव
बीड : शिरूर कासार
सोलापूर : सोलापूर दक्षिण
सातारा : महाबळेश्वर
सांगली : कवठेमहाकांळ, जत, कडेगाव
कोल्हापूर : पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा
२०२ बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा अडीच कोटींच्या आत
राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या ३०५ पैकी १०३ बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा पाच कोटी ते २५ कोटींपर्यंत आहे. तर २०२ बाजार समित्यांची उत्पन्न मर्यादा २५ लाख ते अडीच कोटींपर्यंत आहे. बहुतांश बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पणन विभागाने बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न, खर्च, वाढावा, तूट आदींचे मूल्यमापन करून बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.