
Crop loan recovery In Sangli : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (Sangli District Central Cooperative Bank) मार्चअखेरीस शेतीकर्जाच्या वसुलीसाठी जोर लावला आहे. शेवटच्या दोन दिवसांत आणखी जोरदार प्रयत्न केले जातील. जिल्हा बॅंकेने आजअखेर शेतीकर्जाचे थकीत २०० कोटी रुपये वसूल केले आहेत.
त्यात ‘एनपीए’तील १०२ कोटी रुपयांचा समावेश आहे. जत तालुक्याची एनपीए रक्कम ६६.३१ कोटी असून, यातील ४४.८१ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहेत.
जिल्हा बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारवाईचा धडाका लावला आहे. शेती व बिगरशेती कर्जाच्या वसुलीसाठी ओटीएस योजना राबविली जात आहे. मात्र अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे.
जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. थकबाकीदारांना वसुलीच्या नोटिसा देऊनही टाळाटाळ केली जात असल्याने कारवाई सुरू करण्यात आली.
जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगरशेती संस्थांना कर्जपुरवठा केला जातो. शेतीसह सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकलेली आहेत. बड्या संस्थांच्या थकबाकीमुळे बँकेचा एनपीए वाढला आहे.
वाढती थकबाकी कमी करण्यासाठी एकरकमी कर्ज परतफेड, सामूहिक कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेची वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. त्याष्टिने आराखडा तयार करण्यात आला आहे.
जिल्हा बॅंकेचा ग्रॉस एनपीए ११ टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी गेली दीड महिना जिल्हा बॅंक प्रशासन काम करीत आहेत. प्रत्येक तालुक्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
बड्या कर्जदारांवरही कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. काही संस्थांवर ताबाही घेतला जातो आहे. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनीही शेती कर्ज वसुलीसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे. जत तालुक्यातून ६८ कोटी, मिरज ३१ कोटी, कवठेमहांकाळ २६ कोटी, तासगाव ४० कोटींची वसुली झाली आहे.
तालुका - वसुली (कोटींत) - टक्केवारी
शिराळा - १.४१ - ५७.६०
वाळवा - ५.८४ - ७४.१४
मिरज - ३१.०७ - ५५.४९
कवठे महांकाळ - २६.०३ - ४६.३७
जत - ६८.५७ - २८.१८
तासगाव- ४०.५२- ३२.८३
खानापूर- १.९९- ५४.८३
आटपाडी- १४ - ३८.८३
पलूस - १०.१२ - ५२
कडेगाव- १.३२- ६५.०९
एकूण - २००.९१ - ४६.५५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.