Jalna News : जालना जिल्ह्यात बँकांकडून पीककर्ज वितरण संथ गतीने केले जात असल्याचे चित्र आहे. जून महिना उजाडण्याची वेळ आली तर जिल्ह्यात केवळ २७३ कोटी 6 लाखांचे पीककर्ज वितरित केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँका कर्ज वाटपात सर्वात मागे आहेत.
जून महिना उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची तयार सुरू केली आहे. मॉन्सूनचा पावसापूर्वी शेत तयार करण्यासाठी खते, बी-बियाणे भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. गतवर्षीचा कापूस अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यात रब्बी पिकांचे यंदा गारपिटीने नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत.
अशात पिककर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर होईल, अशी अपेक्षा आहे. यंदा खरीप पीककर्ज वाटपाचे १२४८ कोटी रुपयांचे वाटप करण्याचे उद्दिष्टे आहेत. मात्र, दरवर्षी प्रमाणे यंदाही जून महिना तोंडावर आला असताना जिल्ह्यात केवळ ४७ हजार ९१४ शेतकऱ्यांना २७२ कोटी 6 लाखांचे पीककर्ज वाटप केले गेले आहे.
यात राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँका सर्वात मागे आहेत. पीककर्ज वाटपाचा वेग वाढण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. पीककर्ज वाटपाचा वेग वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बँकेच्या व्यवस्थापकांच्या बैठकाही घेतल्या.
यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टे शंभर टक्के उद्दिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले होते. उद्दिष्टे पूर्ण झाले नाही तर शासकीय कार्यालयाचे वेतन जमा करण्याची सुविधा काढून घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल असा इशारा दिला होता.
मात्र, या इशाऱ्याला बँकांकडून गांभीर्याने घेण्यात आले नसल्याचे चित्र आहे. पिककर्जासाठी खेटा मारणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज भेटले नाही, तर पेरणीसाठी पुन्हा सावकारांकडे कर्जासाठी हात पसरण्याची वेळ येऊ शकते.
बॅंकाची पीककर्ज स्थिती...
आजघडीला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३० हजार १५६ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७५ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहेत. व्यापारी बँकांनी 8 हजार ९४२ शेतकऱ्यांना १०० कोटी ३१ लाख, ग्रामिण बँकेकडून 8 हजार ८४३ शेतकऱ्यांना ८० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ २१.८८ टक्के खरीप पीककर्ज वाटप झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.