Sugarcane Season 2024 : राज्यात १७५ कारखान्यांना मिळाले गाळप परवाने

Sugarcane Crushing Season : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसताच साखर उत्पादक पट्ट्यात गाळपाला वेग आला आहे.
Sugarcane Crushing Season
Sugarcane Crushing SeasonAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसताच साखर उत्पादक पट्ट्यात गाळपाला वेग आला आहे. साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणाऱ्या कारखान्यांची संख्या आता १७५ झाली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे राजकीय नेतृत्वाच्या प्रभावाखाली १२५ पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक साखर कारखान्यांची यंत्रणा गुंतलेली होती. कारखान्याच्या संबंधित संचालक व कर्मचाऱ्यांकडेही निवडणूक काळात विविध जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या होत्या.

त्यामुळे गाळपाच्या नियोजनाकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. मात्र, निवडणूक संपताच स्थिती बदलली असून स्थानिक राजकीय नेते आता गाळपाच्या नियोजनाकडे वळले आहेत. त्यामुळे धुराडे पेटलेल्या कारखान्यांची संख्या आता ६५ पर्यंत गेली आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season 2024 : आर्थिक विवंचनेतच हंगामाचा श्रीगणेशा

गाळप परवाना मिळण्यासाठी यंदा साखर आयुक्तालयाकडे २०७ कारखान्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत १७५ कारखान्यांना परवाना देण्यात आला आहे. ९ कारखान्यांच्या अर्जांची तपासणी अद्यापही प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या स्तरावर चालू आहे. तसेच, १२ अर्ज पुन्हा साखर कारखान्यांकडे पाठविण्यात आले आहेत.

या कारखान्यांनी परवान्याच्या अटीशर्तींची पूर्तता केली नाही. यातील बहुतेक साखर कारखान्यांनी सरकारी थकबाकी चुकती केलेली नसल्यामुळे त्यांना परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत. परवाने घेण्यात सहकारापेक्षाही खासगी कारखाने आघाडीवर आहेत. आतापर्यंत ८३ सहकारी तर ९२ खासगी कारखान्यांनी गाळप परवाने घेतले आहेत.

परवाने घेताच साखर कारखाना सुरू होत नाही. राज्यात २५ नोव्हेंबरअखेर ६५ साखर कारखान्यांचा बॉयलर पेटला आहे. यात २९ सहकारी व ३६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी दहा दिवसात २०.७२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून १४ लाख क्विंटलहून अधिक साखर तयार झाली आहे. उतारा पहिल्या टप्प्यात कमी म्हणजेच ६.७८ टक्क्यांच्या आसपास मिळतो आहे.

Sugarcane Crushing Season
Sugarcane Season 2024 : गव्हाणीत मोळी पडताच तोडणीचा हंगाम सुरू

“निवडणुकांची धामधूम समाप्त झाल्यामुळे राज्यातील सर्व साखर कारखाने या महिनाअखेरीस सुरू झालेले असतील. गाळप परवाना वाटपासंदर्भात साखर आयुक्तालयाने जबाबदारी पार पाडली आहे. परवाना न मिळालेले कारखान्यांचे मुद्दे आयुक्तालयाच्या कक्षेत नसून अटीशर्तींची पूर्तता केल्यास या कारखान्यांना परवाना मिळू शकतो,” असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

११०० लाख टनांहून अधिक ऊस

राज्यात यंदा १३.७२ लाख हेक्टरवर ऊस आहे. ऊस उत्पादकता या वेळी प्रतिहेक्टरी ९० टनांच्या आसपास असल्यामुळे अंदाजे १ हजार १११ लाख टनांच्या आसपास ऊस राज्यात असू शकतो. या पासून निव्वळ १२५ लाख टन साखर तयार होऊ शकते. यातील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळती झाल्यास साखर कारखान्यांकडील प्रत्यक्ष साखर उत्पादन ११३ लाख टन राहील, असे साखर आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com