
ॲग्रोवन वृत्तसेवा
Wardha News : वर्धा : हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार ‘नाफेड’च्या वतीने जिल्ह्यात आठही केंद्रांवर सोयाबीनची खरेदी सुरू आहे. यात सहा डिसेंबरपर्यंत एक हजार १०३ शेतकऱ्यांकडून २० हजार ३४६.७१ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख ३१ हजार १२७.७५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी करून घरी आणले होते. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल भाव देऊन खरेदी केले. शासनाने हमीभाव चार हजार ८९२ रुपये सोयाबीन जाहीर केला. तर खासगी व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार २०० रुपये भावाने खरेदी केली जात आहे. परिणामी, प्रतिक्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.
जिल्ह्यातील वर्धा, देवळी, पुलगाव, कारंजा, आष्टी, हिंगणघाट, समुद्रपूर, जाम या केंद्रांवर ‘नाफेड’तर्फे सोयाबीन हमीभावाने खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरविल्याचे दिसते. या आठही केंद्रांवर केवळ चार हजार २४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
तर दोन हजार १६४ शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस पाठविले असून उर्वरित शेतकऱ्यांना एसएमएस पाठविणे शिल्लक आहे. आठही केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू आहे. या आठही केंद्रांवर एक हजार १०३ शेतकऱ्यांचे २० हजार ३४६.७१ क्विंटल सोयाबीन खरेदी केले असून, नऊ कोटी ९५ लाख ३६ हजार १०५.३२ रुपयांचे सोयाबीन झाले आहे.
नोंदणीला मुदतवाढ
‘नाफेड’कडे एकूण चार हजार २४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांचा कल खासगी बाजारपेठेपेक्षा अधिक दिसून येत आहे. ‘नाफेड’तर्फे शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत १५ डिसेंबर होती, परंतु, नोंदणीसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.