Water Shortage
Water ShortageAgrowon

Water Shortage : पावसाळा सुरू होऊनही ३ हजार ७७६ टॅंकर सुरूच

Water Defect : पाणीटंचाई कमी होईना; मराठवाड्यात सर्वाधिक झळा

संदीप नवले ः अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः मॉन्सूनचे आगमन झाले. जून महिना सुरू होऊन जवळपास दोन आठवडे ओलांडले, तरीही पाणीटंचाईच्या झळा कमी होत नसल्याची स्थिती आहे. राज्यात तब्बल ३ हजार ७७६ टॅंकर रोज धावत असून, त्याद्वारे ३ हजार ५० गावे व ७ हजार ६८ वाड्या-वस्त्यांना रोज पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यात टॅंकरची संख्या अधिक असून, पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे.

राज्यात जानेवारीपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या. सुरुवातीला नाशिक, पुणे विभागांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र उन्हाच्या झळा वाढत गेल्यानंतर टॅंकरच्या संख्येत हळूहळू वाढ होत गेली. आता जून महिना सुरू झाल्याने पाणीटंचाईच्या झळा काहीशा कमी होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. त्यातच मॉन्सून सात जूनच्या दरम्यान राज्यात दाखल झाला होता. तरीही राज्यात सुमारे ४ हजार २१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. परंतु सात ते १५ जूनच्या दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बोअरवेल व विहिरींना पाझर फुटला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काहीसा कमी झाला. २४५ टॅंकर कमी झाले. परंतु चार ते पाच दिवसांपासून पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. त्यातच उन्हाचा चटका वाढला आहे.

Water Shortage
Water Shortage : अठरा गावांत टॅंकर; दहा गावांत विहिरींचे अधिग्रहण

गेल्या वर्षी याच काळात राज्यात ५१५ गावांत आणि १२४६ वाड्या-वस्त्यांवर ३८१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी टॅंकरच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

सध्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. जिल्ह्यात ७४७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यात ५३३, बीडमध्ये ४५७, धाराशिवमध्ये १४६ टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३९७ टॅंकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यात २५०, तर जळगावमध्ये १३७ टॅंकर सुरू आहेत. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात सुमारे २८६, सोलापूरमध्ये १६६, साताऱ्यामध्ये ११६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोकणात आणि विदर्भात पाणीटंचाई कमी आहे.

मागील पाच वर्षांतील टॅंकरची संख्या
वर्ष---गावे---वाड्या-वस्त्या---टॅंकर संख्या
२०२३---५४७---१४०४---४२६
२०२२---५९१---१३१२---५०१
२०२१---४९३---६८२---३५४
२०२०---९२९---१७७८---८४६
२०१९---५५०६---११७५५---६९०५

जिल्हानिहाय टॅंकर
ठाणे ४८, रायगड ५८, रत्नागिरी २६, पालघर ५४, नाशिक ३९९, धुळे ११, नंदुरबार १, जळगाव १३७, नगर ३२०, पुणे २९५, सातारा २१७, सांगली १०९, सोलापूर २१४, औरंगाबाद ७४१, जालना ५४६, बीड ४६८, परभणी ३१, हिंगोली १०, नांदेड ३८, धाराशिव १५१, लातूर ४२, अमरावती १७, वाशीम ३, बुलडाणा ७९, यवतमाळ १४, नागपूर १२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com