Akola News : जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पात्र असूनही अकोलखेड मंडलातील संत्रा उत्पादकांना वगळण्यात आले होते. वास्तविक आजूबाजूची मंडले पात्र ठरलेली असताना हे एकमेव मंडल पीकविम्यासाठी पात्र नसल्याने संत्रा उत्पादकांनी रोष व्यक्त केला. याबाबत २१ जूनच्या अंकात ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त झळकल्यानंतर हालचाली झाल्या.
वस्तुस्थिती पाहता कृषी विभागानेही याबाबत विमा कंपनीला निर्देशित करीत शेतकऱ्यांना लाभ देण्याचे कळवले. अखेर अकोलखेड मंडलांतील संत्रा उत्पादकांना पात्र ठरवत मृग बहरासाठी हेक्टरी ४० हजार रुपये मंजूर झाले आहेत. सुमारे अडीच कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.
अकोट तालुक्यातील उमरा व पणज या दोन महसूल मंडलांतील संत्रा उत्पादकांना गेल्या वर्षातील मृग बहरासाठी हेक्टरी ४० हजार रुपयांची भरपाई जाहीर झाली होती. मात्र या दोन्ही मंडलांच्या मध्यभागी असलेले अकोलखेड मंडल वगळले गेले होते. गेल्या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने संत्रा बागांमध्ये मृग बहर फुटू शकला नव्हता.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १५ जून ते १५ जुलै या एक महिन्याच्या काळात १२४ मिलिमीटरच्या आत पाऊस झाला असेल, तर प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना विमा मिळू शकतो. दुसरीकडे अकोलखेड मंडलात केवळ ७९.१ मिलिमीटर एवढा पाऊस होऊनही लाभापासून शेतकरी वंचित राहिलेले होते. शेतकऱ्यांनी ही बाब विमा कंपनीच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत ‘ॲग्रोवन’ने वृत्त प्रकाशित करीत यंत्रणांचे लक्ष वेधले होते.
पाऊस नोंदीच्या तांत्रिक कारणाने हा विमा रखडला होता. शेतकऱ्यांनी तालुका, जिल्हास्तरावर कृषी अधिकाऱ्यांना निवेदने दिली. विमा कंपनीकडेही पाठपुरावा केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे यांनीही वस्तुस्थिती व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत हा मुद्दा विमा कंपनीला तातडीने सोडवण्यास सुचवले. वेळोवेळी बैठकाही घेतल्या. एकूणच सामूहिक प्रयत्नातून हा विषय मार्गी लागला.
शेतकरी संख्या - ५९६
क्षेत्र- ६३२ हेक्टर
मिळालेला विमा- हेक्टरी ४० हजार
एकूण रक्कम- सुमारे अडीच कोटी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.