Chh. Smabhajinagar News : मराठवाड्यातील ७५० लघू व ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ४७ प्रकल्पांची तहान अजूनही कायम आहे. हे सर्व प्रकल्प कोरडे असून, तब्बल २३७ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे.
कोरड्या असलेल्या ४५ लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६, बीडमधील १५, जालन्यातील ९, धाराशिवमधील ३, लातूरमधील २ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरड्या पडलेल्या दोन मध्यम प्रकल्पांत जालना व बीडमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या २०५ लघू प्रकल्पांत बीडमधील ५८, धाराशिवमधील ३८, लातूरमधील ३३, जालन्यातील ३५, छत्रपती संभाजीनगरमधील २७, नांदेडमधील ९, परभणीतील २ व हिंगोलीतील ३ प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या ३२ मध्यम प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरमधील ११, बीडमधील ७, जालन्यातील ५, लातूरमधील २, धाराशिवमधील ६ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.
मराठवाड्यातील १८ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ४ मध्यम प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ५ मध्यम प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर १४ मध्यम प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाण्यासाठा झाला आहे. ७५० लघू प्रकल्पांपैकी २२३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा झाला असून, ८९ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ४२ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ १२८ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.
उपयुक्त पाणीसाठा ३०.७६ टक्क्यांवर
मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३०.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांमधील ३१.११ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांमधील ३१.१६ टक्के, लघू ७४९ प्रकल्पातील २८.२८ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ३०.७३ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ५५.४६ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
दोन मोठे प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच
मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव व धाराशिव जिल्ह्यांतील सीना कोळेगाव प्रकल्पाचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पाची उपयुक्त पाण्यासाठीची क्षमता ११.०१७ टीएमसी असून, या प्रकल्पात ४.०७५ टीएमसी इतकाच पाणीसाठा झाला आहे.
सीना कोळेगाव प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ३.१५ टीएमसी असून या प्रकल्पातही केवळ ०.५३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. काही अपवाद वगळता बहुतांश भागात पिकापुरताच पाणी झाल्याने मराठवाड्यातील नदी, नाले अपेक्षेप्रमाणे खळखळले नाही. अनेक भागांत चिखल करण्यापुरताच पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
एकूण व उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये)
प्रकल्प एकूण पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा
जायकवाडी ४६.४८८ २०.४२
निम्नदुधना ४.४७८ ०.८६
येलदरी १३.९५६ ९.५५
सिद्धेश्वर ७.३७९ १.३८
माजलगाव ४.०७५ ००
मांजरा १.८८४ ०.२२
पैनगंगा २९.१५१ १८.०३
मानार १४.३३५ ३.४३
निम्न तेरणा २.००४ ०.९५
विष्णुपुरी २.८६८ २.७७
सीना कोळेगाव ०.५३० ००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.